राजधानी

शाळेत असतानाची एक गोष्ट. कुठल्याश्या तासाला कोणत्यातरी सन्दर्भात विषय निघाला म्हणून बाईंनी प्रश्न विचारला, " अमेरिकेची राजधानी कोणती कोणाला माहित आहे? " प्रश्न संपल्यासरशी बरेच उत्साही हात " बाई मी, बाई मी " करत वर झाले होते. त्यातच एक अतिउत्साही आवाज पटकन बोलूनही गेला, " न्यूयॉर्क, न्यूयॉर्क " सगळे चेहरे त्या आवाजाच्या दिशेने वळले. आणि मग मोजके आवाज, त्यात बाईंचाही सामिल होता, " ए, नाही नाही. वॉशिंग्टन! " आणि मग त्या अतिउत्साही सकट आणखीही काहींचे दोन्ही हात तोंडावर गेले " अरेच्या, चुकलं की! " म्हणून. पण बर्‍याच मनांत तेव्हा तेच उत्तर होतं हे मात्र कळलं.

आता चित्र पालटलं असेल म्हणा. पण तिथल्या एका शहराचं नाव सांगा बघू म्हटल्यावर अजूनही तिच नाव कुणी पहिल्यांदा घेईल याबद्दल शंकाच आहे. ती नाहीच show off करणारी, त्यामुळं ठसठशीत उठून दिसत नाही कधी. अगदी low profile ठेवलंय तिनं स्वतःचं.

मी अगदी एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील, ते पण अंगठा सोडून, इतक्याच राजधान्या पाहिल्यात. त्यातली एक आपली दिल्ली! पण तेव्हा दिल्लीचाही रुबाब जाणवला होता. त्यामुळं पहिल्यांदा हिला पाहताना एक राजधानी म्हणून आदर होताच. आणि मग नशीबानं तिला अगदी जवळून पाहता आलं आणि ओळख करून घेता आली. अगदी इतरानाही करून देता येईल इतकी.

मी पहिल्यांदा भेट दिली एक पर्यटक म्हणूनच. खास पर्यटकांसाठी असलली ठळक वैशिष्ट्य ही एका लांबलचक हिरव्यागार गवताच्या पट्याच्या, 'मॉल' च्या, आजूबाजूलाच आहेत. एका टोकाला कॉन्ग़्रेस, दुसर्‍या टोकाला वॉशिंग्टन मॉन्युमेंट, त्याच्या मागे एका उथळ आयताकृटी तलावासमोर लिंकन मेमोरिअल, मॉलच्या दोन्ही बाजूनी म्युझियम्स. पहिल्यांदा पाहिल्यावरच तो वॉशिंग्टन मोन्युमेंटचा पान्ढरा obelisk टोक केलेल्या पाटीवरच्या पेन्सिलीसारखा वाटला मला. तेव्हापासून मी त्याला तेच नाव दिलं,'पेन्सिल'! त्या पेन्सिलीच्या पायथ्याशी कॉन्ग्रेस कडे तोंड करून उभं राहिलं की डाव्या बाजूला 'व्हाईट हाऊस' आणि उजव्या बाजूला जेफरसन मेमोरिअल. प्रेसिडेन्ट्स मधे या तिघांची कामगिरी मोलाची, त्यामुळं त्याना हा मान!
पण हा परिसर इतका प्रशस्त आहे की पहिल्या भेटीत सगळे पाहिले तरी खूप झाल म्हणायचं! माझही तसच झालं, जेवढ पाहता ये\ईल तेवढं पाहिलं आणि फोटो काढले. पहिल्या भेटीत ते महत्वाचं! बर्‍याच जणांप्रमाणं मलाही वाटलं आपण अगदी सग्गळी राजधानी पाहिली. पण हा भाग तर अगदी पाठ हो\ऊन गेलाच शिवाय तिची बरीच रूपं नंतर पहायला मिळाली. आणि तिचे काही वेगळेच पैलू समोर आले.

माझं या देशातलं पहिलंवहिलं नोकरीचं ठिकाण हे वॉशिंग्टनमधेच होतं. सोयीचं होतं म्हणून मी भुयारी रेल्वे, 'मेट्रो' ने जायची. तसं तिथं ड्रायव्हिन्ग करायला मी फारशी कधीच उत्सुक नव्हते हा भाग वेगळा. भुलभुलैय्याच वाटायचा मला तो. भुयारी रेल्वेचा प्रवास हा एक सुखद अनुभवच होता म्हणायचा. गर्दी, धक्काबुक्की नाही.जमिनीखालून जात असल्यामुळं बाहेर काही पाहण्यासारखं नसायचं त्यामुळं वाचनाला तेवढाच वेळ मिळायचा. स्टेशन्स मात्र पटापट यायची, दोन स्टेशनांत फारसं अंतर नाही. नदी ओलंडली की पहिलंच स्टेशन माझं destination. पण नदीच्या अल्याड आणि पल्याड असणार्‍या या दोन स्टेशन मधे मात्र बरचसं अंतर होतं. पूर्ण नदीचं पात्र ओलांडावं लागायचं ना! त्यात उतरायचं म्हणून मी जरा जास्तच सतर्क असायचे, तेव्हा आपण नदीच्या प्रचंड पात्राच्या खालून जात आहोत हे आठवून उगाचच काळजी वाटायची!

माझं उतरण्याचं स्टेशन Foggy Bottom हे George Washington University चं ठिकाण होतं. Campus असं म्हणता नाही येणार, पण सगळ्या विखुरलेल्या department च्या इमारती इथून अगदी जवळ होत्या. त्या मूळच्या काही वेगळ्याच कारणासाठी बांधल्या असाव्यात आणि मग नंतर विद्यापीठात सामिल करून घेतळ्या असाव्यात असं वाटतं. वॉशिंग्टनमधल्या काही इतरही बाबतीत असाच आहे. बाहेरून अजिबात वाटणार नाही अशा एका बिल्डिन्ग मधे छोटं शॉपिंग सेंटर आणि restaurants होती. माझ्या ऑफिसची इमारत नवीन आणि आधुनिक सोयी असलेली, पण बाजूलच एक जुनी इमारत जे पूर्वी apartment असावं, आता hotel मधे रुपांतरीत केली होती, तिथे अगदी एका वेळी दोनच व्यक्ती मावतील एवढी आणि जाळीचा सरकवायचा दरवाजा असलेली लिफ्ट होती. तिथं एकदा जाण्याचा योग आला आणि हे पाहिलं तेव्हा खूप आश्चर्य वाटलं. मी भारतात पहिल्यांदा पाहिलेली लिफ्ट आठवली.

हा तसा पश्चिमेकडचा वरचा भाग होता, बराचसा आधुनिक आहे. महागडी घरं, दुकानं, उच्च्भ्रू, राजकारणी यांची वस्ती सगळी पश्चिमेला. पूर्वेकडच्या भागात जाण्याची वेळ लगेचच आली नाही. तसं तिथे काही पहाण्यासारखंही नव्हतं. पण बरेच वर्षानी कामाच्या संदर्भातच जावं लागणार होतं. तेव्हा माझ्या नोकरीचं ठिकाणही बदललं होतं. मला जायचं होतं ती जागा होती 'साउथ ईस्ट' मधे, अर्थातच सरकारी ऑफिस! मी नेहमीप्रमाणं पहिल्यांदा मेट्रो ने जाता येईल का अशी चौकशी केली पण माहिती देणारा म्हणाला, " मी तरी मेट्रो ने जाणार नाही ". मी काय ते समजून डायरेक्शन घेऊन भीतभीतच गेले होते. न चुकता पोचले खरी पण वॉशिंग्टनचं मी पूर्वी कधी न पाहिलेलं रूप त्यादिवशी प्रथम दिसलं. अगदी जुना, अस्वच्छ, गचाळ भाग होता. साधारण कशा प्रकारच्या लोकांचा वावर तिथे असेल याची जाणीव हो\ऊन उगाचच असुरक्षित वाटत होतं. चोर्‍यामार्‍या, ड्रग्ज, टोळ्यातल्या चकमकी, इतर गुन्हे यांचं प्रमाण इथं जास्त. अगदी भर दुपारी एका मुलीला तिथे जॉगिंग करताना बघून आम्ही कारमधून जात असताना माझ्या कलिगनं What is she doing?!!! असे उद्गार काढले होते. तिथे जाता येताना नेहमी कार मधे पुरेसा गस आहे ना याची खात्री करून घ्यायचाही सल्ला दिला गेला मला, तिथं गस स्टेशनवर सुद्धा थांबाव लागू नये म्हणून!

वेळ घालवायला पायी फिरताना मात्र नेहमीच्या मॉल च्या भागाला तोड नाही. तशा इथे काही ना काही वेगळ्या, interesting गोष्टी घडत असतात. नशीबात असेल तर एकदम ते पहायला, अनुभवायला मिळते. कशाच्यातरी विरोधात किन्वा कशाच्या समर्थनार्थ मोर्चे, धरणे, घोषणा हे तर नेहमीचेच. अशा एका रिकाम्या वीकएन्डला मैत्रीणीबरोबर फिरत असताना जरा नेहमीपेक्षा जास्त सुरक्षा व्यवस्था जाणवली. 'मॉल' वर एका जागी लोकांच मोठं कोन्डाळं होतं. नक्की काय प्रकार आहे लवकर कळले नाही पण मग 'प्रेसिडेंट येणार आहे' अशी कुजबूज ऐकली. आम्हीही थांबलो मग तिथं. बराच वेळ झाला काहीच नाही, बरं कधी, कसे याची कुणाला माहिती नव्हती. शेवटी कन्टाळून काही लोकां सारख्याच आम्हीही निघलो. गप्पांच्या नादात ते विसरूनही गेलो होतो एवढ्यात मागून हेलिकॉप्टर चा आवाज आला. आम्ही मागे वळून पाहिलं तेव्हा 'मरीन वन' त्या घोळक्याच्या मधे उतरत होतं. लगेच मागे फिरता येणार नाही इतक्या अंतरावर आम्ही पोचलो होतो. दोघीही हिरमुसलो. मैत्रीणीला तर फारच वाईट वाटलं कारण ती लांबून आलेली. तचं परत येणं झालंही पण पुन्हा तशी संधी मिळणंही कठीण होतं. आणि राजवटही बदलली होती. तिची 'त्याला' पहायची इच्छा अपुरीच राहिली!

अशीच अजून एक घटना. एकदा कॅनेडियन embassy मधे काही कामानिमित्त जाणं झालं. पुन्हा सन्ध्याकाळी जावं लागणार होतं. ही जागा तशी त्या सगळ्या ठराविक tourist attractions पासून जवळच होती, म्हणून वेळ कुठे काढावा हा प्रश्न नव्हता, कारण घाईघाईत पाहिलेल्या गोष्टी पुन्हा मनसोक्त पाहता आल्या असत्या. पण रस्ता क्रॉस करून आल्यावर समोरच एका बिल्डिन्गच्या समोर रान्ग दिसली. ती National Gallery of Art ची बिल्डिन्ग होती. तिथं Van Gogh च्या पेन्टिग्जचं प्रदर्शन त्याच दिवशी सुरु झालं होतं. रांग तशी लांब होती पण हरकत नव्हती. मी रांगेत उभी राहिले, मला आर्ट मधलं काही कळतं किन्वा बघण्यात खूप इन्टरेस्ट आहे अशातला भाग नव्हता. पण अगदी 'मोनालिसा' दिसणार आहे अशी अपेक्षा ठेवण्याइतकी अडाणी नव्हते. रांगेतली बाकी मंडळी मात्र खास प्रदर्शनाकरता भल्या सकाळी आलेली दिसत होती.
दुसर्‍या, तिसर्‍या ग्रुप बरोबर मला प्रवेश मिळाला. आत अवाढव्य दालनं आणि विशिष्ट प्रकाशरचनेत प्रत्येक दालनात मोजकीच पेन्टिग्ज लावलेली. बरीचशी निसर्गचित्रं, स्थिरचित्र, पोर्ट्रैट्स. त्यातली त्याने स्वतःची काढलेली पोर्ट्रैट्स लक्षात राहिली, आणि लक्षात राहिलं ते 'Almond Blossom'. निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर शुभ्र फुलं लागलेल्या फांद्या! ते अजूनही जसच्या तसं डोळ्यासमोर येत. त्या दिवशीच्या उरलेल्या वेळात काय केलं ते मात्र आता नाही आठवत.
पुढे काही दिवस ते प्रदर्शन चालू होतं, पॉप्युलरही झालं बरंच. नन्तर बातमी वाचनात आली की ते संपलं आणि ज्याना पाहता आलं नाही ते खूप हळहळले. मला मात्र ते सहजासहजी का पाहायला मिळालं हे अजूनही कोडंच आहे. देव एखाद्याच्या पदरात कधी कधी काही टाकतो, त्याचं त्या व्यक्तीला काहीच मोल नसतं. त्यातलाच एक प्रकार असावा.

तसं वॉशिंग्टनचं आणि शुभ्र फुलांच्या बहराचं जवळचं नातं आहेच. जपाननं मैत्रीचं प्रतीक म्हणून दिलेली ३७५० वेगवेगळ्या जातीची चेरीची झाडं वॉशिंग्टनच्या परिसरात लावलेली आहेत. वसंत ऋतूच्या आगमनाची वार्ता घेऊन येताना फुललेली ती झाडं म्हणजे राजधानीचा सुन्दर साज. त्यातली 'योशिनो' जातीची झाडं पोटोमक नदीच्या Tidal Basin भोवती लावलेली आहेत, यांचा बहर अगदी शुभ्र पांढरा असतो, पांढर्‍या फुलांची माळच दिसते पाण्याभोवती. इतर 'विपिंग हायगन', 'अकेबोनो' आणि 'क्वानझान' या जातीही इतर ठिकाणी आहेत त्यांचा बहर मात्र अगदी पांढरा ते गडद गुलाबी! त्या सुमारास, एप्रिलच्या पहिल्या - दुसर्‍या आठवड्यात तिथे Japanese Culture Festival, Parade असे कार्यक्रमही असतात. त्याला 'चेरी ब्लॉसम फेस्टिवल' म्हणतात. खर्‍या अर्थानं तो राजधानीचा उत्सव असतो.
हजारो पर्यटक यासाठी दूरवरून येतात आणि राजधानीच्या tourist season ची सुरुवात होते. वर्षाच्या याच काळात ती सर्वात सुंदर दिसते. अगदी ख्रिसमसच्या लखलखीत रोषणाईत दिसते त्याहून जास्त सुंदर. कारण किती झालं तरी ती कृत्रिम सजावट!

राजधानीच्या एवढ्या सान्निध्यात राहूनही काही गोष्टी करायच्या राहूनच गेल्या आणि काही पुन्हा पुन्हा करूनही समाधान झालं नाही. ४ जुलैच्या स्वातंत्रदिनाची आतषबाजी जवळून पहण्याची मजा औरच असं ऐकलं होतं. पण ते कधी शक्य झालं नाही. नदीच्या अलिकडेच राहणार्‍या एका मैत्रीणीच्या गॅलरीतून 'पेन्सिली' चावरचा १ / ३ भाग दिसायचा. एका वर्षी तिच्याकडे जाऊन लांबूनच तो आनंद मिळवायचा प्रयत्न केला.
सगळ्या जगावर परिणाम करणारे काही निर्णय जिथं घेतले जातात ते कॉन्ग्रेस सेशन चालू असताना आतून पहायचं होतं. तशी सोय आता आहे की नाही माहित नाही. स्पाय म्युझियम बद्दलही कुतुहल आहे, तसं ते हल्लीच सुरु झालं. ... पुन्हा पुन्हा पहावं वाटतं ते होलोकॉस्ट म्युझियम. बळी गेलेल्या लोकांच्या खाजगी वस्तूंचा सन्ग्रह मनाला स्पर्श करतो. एका छोट्या मुलाचा 'कुकी जार' तर अंगावर शहारे आणतो. कुणाला आपल्या संवेदना हरवत आहेत असं वाटत असेल त्यानी इथे जरूर भेट द्यावी.

तसा तिच्यात सतत काही ना काही बदल होत असतो. तिचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्न चालायचे. पण ९ / ११ च्या हल्ल्यात अतिरेक्यांनीही दुय्यम ठरवल्यामुळं ती ओरख़डाही न येता सहीसलामत सुटली खरी, पण त्या घटनेचं अगदी दाट सावट तिच्यावर पडलं. त्यानंतर बरेच दिवसानी भेट दिली तेव्हासुद्धा मोकळेपणा हरवला आहे हे जाणवले. सगळीकडे barricades , काही रस्ते वाहतुकीसाठी आणि माणसांसाठी कायमचे बंद केलेले. सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन बांधकाम सुरु होतं त्याची अवाढव्य यंत्रसामुग्री. कुठलाच व्ह्यू 'पिक्चर परफेक्ट' नव्हता. ९ / ११ घडण्याआधीच 'काही लोक फ्लाईट चे ट्रेनिंग घेत आहेत' अशी आगाऊ सूचना देणारी FBI ची कॉलीन रॉली, तिला 'प्रमोट करा' अशा अर्थाचे बॅनर घेऊन एका कोपर्‍यावर उभा असलेला एकांडा शिलेदार लोकांच्या मनातूनही ती घटना अजून पुसली गेली नाही याची साक्ष देत होता... त्यानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर आली असावी. ह्या वर्षाचा काही काळ तर जगाचे लक्ष असणार आहे तिच्याकडे.

काही म्हणा माझ्या डोळ्यासमोर मात्र आता 'राजधानी' म्हटलं की फक्त ती आणि तीच येते. एवढंच नाही तर दरवर्षी अशा काही गोष्टी न चुकता घडतात तेव्हाही ४ जुलैच्या संध्याकाळी कुठेही आकाशात आतषबाजी पाहिल्यावर, ... ख्रिसमसच्या सीझनमधे रेडिओवर अगदी हमखास लागणारं Maura Sullivan चं 'It's Christmas eve in Washington' ऐकून आणि वसंत ऋतूची चाहूल देताना एखादी शुभ्र फुलांनी बहरलेली फांदी वार्‍यावर डुलताना दिसते तेव्हा... नक्कीच.


मस्त लिहिलाय लेख.. स्मित आवडला.. !
मला स्वतःला वॉशिंगटन विषेश आवडलं नाही... कारण नकळत लंडन बरोबर तुलना झाली आणि मग वॉशिंगटन चा इतिहास फारच कृत्रिम वाटला..
असो..लिहित रहा.. स्मित