काळा कुडा

आपण यापुर्वी पांढर्या कुड्याची ओळख करून घेतली आहेच. ( यालाच कुटज असे नाव आहे. यापासून कुटजरिष्ट हे आयुर्वेदिक औषध करतात. याच्या फ़ुलांची भाजी करतात. )
त्या पांढर्या कुड्याचा जंगलातला भाऊ म्हणजे हा काळा कुडा. पांढरा कुडा तसा विपुल असतो, पण त्यामानाने या काळ्या कुड्याची झाडे कमी दिसतात.
याची पाने भाल्यासारखी टोकदार साधारण दहा सेमी लांबीची असतात. खोड तपकिरी रंगाचे. झाड दहा मीटर्सची उंची गाठू शकते.
याची फ़ूले शुभ्र रंगाची पाच पाकळ्याची आणि आकाराने सुबक असतात. मधल्या पुंकेसराभोवती छोटे रिंगण असते त्याने फ़ुलाला वेगळाच उठाव येतो. पांढर्या कुड्याची फ़ुले उन्हाने पिवळी पडतात पण हि मात्र शुभ्रच राहतात.


फ़ुलानंतर या झाडाला एकाच देठावरून दोन नाजुक शेंगा लागतात. त्या साधारण फ़ुटभर वाढल्या कि एक शेंग वक्राकार होते आणि दुसर्या शेंगेला जाऊन चिकटते. रोमन D सारखा हा आकार होतो. हा बंध बराच दृढ असतो. असल्या रियुनियनचे दुसरे उदाहरण नसेल.
या शेंगा पुढे उकलतात आणि त्यातून रेशमासारख्या धाग्यात गुंडाळलेल्या बिया वार्यावर उडतात.

या झाडाचा चीक शुभ्र दूधासारखा निघतो. या चिकाचे काहि थेंब दुधात घातले तर दूध विरजून घट्ट होते पण आंबट होत नाही. कोकणात डोंगराळ भागात हि झाडे दिसतात. मी रामटेकलाही ही झाडे विपुल बघितली.
याचे शास्त्रीय नाव Wrightia tinctoria विल्यम राईट या स्कॉटिश वनस्पतीतज्ञाच्या स्मरणार्थ, ठेवलेले.