Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
DiwaaLee

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » कथा कादंबरी » DiwaaLee « Previous Next »

Tanyabedekar
Sunday, December 09, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चमच्याने पणतीत चार थेंब ओतून थोरला दुकानात आला. लाकडी फळ्यांचा तोच रोजचा वास. तेलाच्या डब्याखाली धुळ चिकटून गोल चिकट वर्तुळ झाले होते. साखरेच्या डब्याला मुंग्या लागल्या होत्या. त्याची नजर रांगेवरून सरकत भिंतितल्या बारीक चिरी पर्यंत सरकली. चिरीतून आत बहुतेक मागच्या कुलकर्ण्यांच्या घरात मुंग्यांचे घर असावे. कितीतरी दिवसांपासून मुंग्यांची पावडर आणुन मारावी असा विचार थोरला करत होता. पण तसेही काड्यापेटी, मेणबत्ती, विडी असल्या फुटकळ गोष्टी सोडून त्याच्या दुकानात आणखी काही घ्यायला कुणी येत नसत. नाही म्हणायला जवळकराची येडी म्हातारी कधी मधी गुळाचा खडा घेवून जायची त्याच्याकडून.

थोरल्याने आणि धाकट्याने मिळुन हे दुकान सुरु केले होते. चिवटे अण्णाकडून पैसा चार टक्के महिना व्याजाने उचलला होता. पहिल्या दिवाळीला धाकट्याने चार पणत्या हौसेने लावल्या होत्या. दारात दोन, आणि फळीवर, दोन टोकांना एक एक. बायकोने दुकानाच्या समोर ठिपक्यांची रांगोळी काढली होती. बायकोला रांगोळी वगैरे यथातथाच यायची. पण एका बाजुला फुगलेली ती रांगोळी बघुन त्याला तेव्हा किती आनंद झाला होता. धाकटा लवंगीच्या माळेतून एक एक लवंगी काढत हातात उडवत होता. वाड्यातली बारकी पोरं कौतुकानं त्याच्याकडं बघत होती. धाकटा नुकताच परत एकदा मॅट्रिकला तिसर्‍या की चवथ्यांदा नापास झाला होता.

थोरल्याचा बाप आयुष्यभर मिलमध्ये टेंपरवारी हेल्पर म्हणुन काम करत होता. थोरला दुसर्‍यांदा मॅट्रिकला असताना बाप गचकला. दारु पिउन त्याचं लिव्हर खराब झालं होतं. पण दारू पिउन बापानं कधी शिविगाळ, मारझोड केलेली त्याच्या लक्षात नव्हती. पाळी संपल्यावर नेमाने बाप स्टॅंड जवळच्या गुत्त्यावर जाउन दोन चार ग्लास प्यायचा. घरात पाहुणे आल्यावर कधीतरी चहा साखरेसाठी आईने थोरल्याला पैसे मागायला तिकडे पिटाळला होता. तिथेसुद्धा थोरल्याच्या आठवणीमध्ये बाप कधी कुणाशी बोलतना वगैरे दिसला नव्हता. शांतपणे दारु पीत, आणि मधेच मीठाचा खडा जीभेवर घासत शुन्यात नजर लावून तो बसायचा. रात्री सायकल भिंतीला लावून आईने वाढलेली कोरडी भाकर आणी डाळ खावून अंथरूणावर अंग टाकायचा. तो मेला तेव्हा कुणाच्या लक्षात पण आले नाही आणि तो जिवंत असताना पण.

मॅट्रिकला दोनदा प्रयत्न करून बाप मेल्यावर थोरला बाजारातल्या चिवटे अण्णाच्या दुकानात पोर्‍या म्हणुन लागला. पुड्या बांधणे, चहावाल्याला निरोप देणे, दिवाळी-दसर्‍याला अण्णाच्या घरात साफ-सफाई करणे असली कामे सुरु झाली. कधीतरी त्याच्या शाळेत बरोबर असलेल्या बामणाच्या गोर्‍या-गोमट्या पोरी दोन वेण्या बांधून किराणा न्यायला यायच्या. थोरला दुकानात आत जावून काहितरी काम केल्याचा बहाणा करायचा. पण जेव्हा गर्दी असायची तेव्हा अण्णा नेमका त्याचं नाव घेवून, दोन शिव्या हासडंत त्याला बाहेर बोलवायचा. पण मग थोरल्याला कळलं की कुठलीच मुलगी त्याला ओळखत नाही, तोच आपला उगीचच तोंड लपवायचा. तसेही थोरल्याने शाळेतंच काय, कुठेचं लक्षात येण्याजोगं काहीच कधी केलं नव्हतं.

हळुहळु थोरला मुनीमला मदत करु लागला. खरेदीला अण्णा त्याला बरोबर घेवू लागला. दुकानच्या मागच्या गोडावून मध्ये माल उतरवून घेणे, वह्या भरणे, गाडीवल्याच्या वहीत नोंद करून त्याला सोडवणे अशी जबाबदारीची कामे त्याच्या अंगावर आली. अण्णाने पगार जरासा वाढवला. थोरल्याने हप्त्यावर सायकल विकत घेतली. बापाची सायकल आता धाकटा वापरू लागला.

पगार वाढल्यावर आईने मुलगी बघुन थोरल्याचे लग्न ठरवून टाकले. आई कार्यालयात तिच्या लहानपणा पासून काम करत होती. तिची आईपण तिथेच काम करायची, नवर्‍याने टाकल्या दिवसापासून. आई कार्यालयातच लहानाची मोठी झालेली. भांडी घासण्यापासून सुरुवात करत, चटण्या-कोशिंबिरी आणि मग मसालेभात-जिलब्या पर्यंत आईने प्रगती केली. कार्यालयातल्या भिशीमध्ये थोडे थोडे दर महिन्याला टाकुन जमवलेले पैसे आईने थोरल्याच्या लग्नात खर्चले. तिच्याच बरोबर काम करणार्‍या एका बाईच्या मुलीशी थोरल्याचे लग्न लावून दिले गेले. थोरल्याच्या बायकोच्या बापाने पण त्याच्या सासूला असेच कधीतरी टाकून दिले होते. लग्नात मात्र तो आला होता. कन्यादान करायला.

लग्नानंतर थोरला एकदा सुट्टीच्या दिवशी बायकोला घेवून सिनेमा बघायला गेला. बाजारच्या टोकाच्या त्या बारक्या थेटरात ढेकूण चावत असुन देखील त्याने धाडसाने बायकोचा एक मुका घ्यायचा प्रयत्न केला. पण बायकोने तोंड बाजूला घेतल्यामुळे फक्त गालाला-ओठाला अर्धवट स्पर्श करूनच त्याचे तोंड मागे आले. बाहेर निघताना तरीपण एक जण मुद्दाम थोरल्याला ऐकु जाईल असं, दुसर्‍याला म्हणाला, 'लै भारी सिनेमा व्हता न्हाय रे.' रात्री घरी गेल्यावर थोरल्याने जेवणानंतर आईचे आणि धाकट्याचे अंथरूण, अंगणात नेवून टाकले. त्यानंतर रोज धाकटा आणि आई, अंगणात झोपायला लागले.

बायको तीन महिन्याची पोटुशी असताना थोरल्याने अण्णाकडे पैसे उधार मागितले. कार्यालयातल्या गल्लीत एकपण किराणाचे दुकान नव्हते. नाही म्हणायला एक पानटपरी होती. पण त्याच्या कडे पान-तंबाखू. विड्या-सिगरेटी आणि आहेराची पाकिटे सोडून काय मिळायचे नाही. लोकांना मीठ-साखर जरी हवी असली तरी हायस्कूलच्या पुढच्या चौकातल्या बाबूच्या दुकानात जायला लागायचे. थोरल्याच्या डोक्यात ह्या गल्लीत दुकान टाकायची योजना बर्‍याच दिवसांपासून घोळत होती. नाहीतरी धाकटा मॅट्रिक व्हायची चिन्हे नव्हतीच. आणि अण्णाच्या दुकानात अजुन पगार वाढायची शक्यता नव्हती. खायला एक तोंड पण वाढणार होतं. दुकान अगदी जोरात नाही चाललं तरी आत्ता मिळतात त्यापेक्षा चार पैसे नक्कीच जास्त मिळाले असते असा विचार थोरल्याने केला.

अण्णा त्याला बाकीच्यांपेक्षा कमी दरानं पैसे देईल असं त्याला वाटलं होतं. पण अण्णा स्पष्टंच म्हणाला की, 'धंदा म्हणजे धंदा. असं ओळखीचा हाय म्हणुन कमी दर द्यायला लागलो तर दिवाळं वाजल माझं.' पण पहिल्या महिन्याचं सामान २ महिन्याच्या उधारीवर द्यायचं अण्णानं कबूल केलं. कार्यालयाच्या गल्लीत ओळीनं चार कार्यालयं होती. नाही म्हटलं तरी वर्षाकाठी प्रत्येकात शंभर-सव्वाशे दिवस तरी कार्यं असायची. दुसर्‍या कार्यालयाच्या समोरच्या वाड्यात बाहेरच्या बाजुला चार फुट खोल आणि आठ फुट रुंदीचे दोन गाळे होते. एका गाळ्यात भाउची गिरणी होती. पण दुसरा गाळा बर्‍याच वर्षापासून बंद होता. गाळ्यांना लाकडी फळ्यांचे घडीनं उघड-बंद होणारे दरवाजे होते. थोरल्यानं भाड्यानं घेतलेल्या गाळ्याच्या मागं कुलकर्ण्यांचं बिर्‍हाड होतं आणि हा गाळा त्यांनीच वाड्याच्या मुळ मालकाकडून घर घेतलं तेव्हा त्याच्या बरोबरचं विकत घेतला होता.

धाकट्याला हाताशी घेवून थोरल्यानं गाळा साफ केला. भिंतीवर मोळे खोसून आडव्या फळ्या मारल्या. घरातले चार जुने डबे आणि बरण्या आणुन त्यावर ठेवल्या. पहिल्या महिन्याचा हप्ता दिला की उरलेल्या पैश्यातून आणखी चार डबे आणायचे थोरल्यानं ठरवून टाकलं. दुकानात उंदरांचा सुळसुळाट झाला होता. धाकट्यानं उंदरांची बीळं सीमेंट घालून मुजवली आणि उंदीर मारायचं औषध भज्यात पेरून ठेवून दिलं. पण एकपण उंदीर भज्यांना शिवला नाही. अण्णाच्या दुकानातुन मीठ, साखर, तांदूळ, गहू, मसाले, तेल, उदबत्त्या, काड्यापेट्यांची पुडकी असलं सगळं सामान आणुन लावलं. दिवळी होती म्हणुन फटाक्यांच्या स्टॉलवरून लवंग्यान्ची दोन पुडकी आणि फुलबाज्यांची तीन-चार पाकिटंपण थोरल्यानं आणली. न जाणो कुठलं पोरगं हट्ट करायला लागलं ऐनवेळी तर त्याचा बाप येवून विकत घेईल. सिंध्याच्या स्टेशनरीच्या दुकानातून चार फ्याशनेबल, वेगवेगळ्या डिझाइनची आहेराची पाकिटं पण आणली. कोपर्‍यावरचा पानटपरीवाला मात्र एकाच छापाची पाकिटं कितीतरी वर्षं विकत होता.

बायकोने देवाच्या दोन तसबिरी आणुन दोन मोळे मारुन वरती टांगल्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी, थोरल्यानं आणि धाकट्यानं पहिली पूजा केली आणि नारळ फोडून वाड्यात सगळ्यांना साखर-खोबरं वाटलं. आई कार्यालयच्या पायरीवर उभं राहुन लेकांकडं बघत होती. पहिल्या दिवशी एकपण गिर्‍हाईक दुकानात फिरकलं नाही.
'आज दिवाळी ना, सगळ्यांची खरेदी आधीच झालेली आहे. त्यामुळे आज कुणी आलं नाही. पण येतील हळु हळु.' - थोरला जेवताना धाकट्याला म्हणाला. बायकोनं कौतुकानं बघत आणखी थोडीशी खीर दोघांना वाढली.

पहिल्या महिन्यात काड्यापेट्या, अगरबत्त्या आणि आहेराची पाकिटं सोडून फारसं काही खपलं नाही. कार्यालयात लग्नाला येणार्‍या लोकांना धाकटा हौसेनं रंगीत पाकिटं दाखवायचा. पण आठ आणे जास्ती महाग असलेली ती पाकिटं कुणीच घेतली नाहीत. सगळ्यांना साधी पांढरी पाकिटंच हवी असायची. दुकानातली फ्याशनेबल पाकिटांचा गठ्ठा होता तसाच राहिला. नाही म्हणायला विड्या आणि बिना फिल्टरच्या कॅमल आणि चारमिनारच्या शिगारेटी तेव्हड्या खपायच्या. आजुबाजुच्या वाड्यातली लोकं सुद्धा काड्यापेटी, अगरबत्ती आणि अगदीच कधीतरी मीठ-साखर घेवून जायची. बाकी अण्णाकडून आणलेलं धान्यसामान तसचं राहिलं होतं.

कार्यालयात काम करणार्‍या पोरांना आणि बायकांना तिथेच दोन वेळ खायला मिळायचं. सलग काही दिवस कार्य नसतील तरच ते दुकानातुन दोन-तीन दिवसाचा शिधा उधारीवर घेवून जायचे. ती चार पैश्याची उधारी वसूल करायला पण धाकट्याला चार-चार पाच-पाच वेळा पिटाळायला लागायचे. बाकी गल्लीतली, वाड्यातली बिर्‍हाडं महिन्याचं सामान बाजारातल्या ठरलेल्या दुकानातून करायचे. त्यामुळे त्यांना ह्या दुकानातून काही आणायला लागायचे नाही. पहिल्या महिन्याच्या शेवटाला अण्णाचा व्याजाचा हप्ता देण्याएव्हडासुद्धा गल्ला जमा झाला नाही.

दुपारच्या वेळेला शेजारचा भाउ गिरणीवाला जेवण करून बिडी प्यायला दुकानात येउन बसायचा. ठिकय का? एव्हडं एकच वाक्य बोलून, तो शांतपणे एक बिडी पीत उकीडवा बसायचा. बिडी संपली की गुढग्यावर हात दाबत उभा राहायचा आणि परत गिरणीत जाउन, मशिनवर ठॉक्क ठॉक्क असं दोनदा लाकडी टोणग्या हाणायचा. मग परत रात्र पडेपर्यंत त्याच्या गिरणीच्या पट्ट्याचा फट्याक् फट्याक् फट्याक् आवाज येत राह्यचा.

जवळकराची म्हातारी कार्यालयात काम नसेल तेव्हा दुकानच्या बाहेर उभा राहुन स्वतशीच बडबडत उभी र्‍हायची. ती काय बडबडते ते कुणालाच कधी कळले नव्हते. पण ती नेहेमी कुणाशीतरी भांडल्यासारखी करवादत असायची. गल्लीभर असं स्वतशीच करवादत फिरून झालं की ती दुकानच्या बाहेर येउन उभी राहायची. तिला कधी कुणी बसलेलं पाहिलचं नव्हतं. कार्यालयात मात्र कोशिंबिरीसाठी काकडी चिरायला का एकदा ती बसली की काम संपेपर्यंत गप्प असायची. कधीतरी दुकानातून ती एक-दोन रुपायचं सामान तिथल्या तिथं रोख पैसे देवून घेवून जायची.

एकदा बायको दुकानात आली असताना ही येडी म्हातारी गल्ली करावादून दुकनासमोर येउन उभी र्‍हायली. बायको दुसर्‍यांदा बाळंत होती. तिच्या वाढलेल्या पोटाकडे दोन मिनीट निरखून बघत एकदम ती तोंड आडवं फाकून जोरात हसली. तिच्या तोंडात एकपण दात शिल्लक नव्हता. तिचं विद्रुप तोंड आणि हासणं ऐकून बायको आणि तो एकदम दचकले. त्यानंतर मात्र त्याने जवळकराच्या म्हातारीला कधी दुकानासमोर उभे राहुन दिले नाही. आणि अधुनमधुन दोन रुपायचं सामान घ्यायला ती त्यचं सोडून दुसर्‍या कुणाच्या दुकानात कधी गेली नाही.

एकदा गाळ्याचा मालक कुलकर्णी काड्यापेटी विकत घ्यायला आला. नेमकं त्यादिवशी काड्यापेट्या संपल्या होत्या. अण्णाचे पहिल्या महिन्याच्या सामानाचे पैसे अजुनही थकले होते. थोरला त्याला चुकवायला म्हणुन संपलेलं सामान सुद्धा आणायला गेला नव्हता. काड्यापेटी नाही म्हटल्यावर कुलकर्ण्यानं तोंडाचा पट्टा सुरु केला.
'अरे कसं दुकान चालायचं तुझं. दुकानात कसं गिर्‍हाईक मागेल ते सामान कायम रेडी पाहिजे. असं एकदा नाही म्हणुन गिर्‍हाईक गेलं की मग कशाला पुढच्या वेळी तुझ्या दुकानात येणार. हुच्चच हाय तुम्ही दोघं भाउ.'
कुलकर्णी गेल्यावर धाकटा करवदला, 'आयला, ह्यांना फक्त काड्यापेटी विकत घ्यायला पाहिजे आमच्या दुकानातनं. बाकी सामान घ्यायला मात्र अण्णाचं दुकान.'
थोरला काही न बोलता नुसता शुन्यात नजर लावून बसला.

पुढची दोन-तीन वर्ष फक्त व्याजचं फिटत होतं. धाकटा हळु हळु दुकानात बसेनासा झाला. त्याला उचलून द्यायला दोन पैसे सुद्धा गल्ल्यात शिल्लक राहात नव्हते. दोन-चार वेळा खर्चाला पैसे मागून कंटाळून त्याने दुकानात यायचे सोडून दिले होते. आजकाल रात्री पण घरी येइलच ह्याचा नेम नव्हता. आई मरून पण एक-दीड वर्षं होऊन गेलं होतं. आईच्या माघारी बायकोनं परत कार्यालयात स्वैपाकला जायला सुरुवात केली होती. लग्नानंतर थोरल्यानं बायकोला कार्यालयात कामाला जायला मनाई केली होती. पण तिने परत जायला सुरुवात केली तेव्हा तो काहीच बोलला नाही. किमान आठवड्यातले चार दिवस तरी बायको कार्यालयातून उरलेलं अन्न डब्यात भरून आणायची. तेव्हडाच अर्धा खर्च तरी निघायचा.

एकदा सामान आणायला बाजारात गेला असताना त्याने धाकट्याला अण्णाच्या दुकानात पुड्या बांधताना बघितले.

पहिली पोरगी झाल्यावर, बायको परत पोटशी होती. तिसर्‍या दिवाळीला, कानाला टोपडं बांधून ती पूजा करायला आली होती. पोरगी आता दोन वर्षाची झाली होती. त्यातल्या त्यात नवीन परकर-पोलकं चढवून बायको तिला घेवून आली होती. बायकोची साडी जुनीच होती. तसबिरी पुसायला जेव्हा बायकोनी हात वर केले तेव्हा त्याच्या लक्षात आले की पोलक्याच्या काखात ठिगळं लावली होती. बायकोने पुर्वीप्रमाणे अधुनमधुन दुकान साफ करायचे सोडून दिले होते. फळ्यांवर धुळीचा एक थर साचला होता. धान्याच्या खाली ठेवलेल्या पिशव्यांना उंदरांनी कुरतडून भोकं पाडली होती आणि धान्यं जमिनीवर ओघळले होते. मागच्या भिंतीचा रंग पापुद्रे पडून उडला होता आणि मातीची भिंत नागडी झाली होती. भिंतीच्या कोपर्‍यात जमलेल्या जळमटांवर शेजारच्या गिरणीतून उडणारं पीठ जमून नक्षीकाम झालं होतं. तरी बरं दुकानातल्या अंधारात छतावरची जळमटं दिसत नव्हती.

वाड्यातली पोरं फटाके उडवत होती. थोरल्याची मुलगी बारीक तोंड करून त्यांना बघत होती. अचानक धाकटा सायकल हाणत दुकानाशी आला. भूत बघितल्यासारखे थोरला धाकट्याकडे बघत होता. धाकट्याने खिशातून एक लवंगी फटाक्यांच्या माळेचं पुडकं काढलं. पुतणीला मांडीवर बसवून त्याने एक एक लवंगी सुट्टी करुन उडवायला सुरुवात केली. पुतणी मांडीवर बसुन खुश होउन टाळ्या वाजवत होती. उरलेल्या एक दोन माळा आख्ख्याच्या आख्ख्या लावून, आला तसा एक शब्द न बोलता धाकटा निघुन गेला. बायको कार्यालयातलं काम आटपून पोरीला घेवून घरी निघुन गेली.

पणतीतलं तेल संपत आलं होतं. थोरल्यानं उठुन एक चमचा तेल दोन्ही पणत्यात अर्धं-अर्धं घातलं. शेजारी भाउच्या गिरणीतून फट्याक् फट्याक् आवज येत होता.













Dhoomshaan
Sunday, December 09, 2007 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तनया, अगदी चित्र डोळ्यासमोर उभं केलस!!!!!!!!

Chinnu
Monday, December 10, 2007 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरेख चित्तरकथा! मोजक्या शब्दात सुंदर मांडणी. सहीच!

Dineshvs
Monday, December 10, 2007 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तनया छान चित्रमय कथा.

एका वाक्यात, वाक्यरचनेची बारिकशी चूक झालीय.

मॅट्रिकला दोनदा प्रयत्न करून बाप मेल्यावर थोरला बाजारातल्या चिवटे अण्णाच्या दुकानात पोर् 0dया म्हणुन लागला.

इथे " आणि " शब्द आवश्यक होता.


Daad
Monday, December 10, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्या, सुर्रेख चित्तरकथा. जागा, माणसं, प्रसंग... ठसठसशीत... डोळ्यासमोर उभे.

आणि हो.... 'तनया' का म्हणताय त्यांना? त्यांच्या profile प्रमाणे 'मिरजेचे बापईगडी हायेत त्ये'!
सोच्च्छ 'तान्या' म्हणा...


Bhagya
Monday, December 10, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शंतनू, सुरेख! अगदी बारकाईने सगळ्या परिस्थीतीचे आणि त्यातून जाणार्‍या पात्रांचे चित्रण केले आहेस. डोळ्यांसमोर सगळे उभे राहते.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators