
(श्री कनकादित्य)
कोकण जसे आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते प्रसिद्ध आहे ते तेथील सुबक मंदिरे आणि त्यांच्या गुढरम्य दंतकथांबद्दल. मागील लेखात आपण आडीवऱ्याच्या श्री महाकाली मंदिराला भेट दिली. आडिवऱ्यापासून जवळच असलेले व महाराष्ट्रातील एकमेव असे सूर्यनारायणाचे मंदिर म्हणजेच आपल्या आजच्या भेटीचे ठिकाण कशेळीचे "श्री कनकादित्य मंदिर".

कशेळी गावचे भुषण असलेले श्री कनकादित्य मंदिर रत्नागिरिपासून ३२ आणि राजापुरपासून ३५ किमी अंतरावर आहे.
आपल्या भारतात फार कमी सूर्यमंदिर आहेत. सौराष्ट्रात प्रभासपट्टण, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या भागात काही सूर्यमंदिर
आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात राजापुर तालुक्यातील हे सर्वात मोठे देवालय गावच्या मध्यभागी विस्तिर्ण सपाट प्रदेशात बांधले आहे. या मंदिराला उज्ज्वल अशी ऐतिहासिक पार्श्वभुमी लाभली आहे. मंदिरात जी आदित्याची मूर्ती आहे ती
सुमारे आठशे वर्षापूर्वी सोमनाथ नजिकच्या सूर्यमंदिरातून आणली गेली आहे.

कशेळी गावात या मूर्तीचे आगमन कसे झाले याबद्दल मंदिराच्या पुजारींनी एक दंतकथा सांगितली ती अशी की,
काठेवाडीतील वेटावळ बंदरातून एक नावाडी आपला माल घेऊन दक्षिणेकडे चालला होता. त्याच्या जहाजामध्ये हि
आदित्याची मूर्ती होती. जहाज कशेळी गावच्या समुद्रकिनारी आले असता अचानक थांबले. खूप प्रयत्न केला पण जहाज
मागेही जाईना आणि पुढेही जाईना. शेवटी नावड्याच्या मनात आले कि जहाजात जी आदित्याची मूर्ती आहे तिला
इथेच स्थायिक होण्याची इच्छा दिसते. मग त्याने ती मूर्ती कशेळीच्या समुद्रकिनारी असलेल्या एका नैसर्गिक गुहेत
आणून ठेवली आणि काय आश्चर्य! बंद पडलेले ते जहाज लगेचच चालू झाले. कशेळी गावात पूर्वी कनका नावाची एक
थोर सूर्योपासक गणिका राहत होती. एकदा तिच्या स्वप्नात सूर्यनारायणाने येऊन सांगितले की मी समुद्रकिनारी एका
गुहेत आहे तु मला गावात नेऊन माझी स्थापना कर. कनकेने हि हकिकत गावात सांगितली. गावकऱ्यांनी समुद्रावर
जाऊन शोध घेतला असता आदित्याची हि मूर्ती गुहेत सापडली. पुढे कनकेने गावकऱ्यांच्या मदतीने मंदिर बांधून तीची
स्थापना केली. कनकेच्या नावावरुनच या मंदिराला "कनकादित्य" आणि ज्या गुहेत आदित्याची हि मूर्ती सापडली ती
गुहा "देवाची खोली" म्हणून ओळखली जाते.

रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक व पुरातन महत्त्व असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी देशातील विविध भागातून
लोक येतात. चारही बाजुला भक्कम चिरेबंदी असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात इतर देवदेवतांचीही सुबक मंदिरे आहेत.
कोकणातील इतर देवलयाप्रमाणेच श्री कनकादित्यचे मंदिरही कौलारू आहे. मंदिर परिसरातील दीपमाळा, फरसबंदी
पटांगण, शांत वातावरण यामुळे मंदिर पाहताक्षणी मन प्रसन्न होते. मंदिरात कोरीव कलाकुसर केली असून ते
पुराणकालीन आहे. छतावर वेगवेगळ्या देवीदेवतांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर असून
श्री कनकादित्याची मूर्ती हि अतिशय आकर्षक आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून देवस्थानच्या भक्तनिवासात
राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते.


पन्हाळगडाचा राजा शिलाहार याने कशेळी गावात दररोज बारा ब्राह्मणांना भोजन घालण्यासाठी येनाऱ्या खर्चाकरीता
गोविंद भट भागवतांना कशेळी गाव इनाम दिला. त्याबद्दलचा ताम्रपट आजही मंदिरात पाहवयास मिळतो. गोविंद भट
श्री कनकादित्याचे पुजारी होते. आजही श्री कनकादित्याच्या पुजेचा मान त्यांच्या घराण्याला दिला जातो. अशा या
पुरातन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिल्याचे सांगितले जाते. तसेच इतिहासाचार्य राजवाडे, महोपध्याय
दत्तो वामन पोतदार, प्राध्यापक गंगाधर गाडगीळ, माधव गडकरी यांचीही श्री कनकादित्यावर श्रद्धा होती.
दरवर्षी रथसप्तमीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. पाच दिवस साजरा होणाऱ्या या उत्सवाच्या काळात
कालिकावाडी येथून कालिकादेवीला वाजत गाजत गावात आणून देविचा मुखवटा श्री कनकादित्याच्या शेजारी ठेवला
जातो. कालिकादेवीबरोबर आडिवऱ्याची भगवती देवी हि तिची पाठराखीण म्हणून चार दिवस मुक्कामाला येथे येते.
उत्सवाच्या काळात किर्तन, प्रवचन, आरती, पालखी याचे आयोजन केले जाते. मंदिराचे कामकाज पाहणारे बारा जणांचे
विश्वस्त मंडळ या कार्यक्रमाचे चोख आयोजन करतात.
महाराष्ट्रातील एकमेव अशा या सूर्यनारायणाच्या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या.
जायचे कसेः
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.
रत्नागिरी पासून अंतर - रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी (३2 किमी)
राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे, कशेळी (35 किमी)
योगेश, फोटो आणि वर्णन छान.
धन्यवाद!
हा तुझा उपक्रम माला फार आवडला आहे. मलाही असे फोटो टकून महिती द्याविशी वटते पण लेकाचे फोटो टाकताच आले नाहीत. छान माहिती देतोस. हतोटी जमली आहे झकास !!
...........................अज्ञात
चिनू/अज्ञात आपल्या प्रतिसादाबद्दल आभार!
तिन वर्षांपुर्वी दिवाळीनंतर गणपतीपुळ्याला गेलेलो तेव्हा कशेळीच्या मंदिराला भेट दिली होती.. तेव्हा नुकताच कुठलातरी उत्सव झाला होता आणि त्या निमित्ताने सुर्याचा चांदीचा मुखवटा वगैरे गोष्टी बाहेर होत्या, तिथल्या पुजारीबाबांनी अगदी प्रेमाने त्या सगळ्या गोष्टी आम्हाला दाखवल्या, तिथल्या कथा सांगितल्या.
मंदिराचा परिसर अगदी शांत, स्वच्छ असा, खुप आवडला. खुप प्रसन्न वाटले तिथे जाऊन. मंदिर तेव्हासुध्दा आता फोटोत दिसते आहे तसेच सजवले होते.
योगेश, मंदिरभेटींचा हा उपक्रम खुप छान आहे. महाकालीच्या मंदिराला पण भेट देणार आहे. दोन महिन्यापुर्वी धामापुरच्या भगवती मंदिराला भेट दिली होती. तुम्हीही भेट दिली असल्यास जरुर लिहा. वाचायला आवडेल.
साधना
धन्यवाद साधना!
भगवती मंदिराला भेट देण्याचा योग अजुनतरी आला नाहि
पण खुप ऐकले आहे भगवती देवी आणि धामापुर तलावाबद्द्ल (तलावातुन सोन्याचे दागिने देणार्या देवीची दंतकथा देखील ऐकली आहे.)
मस्त माहिती
कोकण भेटीला आणता आहात, खूप खूप धन्यवाद 
मनातल्या मनात देवळाच्या प्रांगणात चालले, सभामंडपात थोडा वेळ बसले.... परत कोकणात कधी जायला मिळेल कोण जाणे....
योगेश माहितीबद्दल धन्यवाद!
आम्ही बर्याचदा पावसला जातो.... एक दोन वर्षांपुर्वी कशेळी आणि अडिवर्यालाही जाउन आलो.... पण ही तु सांगितलेली कथा/दंतकथा माहित नव्हती.
हो तो ताम्रपटही आम्हाला दाखवला होता त्या पुजार्यांनी!
अजुन एक... कोकणातल्या बर्याचश्या देवळात (कशेळी आणि अडिवर्यालाही ती आहे) एक विहिर असते.... ज्याला दोर किन्वा रहाट असे काही नसते, पायर्याही नसतात.... एक लाकडाचा ताण असतो आणि त्याला एक बांबू अड्कवुन त्याच्या तळाशी एक घागर(मोठ्या तोंडाची) किन्वा बादली अडकवलेली असते.... याला काहीतरी एक नाव आहे....कुणाला आठवतय का?
आयटी/स्वरूप धन्यवाद!

स्वरूप अगदी खरे आहे विहिरीबद्दल. मी सुद्धा पाहिल्या त्या. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्याला "लाट" असे म्हणतात. माझ्या दोन्ही लेखात त्याचा उल्लेख करायचा राहुन गेला.
त्याची काहि प्रकाशचित्रे:
सही योगेश.... मस्त एकदम डिटेल फोटोज!
माझ्याकडे कुठेतरी त्याचा व्हिडिओ पण आहे.... सापडला की अपलोड करतो कुठेतरी आणि इकडे लिंक देतो.
"लाट" सुद्धा म्हणत असतील त्याला, पण मला दुसराच कुठलातरी शब्द ऐकल्यासारख वाटतय..... आठवला कि सांगतो!
धन्यवाद स्वरूप!
नक्कि अपलोड करा आणि दुसरा शब्द आठवल्यावर सांगा.
हा खरंच आपला अमुल्य असा ठेवा आहे (जो मी आतापर्यंत कोकणातच पाहिला आहे) तो सगळ्यांना समजलाच पाहिजे.
आठवण करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार!
छान माहिती! जमल तर एकदा जायलाच हवे!