|
दंडोबा दंडोबाच्या मनोर्यावर वारा भयाण सुसाटला होता. अर्ध्यापेक्षा जास्ती सिगरेट वार्यामध्येच अगरबत्ती होवुन चालली होती. पण आज आख्ख पाकीट बरोबर होतं. पूर्वी इथेच चार्-पाच मित्र मिळुन थोड्याफार सिगरेटी आणायचो आणि शेअर करुन प्यायचो. कुणी तीनपेक्षा जास्ती पफ घेवून सिगारेट पुढे नाही पास केली की डोक्यात फाट्ट करुन टपली पडायची. आज च्यायला आख्ख पाकीट होतं पण शेअर मारायला कोणी नव्हतं. ह्या दंडोबाच्या टेकडीवर गावी असताना कितीदा आलो ह्याची गणतीच नाही. गाडीवाटेनं आलं तर डांबरी सडकेपासून तासाभरात वर पोचायचो. मुरुमाच्या दगडातली काळीकुट्ट गुहा. आत कुणीतरी लावलेल्या पणतीचा मिणमिणता उजेड आणि त्या उजेडात फडफडणारी शंकराची पिंड. गुहेत आत शिरलं, की वटवाघळांच्या शिटेचा उग्र दर्प. आणि मग पिंडीला एक प्रदक्षिणा. गुहेची मागची भिंत आणि पिंड असलेलं गर्भगृह, यांच्यामध्ये एक फुटाची सांदरी होती. जणु भुयारच. काड्यापेटीची काडी पेटवुन हळुच ह्या सांदरीमध्ये शिरायचं. सतत पाणी झिरपून मऊसूत झालेला तो दगड, त्याला एक कुबट वास यायचा. ह्या गुहेच्या छपरावर एक चांगलं मोठं पठार. एक एकर्-दोन एकर तरी असेल. आणि त्या पठारावर कधीकाळी कुणीतरी बांधलेला हा मनोरा. असेल तीस्-चाळीस फूट उंचीचा. वर निमुळता होत गेलेला. वर चढायला अर्ध्या उंचीपर्यंत बाहेरुन पायर्या. आणि मग टोकापर्यंत आतुन गोल्-गोल पायर्या. अर्धा चढुन आल्यावर एक देवडी, पाच बाय पाच फुटाची. आणि मग अगदी वरपर्यंत चढुन आलं की हा मी आज बसलो होतो तो दोन फूट त्रिज्येचा कट्टा. मध्यभागी झेंडा उभारायला एक खळगा. माझी ह्या मनोर्याशीच जास्ती गट्टी होती. दंडोबावर रात्री मुक्कामाला यायला सुरुवात केली, ती मी आणि सत्यानं. घरातुन ओवाळून टाकलेले आम्ही दोन वळू. गाव बोंबलत असताना आम्ही इथं येउन रात्री मुक्काम केला होता. रात्री तशी धाकधुक, भिती वाटतच होती. पण रात्र काढली. त्यानंतर मात्र सपाटाच लावला. गाडीवाटेनं, सिद्धेश्वराच्या दगडांच्या खाणींच्या बाजुनं, मागच्या जैन मंदीराच्या बाजुनं, हायवेला ट्रक पकडून आणि मग मधेच कुठेही उतरून सरळ मनोर्याच्या दिशेनं चढत, अश्या अनेक वाटांनी ही दंडोबाची टेकडी चढलो. संध्याकाळी गावाबाहेर येऊन हायवेला ट्रक पकडायचा. पाच-सात रुपयात १०-१२ मैलावर कुठेतरी उतरायचं. आणि मग चढायला सुरुवात करायची. हायवेला समांतर पसरलेली ही दंडोबाची बोडकी रांग माझ्या त्या चार वर्षांची जोडीदार होती.
|
पण दंडोबाचा पहिला कीडा डोक्यात सोडला तो भाउंनी. भाउ म्हणजे माझे आजोबा. शाळेत असताना मी आजी-भाउंबरोबर गावातल्या वाड्यातल्या घरात राहायचो. आई, बाबा आणि ताई बंगल्यावर राहायचे. पण बंगला गावाबाहेर असल्याने मला शाळेला यायला-जायला खूप लांब पडायचं. आणि म्हणुन मी गावात आजी-भाउंबरोबर. रोज सकाळी पावणेपाच्-पाच वाजता भाउ मला उठवायचे आणि दात घासुन तालमीत पिटाळायचे. तिथं मल्लखांब करुन मी घरी परतेपर्यंत ते फिरुन परत आलेले असायचे. हमखास ओट्याशी उभं राहुन दुध गरम करत, जोर्-जोरात हरीपाठ म्हणत असायचे. हरीमुखे म्हणा हरीमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी! मला खरे तर गरम दुधाची चव अजिबात आवडायचे नाही. पण तरीही दुध पिउन, आवरुन मी सकाळच्या शाळेला पळायचो. एकदा मी तसाच दुध न पीता शाळेला गेलो तर, मधल्या सुट्टीत भाउ एका पिवळ्या झाकणाच्या काचेच्या बरणीत दुध भरुन घेउन आले. मला अस्सा राग आलेला. पण ते सगळं दूध त्यांनी मला प्यायला लावलं. संध्याकाळी आजी-भाउ रमी खेळायचे. काय वाट्टेल तशी रमी चालायची. आजीचा एक्-एक सिक्वेन्स सहा-सात पानांचा असायचा. पण भाउ आपले काही न बोलता, मिश्किल हसत, रमी खेळत बसायचे. मग थोड्यावेळाने दूरदर्शनवर मराठी सिरिअल्स सुरू व्हायच्या. आमच्याकडं असलेला ब्लॅकनव्हाइट टीव्ही हा आत्यानं नवीन कलर टीव्ही घेतला म्हणुन देवून टाकलेला. त्यात मुंग्याच जास्ती दिसायच्या. इतक्या जास्त की कधी क्रिकेटची मॅच असली की बॉल पण दिसायचा नाही त्या मुंग्यांमध्ये. मग अधुन मधुन भाउ मला शेजारच्या जोश्यांकडे स्कोअर बघायला पिटाळायचे. ह्या त्यांच्या टीव्ही, रमी कार्यक्रमांमध्ये मी कायम त्यांच्या मांडीवर लोळत असायचो. कधीमधी जर आत्या आलेली असेल, तर सारखं मला हाड्-हाड करायची. म्हणायची, 'बघ कसा मांजरासारखा चिकटलेला असतो भाउंना नेहेमी'. पण मला त्यांच्या मांडीवर लोळायला आवडायचे. त्यांच्या चेहर्यावर एकदम मऊमऊ सुरकुत्या होत्या. आणि ते मला कधी कधी थापटायचे तेव्हा त्यांच्या हातालासुद्धा एक प्रेमळ वास यायचा. खरतरं, त्या वाड्यातल्या प्रत्येक वस्तुलाच एक वेगळा स्वतंत्र वास होता. वरच्या खोलीतल्या शहाबादी फरश्यांचा वास, जिन्याच्या लाकडी कुसं हातात घुसणार्या दांडक्याचा वास, मोरीतल्या पितळी तांब्याचा वास, ओट्यावर असलेल्या खिडकीच्या लोखंडी जाळीला येणारा फोडणी आणि घट्ट धुळीचा एकत्र वास. अगदी बाहेरच्या लोखंडी कडीलासुद्धा एक जुना, बळकट वास होता.
|
सुट्टीच्या दिवशी भाउ मला सकाळी सोबत घेउन फिरायला जायचे. पंढरपूर रोडला पोचलो की दूरवर दिसणारी डोंगररांग दाखवून म्हणायचे, 'तो बघ दंडोबाचा डोंगर. एकदा घेऊन जाईन मी तुला दंडोबावर.' मग मी भाउंना दंडोबाबद्दल खूप काय काय विचारायचो. काय आहे तिथे वरती, कोण राहतं, वाघ आहे का, कसं जायचं तिथपर्यंत. आणि भाउंकडे सगळ्या प्रश्णांची उत्तरं असायची. हळुहळु करत दंडोबाच्या डोंगरावर कसं जायचं ह्याची योजना माझ्या डोक्यात पक्की झाली. पायथ्याच्या गावापर्यंत सायकलने जायचे आणि गावात सायकल लावुन, डोंगराच्या टोकाकडे चढायला सुरुवात करायची. बरोबर खाण्याचा डबा, डब्यात पोळी आणि बटाट्याची सुकी भाजी, वॉटरबॅग, भाउंचा मोठा टॉर्च, टोपी, मोठ्ठा रुमाल, दोरी आणि सायकलचा पंप. आता पंप सोडून बाकी सगळ्या गोष्टी होत्या. पण कोपर्यावरच्या इर्षाद सायकलवाल्याकडे दोन पंप होते. त्यामुळे त्याने एक नक्की दिला असता. चौथीची परीक्षा संपली होती. एके दिवशी सकाळी क्रिकेटची मॅच खेळून झाल्यावर, महश्या कुलकर्णी, बारका पश्या, काळा पश्या आणि सुन्या खैरमोडेला, माझा प्लॅन सांगितला. महश्या आणि बारका-काळा पश्या, ह्यांच्याकडं वडलांच्या सायकली होत्या. माझ्याकडे एक माझी स्वःताची बारकी सायकल होती. सुन्याला त्याच्या बाबानी सायकल तर दिली नसतीच, वर तंगडं मोडलं असतं. पण सुन्यानं घरातल्या दुकानच्या गल्ल्यातून अधुन मधुन थोडे थोडे पैसे हाणुन थोडेफार जमवले होते. त्या पैशातून दिवसभरासाठी भाड्याची सायकल घेता आली असती. आता काय्-काय घ्यायचं आहे ते परत एकदा चौघांना सांगून दुसर्या दिवशी सकाळी आमच्या वाड्यासमोर सहा वाजता जमायचे ठरले. मी दुपारी जेवताना भाउंना सगळा प्लॅन सांगितला. अगदी इर्षादकडून पंप घेणार आहे हे पण सांगितले. पण ऐकून, भाउ एकदम विचारात पडले. मला वाटलं हे ऐनवेळी नाही म्हणणार. तेव्हड्यात ते म्हणाले, 'पण तुला रस्ता कसा सापडणार?' मी म्हटलं, 'हात्तीच्या! त्यात काय!! सरळ वाड्यातनं बाहेर पडायचं, मालगांव वेशीतून पटवर्धनांच्या वाड्याच्या बाजुने पुढे जायचं. मग तासगांव वेशीचा मारुती आला की पंढरपूर रोड वरुन सरळ दंडोबाचा पायथा येइपर्यंत सायकल चालवायची. एकदा का पायथा आला की मग चढायला सुरुवात.'
|
'ते बरोबर आहे रे.', भाउ म्हणाले. 'पण डोंगरावर दाट जाळ्या आहेत. भरपूर पायवाटा आहेत. त्यातली एकच पायवाट वरपर्यंत जाते. जर का ती चुकली, तर मग माणुस गोल गोल फिरत राहतो तिथल्या तिथेच. आता वर जायची वाट माहिती असल्याशिवाय कसा जाणार तू?' आता मात्र मी रडवेला झालो. इतके दिवस दंडोबाबद्दल सगळं ऐकत होतो. पण आज जायच्या आदल्या दिवशीच ह्या पायवाटा आणि चोरवाटा कुठुन उपटल्या. पण मग भाउच म्हणाले, 'वरच्या गल्लीतल्या हरबाकडे, दंडोबाकडच्या एका गावातला दूधवाला येतो. तो आहे का ते बघुन येतो. आला असेल तर सांगतो त्याला, की उद्या ह्या पोरांना घेवून जा दंडोबावर. काय?' आणि चपला पायात सारुन भाउ घराबाहेर पडले. आता हरबाच्या घरात एक म्हैस होती खरी. पण त्याच्याकडं कुणी दुधवाला येतो हे काय मी कधी ऐकले नव्हते. पण भाउ एव्हड्या दुपारचे गेले होते म्हणजे येत असेल बाबा कुणीतरी. थोड्यावेळाने भाउ परतले. उन्हातुन आल्यामुळे त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता. 'चार दिवस झाले, तो हरबाचा दुधवाला काही आला नाहीये रे. बहुतेक आजारी पडला असावा. एकदा का तो आला की मी लावुन देतो तुम्हाला त्याच्या बरोबर.' मी भाउंवर चिडलोच एकदम. एकतर एव्हडा सगळा प्लॅन केलेला. परत उद्या महश्या, दोन्ही पश्या आणि सुन्या येणार सकाळी, सगळ्या तयारीत. आणि माझा पचका. मी भयानक चिडून तालमीच्या ग्राउंडवर गेलो. दुपारच्या रटरटत्या उन्हात, ग्राउंडवर गाढवं सोडून, काळं कुत्रं नव्हतं. मी कवठाच्या झाडाखाली जाउन बसलो. खुप चिडल्यामुळे कानाच्या पाळ्या गरम झाल्या होत्या. वाटत होतं की आता धूर निघेल कानातून. मग मी खूप वेळ गुढघ्यात डोकं खुपसून रडत बसलो. दुसर्या दिवशी सकाळी महश्या, पश्या, सुन्या, कुणीच आले नाहीत.
|
सुट्टी संपली. शाळा सुरु झाली. ऑगस्टमध्ये भाउ आणि त्यांच्या सकाळच्या फिरण्याच्या ग्रुप मधले, चिवटे अण्णा, बर्वे मास्तर, तात्या काका आणि मी, असे पाच जण आषाढी एकादशीच्या काही दिवस आधी पंढरपूरला गेलो. भाउंनी मला वारी, ज्ञानदेव्-तुकारामांच्या पालख्या, रिंगण, बाजीरावाची विहीर, विठोबाचं देउळ, असं सगळं दाखवलं. पण मुख्य म्हणजे, येताना आणि जाताना बसमधून दंडोबाचा मनोरा दाखवला. आणि म्हणाले, 'मी तुला एकदा दंडोबावर घेउन येइन नक्की.' सहामाही परीक्षा झाली. दिवाळीची सुट्टी संपून परत शाळापण सुरू झाली. सकाळी थंडी असायची. प्रार्थना सुरु व्हायच्या आधी आम्ही काही मुलं थोडा वेळ कबड्डी खेळायचो. त्या दिवशी, सकाळी कबड्डी खेळताना, शिवणीवर चड्डी फाटली. एका हातानं तशीच चड्डी पकडून प्रार्थना आणि जनगणमन संपवलं. वर्गात पोचलो तर वर्गशिक्षक म्हणाले, 'दप्तर आवरुन बाहेर पळ. तुझी आई आली आहे तुला घरी घेउन जायला.' मला कळेना की आईला कसे कळले की माझी चड्डी फाटली आहे ते. बाहेर गेटपाशी, आई रिक्षामध्ये बसली होती. वाड्याच्या दारात रिक्षा आल्यावर, एका हाताने चड्डी पकडून मी आत धाव ठोकली. आज सुट्टी, त्यामुळे दिवसभर नुसतं खेळायचं. आत आलो आणि. खालच्या खोलीत जमिनीवर भाउ झोपलेले होते. त्यांच्या नाकात कापुस घातला होता. आणि गळ्यात हार. शेजारी आजी रडत होती. शेवटची सिगरेट संपली. घश्याला कोरड पडली होती. सुर्य मावळुन अर्धा-एक तास उलटुन गेला होता. काळाकुट्ट अंधार पसरला होता. आजवर कितीतरी वेळा दंडोबावर आलो, कित्येक डोंगर दर्या पालथ्या घातल्या, जगभर हिंडलो. पण भाउंचा दंडोबा चढायचा राहिलाच. समाप्त...
|
Zelam
| |
| Thursday, October 04, 2007 - 3:02 pm: |
|
|
बेडेकर, फार आवडली. शेवट खासच.
|
Shonoo
| |
| Thursday, October 04, 2007 - 4:30 pm: |
|
|
छान लिहिलंय एकदम. पोरापोरांनी मिळून काढलेल्या असल्या स्कीम सगळ्या कायम आठवणीत रहाणार्या असतात. असे अजून किस्से असतीलच, तेही येऊ देत!
|
Arch
| |
| Thursday, October 04, 2007 - 5:18 pm: |
|
|
शंतनु, फ़ारच छान. जागा, नाती, आणि भावना फ़ारच सुंदर capture केल्या आहे.
|
शंतनू, छान. शैली छान आहे तुमची.
|
Itgirl
| |
| Thursday, October 04, 2007 - 6:04 pm: |
|
|
खूप छान लिहिलय. सुरेखच जमलय.
|
Daad
| |
| Thursday, October 04, 2007 - 10:52 pm: |
|
|
शंतनू, छानच. आर्च, स्वातीशी सहमत, अगदी. वेगळाच विषय, भाषा, फ़्लो, शेवट सगळं आवडलं.
|
Farend
| |
| Friday, October 05, 2007 - 12:22 am: |
|
|
अरे शंतनू जबरी आवडले. शेवट तर मस्तच आहे. आधीचे वर्णन वाचून आम्ही पहिल्यांदा सिंहगडावर जाण्याचा प्लॅन केला होता त्याची आठवण झाली
|
Sush
| |
| Friday, October 05, 2007 - 5:23 am: |
|
|
सुन्दर कथा, वाचताना तुमचा दंडोबा एकदम डोळ्यासमोर उभा रहातो, दंडोबाचं वर्णन खासच. अस वाटतं सगळं डोळ्यासमोर पहातेय.
|
Dineshvs
| |
| Friday, October 05, 2007 - 5:49 am: |
|
|
शंतनु, छान आहे दंडोबा.
|
Ashwini_k
| |
| Friday, October 05, 2007 - 5:56 am: |
|
|
तन्या, खुपच सुंदर! या कथेत ते दंडोबाला जाणे cancel होते ही नुसती एक घटना नाही. त्यापाठीमागे आजोबांनी न बोलताच, दंडोबावर मुलामुलांनीच जायची मनोराज्ये रचणार्या नातवाची त्याचे मन न मोडता घेतलेली काळजी दिसते. यातून व तसेच पुर्ण कथेतूनच हे सुंदर अकृत्रीम नाते तू उलगडून दाखवलेस. आजोबा असेच असतात रे! त्यांच्या काठ्या म्हणजे आपण मागे उरतो. मग पुढे जेव्हा जेव्हा ते सुतरफ़ेणीसारखे केस, चिमटीत येईल अशी कातडी, अशक्त हातांनी जवळ घेऊन दिलेला भक्कम आधार, सहज बोलताबोलता दिलेले संस्कार आठवतात तेव्हा असाच घशात आवंढा अडकतो.
|
Psg
| |
| Friday, October 05, 2007 - 6:26 am: |
|
|
वा! फ़ारच छान. आवडले!
|
Ana_meera
| |
| Friday, October 05, 2007 - 6:40 am: |
|
|
अश्विनी सारखीच मला माझ्या आजोंची आठवण आली... फार छान लिहिलेय..
|
Ashwini_k
| |
| Friday, October 05, 2007 - 7:05 am: |
|
|
मलादेखिल आमचे शेजारी वर्गातून घरी न्यायला आले होते. फ़क्त आजोबांना अजून जमिनीवर (चटईवर) ठेवले नव्हते, ते त्यांच्या कॉटवरच होते व त्यांच्याजवळ त्यांची जणूकाही मुलगीच असलेली सून म्हणजे माझी आई बसली होती. तन्या, मला आता समोरचं धूसर दिसतंय!
|
Radha_t
| |
| Friday, October 05, 2007 - 9:02 am: |
|
|
छान व्यक्तीचित्रण. हा दंडोबा काल्पनीक आहे का खरा?
|
सर्वांचे मनापासुन आभार. हा माझा पहिलाच प्रयत्न होता. दंडोबा, थोडासा खरा आणि थोडासा खोटा...
|
|
|