सदस्य प्रवेश |
लिलीचं घरलिलीनं भिंतीवर लावलेल्या लहान सहान गोष्टी काढून एका बॉक्स मधे ठेवल्या. शेवटची एक राहिलेली फ़्रेम काढून हातात घेतली. मग फ़्रेमच्या मागे आणि संपूर्ण भिंतीवर सहजच तिची नजर गेली. *** 'आपलं स्वतःचं घर हवं' हे जगातल्या प्रत्येक प्राणिमात्राचं स्वप्न असावं. ते काही फक्त माणसाचीच मक्तेदारी नाही. आणि पुन्हा त्याला मर्यादित करणारी " अमेरिकन ड्रीम " वगैरे लेबलं पण चिकटवू नयेत. तर असं हे स्वप्न लिलीचंही होतं एकेकाळी. लिलीच्या नशीबानं आणि पतीसोबत केलेल्या कष्टाचं चीज म्हणून ते पूर्णही झालं होतं. त्यावेळच्या कमाईत शक्य झालं तसं थोडसं दूरवर का होईना, पण शांत परीसरात, घराभोवती थोडी मोकळी जागा असलेलं, अगदीचं मोठं नाही पण पुरेसं, मनासारखं घर लिलीनं बांधून घेतलं. तिच्या स्वप्नपूर्तीचा आनंद पूर्ण उपभोगला. घरकुल हौसेनं सजवलं, टापटीप ठेवलं. आणि महत्वाचं म्हणजे हसतं खेळतं ठेवलं. कालांतरानं चिमणी पाखरं आली आणि त्यानी घराला घरटं बनवून टाकलं. नंतर मात्र काळ कसा निघून गेला कळलंच नाही. बरीच वर्ष लोटली. पाखरं तर घरट्यातून केव्हाच उडून गेली. लिलीलाही वाटतं, या वास्तूनं आपलं काम चोख बजावलं. तिच्या कुटुंबाला आसरा दिला. कधी तब्येतीची कुरकुर, तक्रार नाही. यात लिलीचाही वाटा बराच. तिला त्याचा अभिमानही होता. पण हल्ली तिच्यानी नाही व्हायचं तेवढं लक्ष देणं. एवढ्या मोठ्या जागेची आता गरजही नाही असं तिला आणि तिच्या पतीला वाटायला लागलं होतं. आजूबाजूचा भाग पूर्वीसारखा शांत राहिला नव्हता, त्यात बरेच बदल झाले होते. सुखसोयी जवळ आल्या होत्या, त्यामुळं परिसर गजबजला होता. भरभराटीला आला होता.आणि घराची किंमत कितीतरी पटीनं वाढली होती.. मग 'दुसरीकडे छोटसं, सध्याच्या जीवनक्रमाला साजेसं घर घेऊन रहावं आणि हे घर विकून टाकावं' असा निर्णय सहजपणेच घेतला गेला... *** कुठेतरी सुरुवात करावी म्हणून लिलीनं काही छोट्यामोठ्या गोष्टींची आवराआवर सुरु केली होती. घर पहायला येणार्या लोकाना 'अडगळ' वाटता कामा नये, असा सल्ला दिला होता तिला एजंटनी! एखादी गोष्ट कितीही भावनिक गुंतागुंतीची असली तरी काही रुक्ष, अटळ उपचार मधे येतातच. घर ही तशीच एक गोष्ट. ते घेणार्याच्या आणि विकणार्याच्या भावना कितीही नाजूक असल्या तरी शेवटी एक 'बिझनेस' म्हणून कागदपत्र, एजंट असल्या गोष्टी कशा टळणार? लिलीला वाटलं, " बघणार्याला माझ्या ह्या वस्तूंची 'अडगळ' दिसेल का? की आपलं म्हणून सजवल्यावर ते कसं दिसेल हेच ये\ईल! पहिल्यांदा या घरात पाऊल टाकल्यावर मला दिसलं तसं? " ती भानावर आली ते फोनच्या रिंगनं. फोन तिच्या पतीचाच, कुणी येणार आहे संध्याकाळी घर पहाण्याकरता म्हणून सांगायला. तिला वाटतं बरंच झालं तिनं थोडी आवराआवर केली ते! मग पुढचे सगळे विचार झटकून टाकून ती आपल्या भावी छोट्याश्या घराच्या कल्पनेत रमून जायचा प्रयत्न करू लागली. पूर्वीसारखाच, जसा ती तासनतास प्लॅन करत बसायची आपल्या पहिल्या घराचे. पण का कोणजाणे यावेळी ते तिला काही केल्या जमेना. उर्वरित आयुष्यासाठी 'डोक्यावरचं छत्र' यापेक्षा त्याबद्दल ती वेगळा विचार करूच शकली नाही. *** येणारी व्यक्ती आली. एकटाच पुरुष. तिला जरा नवल वाटलं. एवढा मोठा निर्णय घ्यायचा म्हणजे पत्नी हवीच ना बरोबर, आणि तिला नको का पसंत पडायला घर? पण मग आला असेल 'शॉर्टलिस्ट' करायला, किंवा नसेलच कुणी त्याचं म्हणत तिनं त्याबद्दल फारसा विचार केला नाही. एजंट होताच त्याच्या सोबत, त्यानं नीट माहिती दिली. त्या माणसानं केलेल्या एक दोन कॉमेंटस लिलीच्या कानावर आल्या. तसा जरा नाखूषच दिसला तो, अपेक्षे एवढं मोठं नाही वाटलं त्याला घर. जाताना तो फक्त कोरडं हसला आणि 'Thanks' म्हणाला. लिलीला त्याचा जरा रागच आला. नाही घ्यायचं तर नका घेऊ पण 'छान आहे हं तुमचं घर, Good-luck वगैरे काही बोलावं उपचार म्हणून तरी! पण एकंदरीत यावरून पुढे जाऊन काही होणार नाही असंच तिनं गृहित धरलं. तुम्हाला एखादी गोष्ट कितीही प्रिय असली तरी तिचा सौदा करायची वेळ आल्यावर लोक अधिक, उणं दोन्ही बघणार, ते अटळ आहे, मग ते किती मनाला लावून घ्यायचं? पण ती जरा दुखावलीच. दुसर्या दिवशी येणार्याना घर नीट पाहता यावं आणि तिलाही सारखा disturbance नको म्हणून ती बाहेरच पडली. आजूबाजूच्याच परिसरात फिरत राहिली. लायब्ररी, ग्रोसरी अशी नेहमीची कमं करून घरी आली तेव्हा घराबद्दलचे विचार मनात अजिबात नव्हते, कालच्या घटनेचे तर नाहीतच. *** घरी आल्यानंतर तिच्या पतीनं दिलेली बातमी ऐकून प्रथम तिच्या डोक्यातच काही शिरलं नाही. ती काल घर पहायला आलेली व्यक्ती, तो माणूस ऑफर देत होता घर विकत घेण्यासाठी. किंमतही द्यायला तयार होता चांगली. " काय फरक पडतो त्याला? तो आहे इन्व्हेस्टर. तो थोडाच राहणार आहे इथं? पुढे त्याचा या डील मध्ये फायदा झाल्याचे कारण! " तिच्या पतीने खुलासा केला. तो दुसर्या दिवशी येऊन पुन्हा एकदा घर पाहून गेला. पाहताना नजर भावनाशून्य. बरंच निरिक्षण केलं, पद्धतशीर इन्स्पेक्शनही करून घेणारच होता तो. पण वृत्ती मात्र एखादी वस्तू घेताना आपण बरोबर किंमत देतोय ना, अशी. त्याला तरी कसा दोष देणार? त्याचा बिझनेसच तो! सगळे सोपस्कार पूर्ण हो\ऊन व्यवहार व्हायला अजून काही दिवस होते, पण लिलीला काही केल्या समाधान वाटत नव्हतं. आपल्या घर अशा एका व्यक्तीला आपण देतो आहोत ज्याला त्याचं पैशा व्यतिरिक्त काहीच मोल नाही, या विचारानं तिची घालमेल होत होती. एरवी एखादी स्वतःची छोटीमोठी वस्तूही देऊन टाकताना ती योग्य माणसाच्या हाती पडतेय ना याची काळजी घ्यायची ती. हे तर तिचं घर होतं. मग कुणी कितीही चांगला मोबदला देत असलं म्हणून काय झालं.... *** जास्त विचार केला की त्रास होतो त्यापेक्षा 'तसंच व्हायचं असेल' म्हणून लिलीनं त्यावर विचार करणं सोडून दिलं. जमेल तशी आवरा आवर आणि पुढच्या आयुष्यात गुंतवून घ्यायच्या कामांचा विचार करत राहिली. सगळ्या सांसारिक जबाबदार्या संपल्यावर करावयाश्या वाटलेल्या पण राहून गेलेल्या गोष्टींची यादीच तयार ठेवली होती तिनं. त्यावर लक्ष केंद्रित केल्यावर थोडं बरं वाटलं तिला. पण मग एक दिवस तिला एक फोन आला. लिली काढलेल्या पसार्यातून आवराआवर करत असताना सगळं तसंच टाकून उठली. " मी तमारा, या भागात आलेच होते, तुमचं घर विकायचं आहे असं समजलं. मी पाहू शकते का? " येऊ द्यायला काय हरकत आहे असं म्हणून लिली 'हो' म्हणाली. आता आलीच आहे या भागात तर जाऊदे बघून, कुठं बिघडलं? मनातून तिला थोडं समाधानच वाटलं. पण उगाचच कुठल्या आशेचा किरण पकडून ठेवायचा नव्हता. तिनं घाईघाईनं काम उरकण्याचा प्रयत्नही केला नाही. राहू दिला पसारा तसाच. ती आली. एक स्मार्ट, हसतमुख, तशी तरूणच स्त्री. एक पुरुषही होता तिच्याबरोबर, त्याची तिने पती म्हणून ओळख करून दिली. दोघेही अगदी साधेच वाटले, मध्यमवर्गीय, तमाराला पाहताक्षणीच लिलीचं तिच्याबद्दल चांगलं मत तयार झालं. लिलीनं प्रथम दिलगिरी व्यक्त केली सगळ्या पसार्याबद्दल, 'तुमची बांधाबांध चालू असेल ना' म्हणून त्यानी काहीच हरकत नसल्याचं सांगितलं. मग तिनंच त्या दोघाना आपलं घर फिरून दाखवलं. त्या दोघानाही ते आवडलेलं दिसलं. तमाराचे डोळे तर सगळं पाहून झाल्यानंतर आनंदानं चमकत होते, 'हेच ते!' म्हणून. तिनं स्वप्न रंगवायला कधीच सुरुवात केली आहे यात शंकाच नव्हती. तिनं बोलूनही दाखवलं लिलीला, घर किती सुंदर आहे, आणि ठेवलंय पण छान म्हणून! लिलीचे कान जणू काही आसुसलेच होते ते ऐकायला. तिच्या डोळ्यात टचकन पाणीच आलं. तमारा लिलीकडून सगळी माहिती घेऊन निघून गेली. अपेक्षा ठेवायची नाही असं लिलीनं कितीही ठरवलं असलं तरी तिच्या मनांत कुठेतरी आशेचा किरण चमकून गेलाच! *** " काय हरकत आहे तिची ऑफर घ्यायला? किंमत मिळेल थोडीफार कमी, पण आपलं घर योग्य माणसाना मिळालं, ज्याना त्याचं अप्रूप आहे, याचं समाधान तर मिळेल. त्याचं मोल कशात करणार? " लिली आपल्या पतीला समजावायचा प्रयत्न करत होती. तिच्या पतीने उपस्थित केलेले मुद्देही तिनं ऐकून घेतले. तमारा आणि तिचा पती हे एक साधं कष्टाळू मध्यमवर्गीय जोडपं होतं. कर्ज काढून इकडून तिकडून पैसा उभा करणार. नाही जमलं तर? पण हल्ली ते कोणाला करावं लागत नाही? त्यानीही हा विचार केलाच असेक ना, आपली मजल कुठवर हे प्रत्येकाला माहित असतंच. होईल सगळं व्यवस्थित असं तिनं स्वतःला समजावलं. त्या कष्टाळू जोडप्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपल्याकडून अल्प का होईना पण हातभार लागावा असं तिला मनापासून वाटत होतं. पण एकच गोष्ट तिला समजत नव्हती, तमाराच्या पती सैन्यातला. त्याला इराकला पाठवलं जाणार होतं काही काळ.... म्हणजे नक्की किती ते अर्थातच सांगता येणार नाही. त्यापूर्वी त्याना घर घेऊन टाकायचं होतं. कशासाठी.. ? तमाराच्या सध्याच्या मनःस्थितीची कल्पना करणंसुद्धा मूर्खपणाचं आहे हे लिली जाणून होती, तरी प्रयत्न करूनही तिला काहीच अंदाज बांधता ये\ईना. लिलीच्या पतीला काही तिच्या इच्छेविरुद्ध जायचं नव्हतं, फक्त त्याला एवढीच काळजी वाटंत होती की लिलीने भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णया नंतर काही निष्पन्^न नाही झाले तर तिचा विरस हो\ऊ नये. पण मग विचारांती दोघानी आपलं घर तमारालाच द्यायचं ठरवलं. *** तमारा अगदी भरभरून बोलत होती. तिच्या घर सजावटी पासून ते अगदी फ़ॅमिलीच्या प्लॅन्स पर्यन्त. घर मिळालं की अगदी दुसर्याच दिवसापासून जणू ती कामाला लागणार होती. लिलीबद्दल तिच्या मनांत एक प्रकारची कृतज्ञता होती. जणू काय लिलीवाचून तिचं घराचं स्वप्न पूर्णच झालं नसतं. तिच्या बोलण्यात एक दोन वेळा तिच्या पतीच्या इराकगमनाचा उल्लेख आला म्हणजे, तिचा नवरा परत येईपर्यन्त त्या दोघानी ठरवल्याप्रमाणे ती घर कसं सजवून तयार ठेवणार होती यबद्दल. मग लिलीच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला This is a project for her, while he is gone. ते घरच तिचा सोबती होणार होतं आणि विरंगुळाही. लिलीला आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल कधी शंका आली नव्हती, आता तर कधी काळी येण्याची शक्यताही संपली. लिलीनं तमाराला शुभेच्छा दिल्या. मनातल्या मनांत तिचा पती सुखरूप परत येवो, त्या घरात त्यांचे दिवस मुलाबाळांसह सुखाचे जावोत अशी प्रार्थना केली. *** घर सोडताना कुणी सांगून तिला खरं वाटलं नसतं एवढं समाधान पसरलं होतं लिलीच्या चेहर्यावर. कुठल्याच दुःखद भावनेचा तिच्या मनात लवलेशही नव्हता. उरलेलं थोडंफार सामान ठेवून गाडीत बसण्यापूर्वी आपल्या एकेकाळच्या स्वप्नाकडे त्या वास्तूकडे शेवटचं पहावं म्हणून लिलीनं नजर मागे टाकली. तर तिला अतिपरिचित अशी ती वास्तू तिथं होतीच कुठे? लिलीला तिथं उभ दिसलं ते तिच्या... तमाराच्या स्वप्नातलं घर! समाप्त. |
|
अगदी उत्स्फुर्त पणे प्रतिसाद द्यावा वाटला.
छानच लिहिलय....... खूप आवडलं.
खूपच छान लिहीलंय.
मस्तच लिहिलय!! खूप आवडल.