माझा 'श्वास' - ४

आधीच्या एका प्रकरणात म्हणल्याप्रमाणे पटकथेच्या प्रक्रियेचा महत्वाचा भाग म्हणजे चित्रीकरण स्थळे शोधणे. त्याप्रमाणे संदीप पुणे परीसरात आणि कोकणातही फिरत होताच. सुरूवात कुठे झाली ते वर आलंच आहे. आत्तापर्यंत त्याने बघितलेल्या जागा पटकथेला आकार देत होत्या. व्यक्तिमत्व देत होत्या. पटकथा अधिक जिवंत व्हावी यासाठी मदत करत होत्या.

आता या अनेक जागांच्यातून प्रत्यक्ष चित्रीकरणाची स्थळे नक्की करायची होती. त्यांचे तपशील जमवायचे होते. त्यांच्या कानाकोपर्‍यासकट. पटकथेचा पोत, व्यक्तिरेखांचं अस्सलपण दिसण्यात अधोरेखित करणार्‍या जागा आता नक्की करायच्या होत्या.

आतापर्यंत पटकथेतील किंवा दिग्दर्शकाच्या डोक्यात असलेली चित्रपटाची दृश्य संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीची प्रक्रिया आता सुरू होत होती. चित्रपटाची दृश्य संकल्पना म्हणजे संपूर्ण चित्रपट कसा दिसणार आहे, चित्राचे रंग, पोत, त्यातल्या रेषा कश्या कश्या असणार आहेत, त्यात कश्या कश्या तर्‍हेने काय स्वरूपाचे दृश्यबदल होणार आहेत याचा एक आराखडा. यातील बदल हा केवळ स्थळबदलापुरताच अपेक्षित नाही. सगळ्या दिसण्यातून येणारा, निर्माण होणारा अनुभव महत्वाचा आहे. त्यामुळे नदीचा तीर म्हणला की नदीच्या पाण्याचा रंग (सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी), नदीचं वळण, तीरावरची झाडी, त्यांची हिरवाई, गवताचे रंग, मातीचा किंवा वाळूचा पोत हे सगळं सगळं बारकाईने समजून घेऊन आपल्या आत उतरवावं लागतं. इथे visual designer चं काम सुरू होतं. दिग्दर्शकाच्या डोक्यात या सगळ्या गोष्टींचा उत्तम अंदाज होता. आणि याबाबतीतला उरला हातभार द्यायला छायालेखक संजय मेमाणे होता आणि मीही होतेच.

दिग्दर्शकाची पटकथेची, व्यक्तिरेखांची व दृश्याची हाताळणी हे सगळं समजावून घेतल्याशिवाय दिग्दर्शकाच्या कल्पनेतलं दृश्य आमच्या कल्पनेशी मेळ खाणार नव्हतं त्यामुळे कोकण फिरताना दिग्दर्शकीय संकल्पना आपल्या आत उतरवणे हे महत्वाचंच. अर्थात माझ्या सुदैवाने बरेच आधिपासुन मी हे करतच होते. दिग्दर्शकाला सगळाच धुंडाळत होते तेव्हा हाताला लागलेल्या बर्‍याच गोष्टींबरोबर हे सगळे होतेच.

पहिली लोकेशन बघण्याची ट्रिप कधी झाली ते मी आधी सांगितलंच आहे. नंतर मात्र आम्ही खरोखरच लोकेशन शोधण्यासाठी, अभ्यासासाठीच कोकणात, सिंधुदुर्गात फिरलो.

प्रत्येक जागेचे तपशील गोळा करण्याची पद्धत तशीच. जाउ त्या प्रत्येक ठिकाणी होकायंत्र ठेवून सगळ्या दिशा, सुर्यप्रकाशाच्या दिशा, झाडे, डोंगरकडे, समुद्राचा किनारा इत्यादी इत्यादी लिहून किंवा चित्र काढून ठेवायचं. फेब्रुवारी मार्चच्या सुमारास शूट होणार त्यामुळे त्यावेळेला तीच जागा कशी असेल याचा अंदाज घ्यायचा. अश्या सगळ्या अगदी मूलभूत गोष्टी करतच होतो पण त्याआधी मुळात कोकणातली दृश्ये म्हणजे फोनच्या दृश्यातले कटस आणि शेवट सोडला तर सगळा आठवणीतला मामला आहे. तेव्हा आजोबा आणि परश्याच्या भावविश्वाशी निगडीत सगळ्या जागा हव्यात. आणि दृश्य त्या त्या वेळेच्या मनस्थितीत परश्या किंवा आजोबांना जे आठवू शकेल त्याच्याशी संबंधित हवे. कथेला, कथेतल्या परिस्थितीला, अनुभवाला अधोरेखित करणारे हवे. हा सगळा तोल सांभाळत सगळा भाग अभ्यासायला लागलो. एका ६ वर्षाच्या मुलासाठी कोकणातल्या छोट्या गावातलं खाउन पिउन सुखी आयुष्य कसं कसं असेल, त्याच्या जगात कोण कोण आणि काय काय असेल ह्याचा अंदाज घेणं हेही सुरू केलं. ही प्रक्रीया दोन बाजूंनी होत होती. संदीपने परश्याबद्दल त्याच्या कुटुंबाबद्दल मोजके संदर्भ दिले होते. त्या संदर्भाशी मिळणार्‍या व्यक्तिरेखा दिसतायत का शोधणं आणि संदीपने दिलेल्या संदर्भातून ती व्यक्तिरेखा आपल्या डोक्यात उभी करत जाणं. दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून होत्याही आणि नाहीही पण कोकणातली स्थळं(चित्रीकरणासाठीच!) शोधतानाच व्यक्तिरेखांचा अभ्यास चांगला होत होता.

परश्याच्या घरात आधुनिक वस्तुंची समृद्धी आणि चकचकाट नसणार होता पण अठरा विश्वे दारीद्र्यही नसणार होतं. अचानक चार माणसं आली तर आमटीभाताला घर महाग असणार नव्हतं. उन्हातून ताबडत आलेल्या अनोळखी पाहुण्याला पटकन झाडावरून उतरवून गार शहाळं देण्याची वृत्ती आणि सुबत्ता दोन्हीही परश्याच्या घरात असणार होती. अनोळखी पाहुण्याला आपलसं करेल असं प्रसन्न अंगण आणि उघडं दार असणार होतं. आणि अश्या घरात रहाणारे लोक हे परश्या, आजोबा, परश्याचे आईवडील असणार होते.

मुंबई गोवा महामार्गावर कुडाळच्या आधी काही किलोमीटर ओरोस म्हणून एक गाव लागतं तिथे राजधानी नावाचं हॉटेल आहे. राजधानीचे आनंद डिचोलकर हे संपुर्ण सिंधुदुर्ग फिरलेले आहेत. निवतीचा किल्ला, भोगव्याचा समुद्रकिनारा या काही गोष्टी त्यांच्याच पोतडीतून आम्हाला कळलेल्या.

सकाळी ८ पर्यंत ओरोसचं राजधानी सोडायचं आणि कुडाळ, मालवण व वेंगुर्ले या पट्ट्यातला एकेक भाग बघत बघत जायचा आणि रात्री ९ - १० पर्यंत कधीतरी परत यायचं असा या ट्रिप्सचा दिनक्रम असायचा. आधीच्या पाटीपासून पुढच्या पाटीपर्यंतचे किलोमीटर, कुठला फाटा कुठून कुठे किती अंतरावर आहे इत्यादी सगळं लिहून ठेवत परश्याचं घर शोधत जायचं. परश्याचं शेत, परश्या मुंबईहून परत येईल तो नदीकाठ सगळं सगळं शोधत फिरायचं. आपल्या संकल्पनेच्या जवळचं काही दिसलं की गाडीतून उतरायचं आणि कुण्या अनोळख्याच्या अंगणात जाऊन त्यांच्याच घराची पहाणी करायची. कुणी विचारलं तर सगळा पाढा वाचायचा.... का, कशासाठी इत्यादी इत्यादी. मग कुणी अगत्याने गुळपाणी देत नाहीतर कंटाळल्या चेहर्‍याने माना डोलावूनच हो नाही म्हणत. एखाद्याचं घर लांबून छान वाटे पण अंगणात गेल्यावर संदीपचा चेहरा नकार देताना दिसे. असं करत करत सगळा परीसर पिंजून काढत होतो.

असं करता करता सिंधुदुर्गातला एकेक खजिना समोर येत होता. कोकण समजत होतं. तिथला माणूस, त्याच्या जिव्हाळ्याच्या जागा त्याही समजत होत्या.

फिरता फिरता एक दिवस गाडीने पाट(हे गावाचे नाव आहे!) सोडले आणि थोड्यावेळाने परुळ्यामधे प्रवेश केला. आज पाट परुळे हाच पट्टा होता. उजव्या बाजुला डोंगर असल्याने तिकडे काही घरं सापडणार नव्हतीच. डाव्या बाजुला दरी होती त्यामुळे इथे काय असणार अश्या विचारात होतो तेवढ्यात डावीकडे रस्त्यापासुन थोडं खोल काहीतरी सुंदर दिसलं. खरंच दिसलं की भास म्हणून ड्रायव्हर ला गाडी मागे घ्यायला सांगितली आणि गाडी थांबवून पाह्यलं. एक हसरं अंगण, कौलारू घर आणि पांढरा चाफा आमच्याकडे बघून खुदखुदत होता.

हेच ते घर आणि चाफा. पण ही फ्रेम चित्रपटातली आहे. त्यामुळे आस्पेक्ट रेश्यो सिनेमास्कोप आहे. १:२.३५ असा.
11-Parashuraam_s-house.jpg


मस्त अज्जुका.......

मला ह्या चित्रपटातली सगळ्यात जास्त आवडलेली दृश्यचौकट म्हणजे आजोबा आणि नातू ओंडक्याच्या साकवावरून चालत येताहेत, आजोबांच्या हातात शहाळी होती बहुतेक, खूपच सुंदर फोटोजेनिक दृश्य होतं ते.... आणि डॉक्टरांचा बंगलाही आवडला होता.

पुढचे भाग येऊ देत लवकर...



मंजू.... त्या दृष्यात आजोबांच्या खांद्यावर फणस होता त्यामुळे तोल सांभाळणं कठीण होतं.... तशात नातू उड्या मारून ते साकव हलवत होता... मस्त होतं...

अज्जुका,
छान चाललंय... पुढच्याची वाट पहातोय... बिझी शेड्यूल मधनं वेळ मिळाला की बाकी कशाच्याही आधी हे घेता आलं तर बघ...



मस्त!!!! फोटो बघून आमच्या कोकणातल्या घराची आणि सुंदर सकाळची आठवण आली. श्वास सारखंच हिरवंगार कोकणदर्शन गोजिरीमध्येही झालं होतं. तो भाग मला वाटतं देवगड च्या आसपासचा होता



अजूक्का, आता तू माझ्या घरी आलीस..
.
.
मी या 'पाट' गावचा. आमची शेती आहे तिथे... परूळे हे माझे आजोळ.. तिथे मी मराठी शाळेत होतो एक वर्षं...
.
.
गावातली घरंही माझ्या ओळखीची....
.
त्या छोट्याला पोस्टमन पत्र देतो, ती पोस्टऑफीस समोरची जागा, मागचे गौरीशंकराचे मंदीर हे माझ्या आजोबांचे..... त्यांचं घर पोस्टाच्या मागे आहे...
.
.
अश्विनच्या जागी मी मलाच बघितले कोकणात....
.
.
तुझं लिखाण चांगलं चाललं आहे.. लिहीत रहा...
.
विनय देसाई



नी,
छान उलगडत जातोय तुमचा प्रवास. पुढचे सांग.



छान चाललय्.फोटो आवडला.चित्रपट पहाताना एव्हढ लक्षात येत नाही.भारी फोटो आहे.जरा लवकर येउ देत



कीत्ती दिवसांनी पुढचा भाग टाकलास अज्जुके!! मस्त चाललंय. चित्रपट इतका आवडला होता, त्यामुळे तो बनवतानाच्या अनुभवांना वाचण्यात खुप मजा येतेय. पुढचे भाग जरा पटपट पोस्टलेस तर मग लिन्क तुटणार नाही. स्मित



अज्जुका........ मस्त सुरु आहे गं प्रवास.... पण खूप वाट बघायला लावतेस गं...... अरेरे मला कल्पना आहे तू बिझी असतेस..... पण लवकर लिही ना गं....!! खूप खूप उत्सुकता आहे गं...!! कोकणातलं घर तर एकदमच आवडून गेलंय. अता पुढे......?



छान आहे सफर एका निर्मितीची..



माझी बाळबोध शंका. एखाद्या स्थळाची रंगसंगती मनाप्रमाणे नसेल तर ती पुढच्या प्रक्रियेत सुधारता येते का ? खुपदा सिनेमातले पाणी आणि आकाश निळेशार दिसते, तेवढे प्रत्यक्ष डोळ्याना दिसत नाही, ते कसे घडवतात ?



चित्रपटात दिसणारी स्थळाची रंगसंगती ही दिवसातली व वर्षातली वेळ, कॅमेर्‍याचा प्रकार, लेन्स आणि रॉ स्टॉक या सगळ्यावरच अवलंबून असते. आणि त्या सगळ्याचा अंदाज मुळात स्थळे शोधताना दिग्दर्शकाला असावा लागतो कारण वरच्या सगळ्या मुद्यांना धरूनही आपण सगळी रंगसंगती पार उलटी पालटी करून टाकू शकत नाही (निगेटिव्ह सदृश नको असल्यास). पोस्ट प्रॉडक्शन मधे कलर करेक्शन हा भाग असतो पण तो संपूर्ण रंग बदलू शकत नाही. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या करू शकतो पण करू नये. संपूर्ण दृश्याचा आणि मागच्या पुढच्या दृश्यांचा कलर बॅलन्स घालवून आपण काही करू शकत नाही.
तुमचा दुसरा प्रश्न पाणी निळेशार इत्यादी... त्याबद्दल अजून काही तपशील पुढच्या एकदोन भागात येणार आहेत.
पण आपल्या डोळ्यांच्या कैकपट कमी ताकद (रंगपोताचे तपशील पकडण्याची) या कॅमेर्‍याच्या लेन्सेस मधे असते. त्याचाही परिणाम असू शकतो.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home



व्वा. मस्तच.



वाचताय आणि प्रतिक्रियाही देताय आणि त्याही इतक्या मस्त... त्याबद्दल सगळ्यांचे आभार!
विनय 'श्रीमंत' लोक तुमच्या आजोळपैकी का?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home



नाही हो.. श्रीमंत लोक आमच्या आजोळच्या शेजारचे..... हाहा

(माझी पणजी श्रीमंतांच्या घरी स्वयंपाकीण होती.....)

पण ते सगळे सामंत, आणि एकामेकांचे भाऊबंद....

पण गाव माझा.. अख्खा गाव माझा (च)...

विनय देसाई



हे पाट गाव मालवणातुन कुडाळला येताना, वाटेत चौके वगैरे नावाचे गाव लागते त्या रस्त्यावर आहे का?



नी,
मस्तच ग. आज बरेच दिवसांनी मायबोलीला भेट दिली आणि तुझा 'श्वास' पुर्ण वाचुन काढला. एकदम मस्त वाटले. बाकीचे भाग पण जमेल तसे पण लवकर पुर्ण कर.
वाचताना 'श्वास' मधले एक एक दृष्य डोळ्यासमोर दिसते आहे. खूप जीवंतपणा आला आहे लिखाणामधे. आता कोकणातले नवीन लोकेशन्स समजल्यामुळे भटकायला कारण मिळाले.



अज्जुका, मस्त माहिती आहे. अजून डीटेल्स वाचायला आवडतील.



़़ तुम्हि लिहता न तयातुन सगला चितत्रपत दोल्यसमोर उभआ रहतोय.पुध्च्य भागाचि आतू्र्तेने वात बघ्तेय.
ध्न्यवाद!
वीना



शंतनू,
हो तेच हे गाव.
मिहिर,
भटकंतीला काय काहितरी निमित्त हवं इतकंच हो कि नाही!! स्मित

फारेंड आणि वीणा,
आभार.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home



श्वास चे चारही भाग वाचले. चित्रपट बनवताना करावी लागणारी तयारी समजली, पण त्याहीपेक्षा ज्या आत्मियतेने तुम्ही या प्रकल्पावर काम केलंत ते अधिक भावलं.
निखिल.



मी पण कोकणातली..कट्ट्याजवळची... श्वास बघताना पहिल्यान्दा असे वाटले की खरे खुरे कोकण टिपले आहे. नाहितर बाकी ठिकणी पाहुन वाटायचे काहीतरी missing आहे... माझा पण तो आजोबा आणि नातू ओंडक्याच्या साकवावरून चालत येताहेत हा Shot आवडता आहे.. तुमचे इतर लेखही खूप सुरेख आहेत.