|
Mrinmayee
| |
| Monday, September 11, 2006 - 6:02 pm: |
| 
|
"उठा गं मुलींनो. आंघोळी आटपा पटापट. सणासुदीचे दिवस आणि बसल्यात नुस्त्या पारोश्या, हाणगोबाच्या मावश्या!!" दिवाळीला माहेरी आलेल्या आत्यांबरोबर आम्ही नाती गप्पा करत बसायचो, आणि आजी ओरडंत असायची. "अगं हाणगोबाच सांगून गेलाय जरा वेळ गप्पा मारत बसा म्हणून" इती ताई. "तुम्ही काय माझ्या बापाला जुमानणार! तुम्ही बोलून शहाण्या, अन तुमचे आजोबा न बोलता.."!! अकारण आपल्या वडलांचा आणि आमच्या आजोबांचा उल्लेख करंत आजी तिथून चालती व्हायची. आमच्या खिदळण्याला आणखी ऊत यायचा. आमच्या आजीला आम्ही "आई" म्हणंत असु. एकत्र कुटुंबात राहून आमची संबोधनं जरा मजेदार झाली होती. माझे वडील, काका, आत्या तीला "आई" म्हणणार म्हणून आम्ही पण. धाकट्या आत्या, काका माझ्या आईला "वहीनी" म्हणंत म्हणून आम्ही दोघी बहीणी आमच्या आईला "वहिनी" म्हणतो. तर हे असं सगळं! माझी आई नेहमी म्हणायची "तुमची आजी हे एक अजब रसायन आहे. कळायला फार वेळ लागतो". सुनांना छळण्याचा तीचा शेअर तीनी पूर्ण केला होता. हे देखील आम्हाला कळायचं ते आमच्या काक्यांकडून. माझी आई "अजब रसायन" या पलीकडे आजीविषयी कधीही वाकडं बोलायची नाही. गर्भ श्रीमंत घरातला जन्म! अगदी लहानपणी आईचं छत्र हरवलेलं. वडलांनी घोड्यावर बसण्यापासून ग्लास ब्लोईंग पर्यंत सगळं शिकवलेलं! अश्या घरातून आलेली 'मनोरमा' फक्त एकच गोष्ट शिकली नव्हती. आणि ते म्हणजे टुकीनं संसार करणं. १५ वर्शाची घोडनवरी झालेल्या आमच्या आजीला हुशार आणि होतकरु असा नवरा बघून त्याच्या सांपत्तिक स्थितीचा फारसा विचार न करता तिच्या वडलांनी उजवली. धाकट्या दीरांच्या खस्ता खात खात आजी हळुहळू संसाराला लागली. घोड्यावर बसणं आणि बाकीच्या हुनरीच्या गोष्टी विसराव्या लागल्या. माझ्या आईच्या तर्काप्रमाणे जन्मभर आजीला त्याच बाबी बोचत राहील्या. माझ्या आईची कथा, तिचा रेडीओवरचा कार्यक्रम ह्या सगळ्यांचं आजोबांना भारी कौतुक. ह्यावर आजी म्हणायची, "अहो, मला पुढे असं काही शिकु करु दिलं असतं तर मी ICS झाले असते." यात तसं काही अतीशयोक्ती नव्हती. रोजचा Times of India ती अथपासून इती पर्यंत वाचायची, अगदी डिक्शनरी बाजूला ठेवून. पुढे TV वर चालणारे प्रत्येक क्रिकेट मॅच आवर्जून पाहून सगळा स्कोअर लक्षात ठेवायची. येणारा जाणारा तीला विचारायचा आणि ही देखील कोण लाख रुपये देण्यालायक खेळला आणि कुणाच्या xx वर लाथ घालून काढून टाकायला हवा यावर सविस्तर समालोचन करायची! हळुहळू सगळी भावंड वेगळी झाली. धाकट्या काकाला त्याच घरात तीनी वेगळी चूल करून दिली. माझे वडील आणि तिच्यात एकाच मुद्द्यावरून खडाजंगी व्हायची. "तु चल माझ्याकडे. तिथेच रहा" "म्हातारपणी तुमच्या वडलांनी माझ्यासाठी ठेवलेलं हक्काचं घर सोडून मी कुठेही राहणार नाही. माझी काळजी करु नका. मरताना कुणाला माझ्या तोंडात पाणी देखील घालावं लागणार नाही" हे आजीचं उत्तर! भीती कशी ती माहिती नाही. दिवाळीत सुतळी बॉंब फोडायला सगळ्यात पहिले तयार. आजोबांचं ऑपरेशन तीनी बघीतलं. "चार तपावर संसार केलाय त्यांच्याशी. मला कळायलाच हवं तुम्ही काय करताय त्यांना"हे डॉक्टरला उत्तर! आजोबा गेल्यावर दोन महिन्यात दिवाळी आली असताना तीनी घरात सांगितलं, "दिवाळीचं सगळं करायचं. मी खाणार नाही. पण माझ्या नातवंडांनी कुणाच्या तोंडाकडे पहायला नको". जराशी विक्षिप्त, बरीचशी कठोर, आयुश्यावर प्रेम करणारी आणि अतीशय संतापी पण तेव्हडीच हुशार अशी माझी आजी खरोखरंच अजब रसायन आहे यावर माझा विश्वास बसायला लागला होता. मी कॉलेजच्या दुसर्या वर्गात असतानाची गोष्ट. संक्रांतीचे दिवस होते. आजी घरी आली होती. कधी नव्हे ते आईला म्हणाली, "मी कधी बोलले नाही तुला, पण एक सांगते, तुझ्याकडे बघून मला नेहेमी समाधान वाटतं. वाटतं, माझ्या माघारी माझ्या लेकींना माहेर आहे". जायला निघाली तेव्हा परत माझ्या बाबांशी वादविवाद सुरु झाला, राहण्याबद्दल. कायम मधे पडणारी माझी आई त्या दिवशी काही बोलली नाही. बहुदा सासुनी अचानक केलेल्या स्तुतीनी भारावून गेली असावी! बाबा जास्त वाद न घालता रागावून निघून गेले आणि आजी आपल्या घरी गेली. संक्रांतीत असं आजीचं जाणं आईला खटकत होतं पण एरवी देखील भितभीतच ती काही बोलायची. आज तर गप्पच बसली. २ दिवसांनी अचानक बाबा मला कॉलेजात घ्यायला आले. "चल आपल्याला आईकडे जायचय". त्यांचा चेहेरा पाहूनच मी विचारलं, "सगळं ठीक तर आहे नं?" "नाही, आज सकाळी आई गेली!" माझा विश्वास बसेना. आत्ता तर चांगली खडसावून गेली होती बाबांना. आणि हे अचानक? घरी गेलो. शांतपणे झोपल्यासारखी दिसत होती. तिची स्वयंपाकीण उशीरा येणार म्हणून स्वत: भाजी निवडायला बसली. काकीला अंघोळीचं पाणी काढायला सांगीतलं. पाणी काढून काकी परत येते तोवर भाजी निवडताना तिचा प्राण गेलेला. "आज त्यांना लवकर आटपायचं होतं सगळं. 'मनुकडे जाऊन चार दिवस राहून येते' असं म्हणाल्या." काकी सांगत होती. मनु म्हणजे माझे वडील. "रागावलाय तो माझ्यावर. तीळगुळ घेऊन जाते. म्हणजे गोड तरी बोलेल." हेही काकीला सांगीतलं. टेबलावर ठेवलेल्या डब्यात तिळाचे लाडु भरून ठेवले होते. त्या दिवशी मी माझ्या वडलांना आयुश्यात प्रथम कोसळून रडताना बघीतलं. खरंच कुणाला तोंडात पाणी न घालावं लागता माझ्या आजीनं या जगाचा निरोप घेतला. फक्त मनुला समजवायचं तेव्हडं राहून गेलं.
|
Raina
| |
| Monday, September 11, 2006 - 10:25 pm: |
| 
|
मृणमयी- खास तुझ्या शैलीत- सुरेख लिहिलं आहेस.
|
Psg
| |
| Tuesday, September 12, 2006 - 1:24 am: |
| 
|
टचिंग! मस्त लिहिलयस मृण..
|
मृण्मयी खूप छान लिहीलंय.
|
छान लिहिलयस ग.एका दमात वाचल.
|
Kaarta
| |
| Tuesday, September 12, 2006 - 4:57 am: |
| 
|
khup chaan lihilay..dolyat pani ala..ani mazha ajji chi khup athavan pan ali..
|
मृणमयी, खुप छान लिहिल आहे. डोळ्यात पाणी तर काढलसच आणि माझ्या आजीची पण आठवण आली. ती पण अशीच एकदम फ़णसासारखी वरुन कठोर पण आतुन एकदम प्रेमळ...
|
Arunima
| |
| Tuesday, September 12, 2006 - 12:10 pm: |
| 
|
मृण्मयी, खुप छान. आजी अगदि डोळ्यासमोर उभी केलीस, तुझी आणि आमच्या सगळ्यांची.
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 12, 2006 - 12:25 pm: |
| 
|
खरेच ती माणसे ताठ कण्याची होती. आताश्या कणाच मोडलाय, आपल्या सगळ्यांचा.
|
Moodi
| |
| Tuesday, September 12, 2006 - 6:07 pm: |
| 
|
खूपच हळूवार प्रेमळ नाती जपणारं लिहीलस. आजी आजोबांना नातवंडे म्हणजे दूधावरची साय असतात. गेले ते मखमली दिवस. 
|
Badbadi
| |
| Tuesday, September 12, 2006 - 11:34 pm: |
| 
|
मयी.. खरंच काय काय दडलेलं असतं ग माणसाच्या मनात.. आणि आपण तेच बघतो जे आपल्याला बघावसं वाटतं..
|
Bee
| |
| Wednesday, September 13, 2006 - 12:08 am: |
| 
|
मृ, आजीची छबी मनात चांगलीच उतरली!
|
Shyamli
| |
| Thursday, September 14, 2006 - 3:24 am: |
| 
|
हो ग मृ... खरच गेले ते दिवस
|
Zelam
| |
| Thursday, September 14, 2006 - 2:01 pm: |
| 
|
मृण छान लिहिलस गं. very touching लहानपणीचे दिवसच मंतरलेले. आता दुधावरची साय असण्याचे दिवस आपल्या मुलांचे आहेत.
|
Manuswini
| |
| Thursday, September 14, 2006 - 6:17 pm: |
| 
|
मृणमयी खरेच ग डोळ्यात पाणी आले. very touching मला माझ्या आईची अवस्था आठवली जेव्हा माझी आईची आई गेली. आई अगदी जिवांचा आकंत करुन इथुन निघाली. सगळे म्हणत होते जेव्हा आजीनी डोळे मिटले तेव्हा तीने शेवटी माझ्या आईचे नाव घेतले होते. unfortunately आईने घरात पावुल ठेवले तीन दिवसाच्या प्रवासानंतर आणी तिथे आजीने डोळे मिटले माझी आई तर चक्कर येवुन पडली bedroom च्या दारात
|
Mrinmayee
| |
| Thursday, September 14, 2006 - 7:47 pm: |
| 
|
तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रीयांबद्दल मन:पूर्वक आभार!! मनु, वाईट वाटलं तुझ्या आईचं दु:ख बघून! कितीही मोठे झालो तरी आई-वडील जन्मभर पुरावेत असं वाटतं!
|
Manuswini
| |
| Thursday, September 14, 2006 - 10:13 pm: |
| 
|
खरोखर मृणमयी, आई वडील ह्या दोनच व्यक्ती आहेत ज्या unconditional प्रेम करतात आपल्यावर. आणी आपण Selfish असतो एकदम मात्र असे मला वाटते. आजी गेल्यावर आई कधीही तिच्या त्या घरी गेली नाही. तिला जावसे वाटले नाही. आणी मी सुद्धा गेले नाही, आजीशिवाय ते घर घरच वाटले नाही
|
मृण्मयि खूप सुन्दर ग! मला माझ्या ही आजीची आठ्वन झाली.. जनू काहि तिला तिच मरण आले ल आहे हे ठावूक होत, म्हणून शेतावर जाऊन गाणी म्हणत कापणी केलि, भात मळला. काका ला सन्गितल सर्व शेतभर फ़िरवून आण म्हनुन... आणि मग प्राण सोडला काकाच्या पाठीवर दवाखान्यात जाताना... वाटेत माझ्या पप्पा च नाव घेत होति, कधी भेटायला येइल म्हनून... आम्हाला जेव्हा तार आली तेव्हा मीच सर्व प्रथम हमबर्डा फ़ोडला... मला मात्र जायला मिळाल नाहि... पण तिच वागण, बोलण अजून हि माझ्या डोळ्या समोर आहे... येते कधी कधी स्वपनात पण काही बोलत नाहि नूसतच बघत राहते माझ्या कडे... खूप जीव लावला होता तीन आम्हा भावन्डा वर.. अशी वडील मन्डळी सोडून गेल्या वर कस परक परक वाटत..... ह्या आठवणी काढाव्या तेवढ्या थोड्याच नाही का? रुपाली
|
हे सर्व वाचल आणि मला पण माझ्या आजीची खूप आठवण आली. अतिशय कष्टाळू, प्रेमळ आणि, करारी होती स्वभावानी...तिची सणासुदीची लगबग तर आजूनही आठवते मला..खरेच ही मोठी मणसं आसतात ना घरात तो पर्यंत प्रत्येक सणावाराचे वतावरण आणि गम्मत पण वेगळीच आसते... आणि आता त्यांच्या नंतर मात्र तुम्ही आगदी कही ही करा ती तशी जुनी मजा नही वटात आता... घरतल्या प्रत्येक सणवराला मझ्या आईला सुध्दा अजूनही आजीची आठवण येते आता ५ वर्ष होउन गेली तरी... कारण २५ वर्षचा सहवास होता... माझ्या आईच्या दुखण्या-बहाण्यात सुध्दा पोटच्या मुली प्रमाणे सुनेच(मझ्या आईच) करायची सगळ... माझ्या आईला स्वत:च्या आईपेक्षा सासूचा आधार आणि लळा जास्ती वाटायचा... अशी सासू मिळायला कोट्यावधी बायकांत एखदीचच नशीब असत इतक चांगल... माझे मोठे काका फ़ार पुर्वी पासून म्हंजे ३०-३५ वर्ष इथेच अमेरिकेत आहेत.... आणि आजी मात्र आमच्या बरोबर राहिली कायम... नशीबवान आहे मी आजी-आजोबांचा प्रेमळ सहवास आखंड मिळाला जवळ जवळ माझ्या लग्नापर्यंत मला... आता मात्र नुसत्या आठवणीच राहिल्या आहेत... कितीही लिहील आजीवर आणि आजोबांवर तरी शब्दफ़ुलांचे काही मोल नाही कितीही उधळली तरी कमीच पडतील.
|
Bee
| |
| Monday, September 18, 2006 - 5:03 am: |
| 
|
साधी माणसं तू नशिबवान आहेस खर तुला आजी आजोबांचा सहवास लाभला. मी जन्मायच्या आधीच माझ्या बाबांची आई म्हणजे आजी गेली होती. आजोबा तर त्याही पुर्वी गेलेत. माझी आजी खूप प्रेमळ होती असे माझे चुलत भाऊ सांगतात. एकदा तर धामण नावाचा काळा विषारी साप घरात पाणीपावसाच्या वेळेला घुसला. त्यावेळी घरात पुरुष मंडळी कुणीच नव्हती. मुलांच्या अंगावरुन सरसर तो साप जाताना आजीने बघितला आणि आपला पदर तिने सरदिशी पुढे केला आणि तो साप पदरावर उचलला आणि तसा मुलांच्या अंगावरुन आपल्या अंगावर घेतला. पण नंतर बहुतेक आजीच्या डोळ्यातील प्रेम आणि आई नसलेले चुलत भाऊ बघुन तो साप खिडकीवाटे निघून गेला. पण माझ्या आईची आई मी बघितली आहे. ती खूप वर्ष, चांगली १०५ वर्ष जगली. खूप ओरडायची ती कुणावरही. पण आता ती आठवली की नविन अर्थ लागतात तिच्या ओरडण्याचे. त्यातही प्रेम ओलावा होता ते त्यावेळी कळले नव्हते आणि आम्हीच आईला म्हणत असू की तुझी आई सतत ओरडते आम्ही तिथे गेल्यावर :-( आता त्या पिढीतले सगळे गेलेत बिचारे..
|
|
|