परिचयः Out of my comfort zone - Steve Waugh

out_of_my_comfort_zone.jpg

स्ट्रेलियाचा २००४ साली निवृत्त झालेला कर्णधार स्टीव वॉ याचे आत्मचरित्र Out of my comfort zone मागच्या वर्षी प्रकाशित झाले. क्रिकेट च्या आवडीमुळे तर हे वाचायचे होतेच, पण आणखी एक महत्त्वाचे कारण होते. करीअर च्या सुरुवातीला विशेष यशस्वी नसलेला वॉ एकदम नंतर इतका मोठा खेळाडू कसा झाला, त्यासाठी त्याने नक्की काय केले हे माहिती करून घेण्याची प्रचंड उत्सुकता होती. तसेच तो नेतृत्व करत असताना त्याच्या संघाचा खेळ महत्त्वाच्या सामन्यांमधे बरोबर कसा उंचावायचा याचे ही कायम आश्चर्य वाटत होते. म्हणजे एका दृष्टीने आजकाल self help पुस्तके असतात तसे मला वाचायचे होते. आणि हे करताना क्रिकेट सारख्या आवडत्या विषयावर आणि त्यातही आपल्याला पूर्णपणे माहीत असलेल्या कालखंडाविषयी जर असेल तर हवेच होते.

काही अपवाद वगळता आपणही आपापल्या क्षेत्रात असे चाचपडत असतो आणि त्याच वेळेला अत्यंत यशस्वी लोकांची उदाहरणे आजूबाजूला पाहात असतो. कोणत्याही क्षेत्रात एकदा काही वर्षे काम केले की नकळत आपल्याला असे वाटू लागते की आपण ज्या काही पातळीवर काम करतो त्यापेक्षा फार वेगळे काही करू शकत नाही. अशा माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी हे पुस्तक जरूर वाचण्यासारखे आहे.

वॉ ने क्रिकेट मधे कसे यश मिळवले ही माहिती सर्वसामान्य लोकांना अतिशय उपयोगाची आहे. सचिन तेंडुलकर किंवा ब्रायन लारा सारखे खेळाडू मुळातच अतिशय प्रतिभावान असतात आणि आपण हे गृहीत धरतो की क्रिकेट मधे तर सोडाच पण आपल्याही क्षेत्रात त्यांच्यासारखे स्थान आपण गाठू शकत नाही. पण वॉ चे सुरुवातीचे दिवस, त्याची प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची पद्धत याबद्दल वाचले की इतरांना ही असे वाटेल की मी माझ्या क्षेत्रात हे करू शकतो. सुरुवातीला वॉ सुद्धा एक अतिशय सामान्य खेळाडू होता. आपण नेहमीच्या कामांत सुरुवातीला जशा चुका करतो तसाच तो त्याच्या क्षेत्रात करायचा. पण प्रत्येक गोष्टीतून हळूहळू शिकत तो आणखी चांगला फलंदाज व कप्तान होत गेला आणि जेव्हा तो निवृत्त झाला तेव्हा तो टॉपच्या दोन-तीन खेळाडूंमधे नावाजला जात होता. एवढेच नव्हे तर तो कसोटी क्रिकेट मधला सर्वात यशस्वी कप्तान म्हणून निवृत्त झाला. कसोटी क्रिकेट मधे १६ सामने सलग जिंकण्याचा विक्रम आणि एकूण सर्वात जास्त सामने (४१) जिंकण्याचा विक्रम त्याच्या संघाने केला. आणि त्याच्या इतका भरवशाचा फलंदाज ऑस्ट्रेलियातच काय पण इतर संघात सुद्धा अपवादानेच असावा. फलंदाजीत पहिले कितीही गडी कितीही लवकर बाद झाले तरी तळाच्या खेळाडूंना बरोबर घेऊन कसलेही दडपण न दाखवता स्वत:च्या संघाची स्थिती पुन्हा भक्कम करण्यात त्याच्या इतके सातत्य कोणीही दाखवलेले नाही. वॉ जर अजून खेळत असेल तर ऑस्ट्रेलियाची स्थिती कशीही असली तरी प्रतिस्पर्धी संघाला सामना अजून आपल्या हातात आला असे वाटत नसे.

पण हे सगळे त्याला जमायला जवळजवळ दहा वर्षे जावी लागली. क्रिकेट खेळाडूच्या दृष्टीने हे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त करीयर झाले. यातील पहिली पाच-सहा वर्षे तर तो खूप चाचपडत होता. १९९१ च्या सुमारास त्याला संघातून डच्चूही मिळाला (आणि त्याची जागा त्याचा जुळा भाऊ मार्क वॉ ने घेतली. हे चार भाऊ. आणखी धाकटे डीन आणि डॅनी क्रिकेट मधे होते पण या दोघांएवढे यशस्वी झाले नाहीत). जेव्हा त्याने त्यातून बाहेर पडण्याचे ठरवले तेव्हा सराव आणि मेहनत याचे एक शिस्तबद्ध रूटीन चालू केले, तरीही त्याचे फायदे त्याला एकदम पुढच्या मालिकेमधे दिसले नाहीत, मधे पुन्हा काही वेळा अपयश आले आणि तरीही तो ते करत राहिला. ऑस्ट्रेलियन संघही तेव्हा तशाच स्थितीतून जात होता आणि यातून एक चित्र स्पष्टपणे दिसते की आपल्याला आपल्या चुका लक्षात आल्या आणि आपण त्यासाठी 'काहीतरी' करायचे ठरवले तरी एकदम त्यात यश मिळतेच असे नाही. वॉ ला आणि ऑस्ट्रेलियन संघाला सुद्धा त्यानंतरही बरेच अपयश पचवावे लागले, पण अधूनमधून त्या मेहनतीची फळेही दिसू लागली आणि मग १९९५ मधे जेव्हा त्यांनी वेस्ट इंडीज ला त्यांच्या 'घरी' हरवले तेव्हा त्यांचा संघ जगज्जेता मानला जाऊ लागला आणि वॉ चा यात मोठा हातभार होता. त्याची कारकीर्द ही त्याच दौर्‍यापासून जास्त प्रकाशात आली.

८० च्या दशकात वेस्ट इंडीज एक अजिंक्य संघ होता. १९७९ नंतर ते १९९५ पर्यंत एकही कसोटी मालिका हरले नव्हते. ९५ च्या या दौर्‍यातील मालिका कोणाच्याही बाजूने फिरू शकते अशी स्थिती असताना आणि अँब्रोस, वॉल्श वगैरे वेगवान गोलंदाज बाउन्सर्स चा मारा करत असताना खेळपट्टीवर ठाम उभे राहून, त्यांच्या आक्रमक हालचाली त्यांच्यावरच परतवून नाबाद २०० धावा त्याने केल्या आणि ऑस्ट्रेलियाने ती मालिका जिंकली. तेव्हापासून जागतिक क्रिकेट मधे ऑस्ट्रेलियाने जे स्थान मिळवले ते आजतागायत अबाधित आहे. आणि खुद्द वॉ ची तर मग अशा खेळी करण्याबाबत खासीयतच झाली. १९९५ पासून ते २००४ पर्यंत असे अनेक डाव तो खेळला.

म्हणजे सुरुवातीला एक सामान्य खेळाडू असलेला वॉ आपल्या करियर च्या शेवटी एक सर्वोत्कृष्ठ कप्तान व फलंदाज म्हणून नावाजला गेला. हे त्याने कसे केले? आपल्या सारख्यांना हे आपापल्या क्षेत्रात करता येणे शक्य आहे काय? असे अनेक प्रश्न माझ्या मनात हे पुस्तक वाचताना सतत येत होते. आणखी एक गोष्ट कळली तर बघायचे होते. मैदानावर कोणत्याही प्रसंगी ढेपाळून न जाता अनेक वेळा त्याने आपल्या संघाला पुन्हा सुस्थितीत कसे आणले, त्या अनेक डावांमधे प्रत्येक वेळी त्याच्या डोक्यात काय विचार असायचे, अशा वेळी तो (आणि एकूणच त्यांचा संघ) अशा कोणत्या विशिष्ठ मनस्थितीत असायचा की त्यांना बरोबर तेव्हाच आपला सर्वात चांगला खेळ करता यायचा हे जाणून घेण्याची इच्छा होती. कारण इतक्या खेळाडूंमधे फारच थोड्यांना ते जमलेले आहे आणि इतक्या सातत्याने तर इतर जवळजवळ कोणालाच नाही.

हे जवळजवळ ८०० पानी पुस्तक वाचल्यानंतर असे लक्षात येते की हा त्याच्या क्रिकेट मधील अनुभवांचा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीचा आलेख तर आहेच, पण त्याबरोबर त्याच्या १९८५ पासून ते २००४ पर्यंतच्या सर्व मालिका, त्याची त्यातील कामगिरी, त्याच्या संघाचे व प्रतिस्पर्धी संघांचे डावपेच, ऑस्ट्रेलियन संघ व व्यवस्थापनातील संवाद, मतभेद व राजकारण आणि याबरोबरच त्याने स्वत: यश मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न केले याबद्दल आहे. तसेच वैयक्तिक जीवनात काय तडजोडी कराव्या लागल्या आणि त्याने त्याला आणखी चांगले, विशेषत: परदेशात, खेळायची खुमखुमी कशी निर्माण झाली? याचेही सुंदर वर्णन आहे. एक उदाहरण म्हणजे त्याची पहिली मुलगी जेमतेम २-३ आठवड्यांची असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दृष्टीने अत्यंत अनावश्यक अशा केवळ त्यांच्या बोर्डाने मान्य केले म्हणून खेळवल्या गेलेल्या एक दिवसाच्या सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेला जावे लागले. त्याच वेळेस लंकेत असलेल्या धोक्यामुळे यांना पूर्ण सुरक्षित वातावरणात कायम राहावे लागले, म्हणजे फक्त स्वत:च्या हॉटेलात पूर्ण वेळ वगैरे. त्यावेळी आपण येथे कशाला आलो हा विचार येणे स्वाभाविक होते, असाच विचार इतर अनेक परदेश दौर्‍यांच्या वेळेस आपल्या कुटुंबाला सोडून जाताना आला असेल. अशा वेळेस त्याच्या बायकोने सांगितलेले त्याला कायम चांगल्या कामगिरीसाठी उद्युक्त करत गेले. तिने त्याला सांगितले की जर तुला क्रिकेट मुळे कुटुंबापासून दूर जावे लागत आहे तर तू त्या वेळेत क्रिकेट वर १००% लक्ष दे, नाहीतर तू (त्यातही यशस्वी होणार नाहीस आणि) स्वत:च्या कुटुंबाबरोबर घालवायचा मोलाचा वेळ वाया घालवशील. वॉ च्या म्हणण्यानुसार यामुळेच त्याची परदेशातील कामगिरी नेहमीच चांगली झाली, आणि त्याचे रेकॉर्ड याची साक्ष देते.

एक कप्तान म्हणूनही सुरूवातीला त्याने केलेल्या गोष्टी, नेतृत्व असलेली जबाबदारी नव्याने स्वीकारणार्‍या लोकांना आठवण देऊन जातील. ज्या लोकांबरोबर आधी खेळला, ज्यांच्या बरोबर बर्‍याच गमतीजमती केल्या त्यांचाच कप्तान झाल्यावर एकदम स्वत:चे नेतृत्व लादणे त्याला जड गेले त्यामुळे सर्वांच्या मतानुसार हालचाली तो करत असे. तसेच कोणत्याही खेळाडूला संघातून काढताना दडपण येणे, स्वत:च्या नेतृत्वाबद्दल निवड समितीचे मत चांगले आहे का नाही याची सतत चिंता असणे हे सर्व अनुभव त्याने घेतले. मग हळूहळू त्यातील चुका त्याच्या लक्षात आल्या आणि अशा प्रत्येक अनुभवातून आपल्याला माहीत असलेला स्टीव वॉ बनत गेला. मग १९९९ च्या वर्ल्ड कप मधे ऑस्ट्रेलिया जवळजवळ बाहेर जायच्या बेतात असताना त्याने पाहिलेला मॅंचेस्टर युनायटेडचा फुटबॉल (सॉकर) चा शेवटच्या दोन मिनिटात दोन गोल करून जिंकलेला सामना त्याला एकदम नवीन महत्त्वाकांक्षा देऊन गेला. तेव्हा ऑस्ट्रेलियाला जर कप जिंकायचा असेल तर पाच सामने सलग जिंकणे आवश्यक होते. त्यातील तिसरा सामना तर फारच खडतर होता, त्यात या सामन्याच्या आदल्या दिवशी त्याला सांगण्यात आले होते की उपांत्य फेरीत जर ऑस्ट्रेलिया पोहोचली नाही तर त्याचे एक दिवसाच्या सामन्यांतील नेतृत्व आणि करीयर संपेल.

हा तिसरा सामना, जो द. आफ्रिकेबरोबर होता, तो आणि नंतर याच दोन संघातील उपांत्य फेरीचा सामना हे दोन्ही खूप वर्षे लोकांच्या आठवणीत राहतील असे झाले. आफ्रिकेच्या २६१ धावांना उत्तर देताना यांची स्थिती ४८/३ अशी झाली आणि वॉ खेळायला आला. ५६ वर असताना त्याचा झेल हर्शेल गिब्ज ने घेतला पण नेहमीच्या स्टाईल ने तो चेंडू आकाशात उडवण्याच्या नादात तो झेल त्याच्या हातून सुटला, आणि मग वॉ ने शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर तो उपांत्य सामना 'टाय' झाला व अंतिम सामन्यात पाकिस्तान चा धुव्वा उडवून त्यांनी १९९९ चा वर्ल्ड कप जिंकला. या आणि अशा इतर अनेक प्रसंगांचे खूप सुरेख वर्णन या पुस्तकात आहे आणि असे प्रसंगही खूप आहेत. पण हा आधीचा सामना ज्यांनी पाहिला आहे त्यांना वॉ चा क्रीझ वरचा आत्मविश्वास आणि 'ही मॅच आपणच जिंकणार' असा आविर्भाव आठवत असेल, प्रत्यक्षात त्यावेळेस तो १३ वर्षांचे आपले एक दिवसाच्या सामन्यांतील करीयर वाचवण्यासाठी खेळत होता, आणि त्याच्या शब्दांनुसार अत्यंत दडपणाखाली तो खेळायला आला. म्हणजे मनात प्रचंड दडपण असताना चेहर्‍यावर फक्त प्रचंड आत्मविश्वास दाखवत अशक्यप्राय कामगिरी करण्याची त्याची खासियत वेळोवेळी दिसून येते. त्यावरूनच त्याला Iceman हे नाव पडले.

ज्यांना क्रिकेटबद्दल वाचायला आवडते अशांना तर हे पुस्तक आवडेलच, पण क्रिकेटची फारशी आवड किंवा यात वर्णन केलेले सामने व इतर प्रसंगांची महिती नसणार्‍यांना सुद्धा नक्कीच उपयोगाचे आहे. त्याची लिहिण्याची शैली सोपी आहे, थोडेफार ऑस्ट्रेलियातील गोष्टींचे उल्लेख सोडले तर बरेचसे कोणालाही कळेल असे आहे. एखादा खेळाडू जेव्हा अतिशय चांगला खेळत असतो आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही त्या अवस्थेला वॉ 'झोन मधे असणे' म्हणतो. खेळताना अशा अवस्थेत जाणे कसलेल्या खेळाडूंनाही नेहमी जमतेच असे नाही आणि त्यामुळे त्याची 'चेकलिस्ट' येथे मिळणार नाही (वॉ च्या म्हणण्यानुसार तशी ती असती तर सर्वच खेळाडू तसे करू शकले असते), पण तसे होऊ शकण्यासाठी काय करावे याची माहिती त्याने काय केले यावरून मिळते. प्रतिस्पर्धी कोणीही असो, त्यांच्या समोर जाताना आपला आविर्भाव कसा असावा याची अतिशय उत्तम उदाहरणे यात मिळतात.

तसेच ऑस्ट्रेलियन खेळाडू सामन्याच्या तयारीसाठी खूप मेहनत घेतात, पण इतर वेळी खूप मजाही करतात, त्याचे वर्णन खूप छान केले आहे. प्रत्येक दौर्‍याच्या वेळी अशा अनेक गमतीजमती हे लोक करत असे दिसते. एकदा दौर्‍यावर असताना ऑस्ट्रेलियातील एका रेडिओवरील मुलाखतीत वॉ ने इयान हिली म्हणून व हिली ने वॉ म्हणून मुलाखत दिली होती. इंग्लंड मधे एकदा कसोटी सामना जिंकल्यावर भरपूर दारू पिल्याने दुस-‍या दिवशी अनिच्छेने एक साधा सामना हॅंगओव्हर मधे खेळताना पहिल्या सत्रातच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आठ झेल सोडले ती माहिती किंवा एकदा माइक व्हिटनी व वॉ प्रचंड 'तारेत' असताना हॉटेल वर आले व दुसर्‍या दिवशी हॉटेल च्या एका कर्मचार्‍याने त्यांच्या रूम चा नंबर अचूक सांगितल्यावर यांना आश्चर्य वाटले तेव्हा कळाले की त्यानेच यांना रात्री त्यांच्या रूमवर सोडले होते, अशा अनेक मनोरंजक प्रसंगांची वर्णने जागोजाग आहेत.

याखेरीज 'उदयन' या कलकत्त्यातील संस्थेतील त्याच्या कामाची माहितीही आहे. १९९८ ची कलकत्त्याची कसोटी ऑस्ट्रेलियाने बेदम मार खाल्ल्याने एक दिवस आधीच संपली आणि त्या दिवशी तो ही संस्था बघायला गेला. तेथील परिस्थिती पाहून त्याने त्यात पडायचे ठरवले आणि कुष्ठरोग्यांच्या मुलींसाठी तोपर्यंत तेथे नसलेली सोय उपलब्ध करण्यात त्याने मोठा हातभार लावला. अशी अनेक वेगवेगळी माहिती या पुस्तकात आहे.

एकूण हे पुस्तक अतिशय गंभीर व वाचायला जड अजिबात वाटत नाही. एकतर खेळाचा व सरावाचा वेळ सोडून ऑस्ट्रेलियन खेळाडू इतर वेळी खूप धमाल करतात त्याचे वर्णन व थोडीफार स्वत:ची आणि इतरांची खिल्ली उडवणारी लिहिण्याची शैली यामुळे वाचताना कधीही कंटाळा येत नाही. हे प्रदीर्घ आत्मचरित्र म्हणजे जणू एक पूर्ण पाच दिवस चाललेला कसोटी सामना आहे, पण येथे प्रत्येक चेंडू रंगतदार झालेला आहे!

-Farend