साहित्य संमेलन : मदत हवी आहे

Submitted by आरती on 19 August, 2008 - 01:20

२००९ मध्ये फेब्रुवारी १४,१५ आणि १६ तारखांना सॅनफ्रॅन्सिस्को उपसागरीय भागात विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे, ही बातमी बहुतेकांना माहिती असेलच. भारताबाहेर पहिल्यांदाच असे अधिकृत साहित्य संमेलन होणार आहे, आणि तेही बे एरिया, ह्या विश्वजालाच्या कर्मभूमीत ! हे साहित्य संमेलन नेहमीपेक्षा वेगळे असावे, ही माफक अपेक्षा रसिकांनी ठेवायला काहीच हरकत नाही. पण मुळात हे वेगळेपण तरी कसे असावे, ह्याबद्दल विचारमंथन करीत असताना, एका कार्यक्रमाची कल्पना सुचली, आणि ती संयोजकांना कळवली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे, म्हणून हे आवाहन.

कार्यक्रमामागील भूमिका: विश्वजाल लोकप्रिय झाल्यानंतर प्रकाशनाच्या विविध संधी सहज उपलब्ध झाल्याने साहित्याची लोकाभिमुखता वाढली. चलचित्रांच्या बाबतीत यू-ट्यूबने क्रांती घडवली. छायाचित्रांत फ्लिकरने. मुद्रित साहित्यापेक्षाही अनुदिन्यांवर प्रकाशित केलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकते. अद्याप मराठी साहित्यात हे आमुलाग्र परिवर्तन जरी दिसत नाही, तरी मराठी प्रकाशनाची वाटचालही त्याच दिशेने होत आहे, हे स्पष्ट आहे. मराठी अनुदिन्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत झालेली अमाप वाढ ही त्या वाटचालीचीच निदर्शक आहे. मराठीचे हेच भविष्य आहे, असे म्हणायला हरकत नाही. नव्हे, ह्याकडे दुर्लक्ष करणे, किंवा ही वाटचाल थांबवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ह्या नवीन युगातले स्वत:चे अस्तित्वच नाहीसे करणे. हा कार्यक्रम म्हणजे, मराठी साहित्याच्या भविष्याची नांदी.

कार्यक्रमाची रूपरेखा: एकूण २-३ तास. काव्यवाचन आणि काव्यगायन. फक्त त्यातल्या कविता कुठल्याही पुस्तकांत, मासिकांत, किंवा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या नाहीत. ह्या कविता फक्त अनुदिन्यांवर आणि इतर मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या असतील. कवींची नावे / टोपणनावे देखील जालाबाहेर फारशी प्रसिद्ध नसतील. हेच नाही तर, काव्यवाचन आणि काव्यगायन करणारे, आणि संगीत दिग्दर्शक देखील "प्रोफेशनल" नसतील.

मदत हवी आहे: हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे. आम्ही सर्व "जालकवींना" आवाहन करतो, की आपल्या ज्या कवितांचा ह्या कार्यक्रमात अंतर्भाव व्हावा असे आपल्याला वाटते, त्या आम्हाला ईमेलने पाठवा ! (इमेल कृपया युनिकोडमध्येच ठेवा, आणि कवितेसोबतच, तुमचे जाहीर करण्याचे नाव -टोपणनावही चालेल-, संपर्काचा ईमेल-पत्ता, आणि स्वत:बद्दल एक-दोन ओळी.) जे जालकवी नाहीत, त्यांनी आपापल्या ओळखीच्या, आवडत्या जालकवींकडे हे आवाहन पाठवावे, इतर मराठी संकेतस्थळांवर, आणि स्वत:च्या अनुदिन्यांवर हे आवाहन प्रकाशित करावे, ही नम्र (पण आग्रहाची) विनंती. तसेच ह्या कार्यक्रमासाठी एखादे समर्पक नावही सुचवावे.

आपापल्या कविता आम्हाला खालील पत्त्यांवर पाठवाव्यात.

मिलिंद भांडारकर (milind [DOT] bhandarkar [AT] gmail [DOT] com)
चक्रपाणि चिटणीस (chakrapani [DOT] chitnis [AT] gmail [DOT] com)

([dot] ऐवजी ".", आणि [AT] ऐवजी "@" वापरावे.)

धन्यवाद !

गुलमोहर: 

समजा कविता पाठवल्या तर त्याचं पुढे काय होणार ? हे नीटसं कळलं नाही. थोडं सविस्तर सांगता येईल का ? प्रत्येकी किती कविता अपेक्षित आहेत ? त्याची स्क्रुटिनी सिलेक्षन इत्यादी कसं असेल ? त्या सादर/प्रकाशित कशा कुठे होणार?

मला कविता करता येत नाहीत पन येक झक्कास गोस्ट पाटवू का ? कविता ऐकनार्‍या मंडलीला थोडी करमनुक नको का अदनं मदनं Wink
.
छान उपक्रम आहे. तुम्हाला संयोजक मंडळाचे मान्यता आली आहे का ? असेल तर हा कार्यक्रम साहित्य संमेलनात होणार का ? अशी थोडी अजुन माहिती द्या ना.
.
वेळ काढुन तुझ्या कविता पण पाठव. नाव हवे तर माझे दे Wink

ह्या कविता सादर कोण करणार?

त्या त्या कवीने तिथे हजर असणे आवश्यक आहे का? तसे असेल तर फक्त उसगाव मधील कवींनीच कविता पाठवण्यात अर्थ आहे.

    ================
    हीच शोकांतिका तुझी माझी
    काच शाबूत पण चरे होते

      -वैभव जोशी यांचा गझल अल्बम ’सोबतीचा करार’!
      प्रकाशन सोहळा : १ सप्टेंबर
      एस. एम. जोशी हॉल, पुणे

      मंडळी मला यातले फारसे काही सांगता येणार नाही .. मी on behalf of हे post टाकले आहे.

      वर दिलेल्या email ids वर तुमच्या शंका विचारल्या तर सविस्तर उत्तरे मिळु शकतील.

      >>> मिलिंद भांडारकर (milind.bhandarkar@ gmail.com)
      >>> चक्रपाणि चिटणीस (chakrapani.chitnis@gmail.com)