संवाद - शिरीष कणेकर - रार. मै अकेलाही चला था जानिबे मंजिल, मगर लोग साथ आते गये और कारवाँ बनता गया... मायबोलीच्या 'संवाद' उपक्रमाद्वारे शिरीष कणेकरांची मुलाखत घ्यायची का? असा प्रस्ताव मांडला गेला, तेव्हा सर्वप्रथम मला काय आठवलं असेल तर कणेकरांनीच त्यांच्या 'यादोंकी बारात' या पुस्तकाचे स्वगत लिहिताना ज्याचा उल्लेख केलाय तो मजरूह सुलतानपुरींचा हा शेर! त्यानंतर शिरीष कणेकर ह्या नावाने क्षणार्धात माझ्या विचारांचा ताबा घेतला आणि मग या नावाशी, या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत अनेक गोष्टी एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलर सारख्या डोळ्यासमोर दिसायला लागल्या. 'माझी फिल्लमबाजी' किंवा 'फटकेबाजी' ची कधी एकट्यानं तर कधी मित्रमंडळींबरोबर बसून केलेली पारायणं आठवली. चित्रपटसृष्टी आणि चित्रपटसंगीताशी निगडीत असलेल्या अनेक यशस्वी-अयशस्वी, नामवंत-अनामिक दिग्दर्शकांची, कलाकारांची, गायकांची, संगीत दिग्दर्शकांची कणेकरांनी करून दिलेली 'ओळख' आठवली. गोष्टीवेल्हाळ कणेकरांनी सांगितलेले अनेक आजी-माजी, देशी-विदेशी क्रिकेटपटूंचे किस्से 'मॅचचे हायलाईट्स' पाहावेत तसे पटापट आठवत गेले. 'गाए चला जा' पासून ते क्रिकेटवेध, कणेकरी, गोतावळा, सूरपारंब्या किंवा अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या डॉ. कणेकरांचा मुलगा अशा जवळपास तीस एक पुस्तकांच्या रूपात किंवा अनेक साप्ताहिकांत प्रसिद्ध होणार्या विविध विषयावरच्या ललित लेखांच्या रूपात, तुम्हा-आम्हाला कधी मनमुराद हसवणारे, हसवता हसवता नकळत विचार करायला लावणारे, कधी डोळ्यांच्या कडा हळूच ओलावणारे 'बहुरूपी कणेकर' आठवले.... .... आणि जाणवलं की 'सुनो भाई बाराती...' म्हणणार्या कणेकरांच्या हृदयातून उमटलेली साद आज खरोखरच अनेक वाचकांच्या, श्रोत्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचली आहे. हा जो 'कारवाँ ' आहे, ही जी दिंडी आहे त्यामध्ये तुम्ही, मी, आपण सगळेच आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर सामील झालो आहोत. ह्या विचारात असतानाच उत्स्फुर्तपणे 'कणेकरांची मुलाखत घ्यायला किंवा त्यासाठी कोणतीही मदत करायला मला आवडेल,' असं मी कळवून टाकलं... 'संवाद' उपक्रमात झालेल्या आधीच्या मुलाखतींपेक्षा थोड्या वेगळ्या स्वरूपात म्हणजे टेलिफोनवरून ही मुलाखत घेतली गेली. अनेक निर्माते आपला सिनेमा रिलीज करायला जसं दिवाळी पर्यंत वाट पाहातात, तसच काहीसं 'न ठरवता' ही या मुलाखतीच्या बाबतीत घडतंय. काही महिन्यांपूर्वी घेतलेली शिरीष कणेकरांची ही मुलाखत दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर तुम्हा रसिक वाचकांच्या हाती ठेवण्याचा आज योग येत आहे.... "तुम्हाला हिंदी सिनेमा आणि क्रिकेट यापैकी कोणत्या विषयावर बोलायला जास्त आवडतं?" ह्या पहिल्याच प्रश्नावर कणेकरांनी हसून "नाही हो. अस खरंच काही सांगता येणार नाही. हे दोन्ही विषय मला सारखेच जवळचे वाटतात आणि दोन्ही विषयांवर बोलायला तितकंच आवडतं, त्यात कमी जास्त काही नाही" असं उत्तर दिल्यावर आम्ही त्यावेळी चालू असलेल्या West Indies- India क्रिकेट मॅचेस्चे औचित्य साधून क्रिकेटवर गप्पा मारायला सुरुवात केली. सध्या अमेरिकेत दौर्यावर असतानासुद्धा तुम्ही क्रिकेटच्या जगात काय चाललंय याकडे लक्ष ठेऊन असता का? अगदी अगदी. आता इथे अमेरिकेत प्रत्यक्षात मॅचेस बघता येत नाहीत पण तरी मी त्या cricinfo.com वर जाऊन ball-by-ball commentary पाहतो. तुम्ही खूप लहानपणापासून क्रिकेटसाठी वेडे आहात. आजही हे वेड तितकंच टिकून आहे का? मला आठवतं तेव्हापासून मला क्रिकेट आवडतं आणि आठवतं तेव्हापासून हिंदी सिनेमादेखील आवडतो. खरं तर अशी काही घटना नाही की अशी एखादी कोणती खास मॅच नाही की जी पाहिल्यानंतर या खेळाबद्दलचं आकर्षण वाटलं वगैरे.. पहिल्यापासून म्हणजे अगदी लहानपणापासून मला ह्या दोन गोष्टींचं प्रचंड प्रेम आहे आणि इतक्या वर्षांनतर आजही ते तेवढंच आहे. माझा मुलगा माझी टिंगल करतो की बाबा मॅचचा प्रत्येक बॉल पाहतात आणि नंतर परत हायलाईट्स पण बघतात.... पण ते खरं आहे. मला कधीही कंटाळा येत नाही क्रिकेट पाहण्याचा. तुमच्या बोलण्यातून, लिखाणातून सहज लक्षात येतं की क्रिकेटबद्दल, खेळाडूंबद्दल तुमच्याजवळ अफाट माहिती आहे. आज अशाप्रकारची माहिती इंटरनेटवर खूप सहजतेने उपलब्ध आहे. पण पूर्वी जेव्हा ही इंटरनेटची सोय नव्हती तेव्हा केवळ भारतातल्याच नव्हे तर भारताबाहेरच्या खेळाडूंची, सामन्यांची माहिती तुम्हाला कशी आणि कुठे मिळायची? माझी एक "कांगा मेमोरियल लायब्ररी" नावाची लायब्ररी होती मुंबईमध्ये. 'बॉम्बे क्रीडा असोसिएशन' तर्फे ती चालवली जायची. मला क्रिकेटची आवड असल्यामुळे मी तास न् तास त्या लायब्ररीमध्ये घालवले आहेत. चरित्रं वाचली आहेत, पुस्तकं वाचली आहेत. Wisden Almanack असायचं - ते वाचायचो, इंडियन क्रिकेटची रेकॉर्ड बुक्स वाचायचो. त्यामुळे नाही म्हणलं तरी मला थोडाफार 'access' होता जेव्हा आकड्यांची गरज पडायची तेव्हा. पण खरं सांगायचं तर फार थोड्यावेळा मला आकड्यांची गरज पडलीये कारण लिहिताना आकड्यांवर माझा भर कधीच नव्हता! पण जेव्हा केव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा मला ह्या लायब्ररीचा खूप मोठा उपयोग झालाय. तुम्ही स्वतः एक उत्तम क्रिकेट समीक्षक आहात म्हणून तुम्हाला विचारावसं वाटतंय की तुमचे आवडते क्रिकेट समीक्षक कोण आहेत आणि त्यांचं लिखाण तुम्हाला का आवडतं? Sir Neville Cardus... माझे अतिशय आवडते क्रिकेट समीक्षक. कारण त्यांचाही माझ्याप्रमाणेच आकड्यावर भर फार कमी होता. त्यांचा खेळाडूच्या शैलीवर, कर्तबगारीवर आणि 'माणूस म्हणून तो खेळाडू कसा होता?' म्हणजे एकूणच त्याच्या character वर जास्त भर होता. ह्या तीनही गोष्टींचं मला खूप appeal होतं, खूप आकर्षण होतं. Neville Cardus यांनी एकदा असं लिहिलं होतं की 'नुसते आकडे जर असं दाखवत असतील की हॅटन हा मॅकलेन पेक्षा मोठा खेळाडू होता, तर धावफलक गाढव आहेत'. हा जो काही विचार त्यांनी मांडला आहे ना, तो मला त्या काळात भावला. एक किस्सा, एखादी बारीकशी आठवण जेव्हढं सांगते ते तुम्ही चार सहा पानं भरताड लिहूनही सांगू शकत नाही. नुसतं क्रिकेटच नाही, तर सगळ्याच क्षेत्रात माझ्या आजवरच्या चाळीस वर्षांच्या लिखाणात हे माझ्यावर बिंबलेलं आहे. Sir Neville Cardus यांच्या लिखाणातला तुमचा आवडता आणि कायम स्मरणात राहिलेला एखादा किस्सा सांगाल का? एक काय. कितीतरी आहेत. पण मला आवडणारा विचाराल तर... Victor Trumper विषयी लिहिताना त्यांनी म्हणलंय की बालपणी म्हणजे Neville Cardus च्या बालपणी तो Victor Trumper चा प्रचंड चाहता होता. आता Neville Cardus इंग्लंडचा आणि Victor Trumper तर होता ऑस्ट्रेलियाचा. त्यामुळे त्याच्या निष्ठा दोन्हीकडे विभागल्या जायच्या, म्हणजे इंग्लंड तर जिंकलं पाहिजे आणि Trumper तर खेळला पाहिजे... आता हे दोन्ही कसं होणार ना? म्हणून तो देवाकडे लहानपणी प्रार्थना करायचा.. की परमेश्वरा, उद्याच्या सामन्यात Victor Trumper शतक काढू दे आणि ऑस्ट्रेलियाचा चा all out १३७ होऊ दे. अतिशय सुरेख किस्सा आहे हा! Sir Neville Cardus ह्यांनी जसं क्रिकेट समीक्षक म्हणून लेखन केलंय तसंच क्रिकेटवर लिहायच्या आधी त्यांनी सिनेमावर पण लिहिलंय. क्रिकेट आणि सिनेमा हे तुमचे पण अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. हा निव्वळ योगायोग की...? (हसून) तुम्ही माझी चांगलीच फिरकी घेताय.. पण हा केवळ योगायोग आहे दुसरं काही नाही. आता राजू भारतन नाहीये का? तो पण क्रिकेटवरही लिहितो आणि गाण्यांवरही लिहितो. तुमच्या एकूणच सगळ्या लिखाणावर, मग ते क्रिकेटबद्दल असो, सिनेमाविषयी असो किंवा ललित लेखन असो, कोणाचा प्रभाव आहे असं तुम्हाला स्वत:ला वाटतं आणि तसा प्रभाव पडायचं कारण काय असावं? माझ्यामते माझ्यावर पु.लं देशपांड्यांच्या लिखाणाचा नक्कीच प्रभाव पडला की पु.लं बोली भाषेत लिहितात. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की पु.लं 'पैसे' असं लिहित नाहीत बघा कधी, ते 'पैशे' असं लिहितात. कारण पैशे म्हणल्यावर जी जवळीक वाटते ती पैसे म्हणल्यावर वाटत नाही. सबंध त्यांचं लिखाण जे आहे, ते समोर बसून बोलल्यासारखं वाटतं. कारण ते बोली भाषेत लिहिलेलं आहे. त्याला साहित्य वगैरे विद्वत्जड बोजडपणा आणण्याचा त्यांनी कुठेही प्रयत्न केलेला नाही. ह्याचा माझ्यावर विलक्षण परिणाम आहे. मी अतिशय बोली भाषेत लिहितो. 'तुमचं लिखाण वाचताना तुम्ही अगदी समोर बसून गप्पा मारताय असं आम्हाला वाटतं' असं माझे वाचक सांगतात. हा जसा प्रभाव पु.लं चा आहे तसा Neville Cardus चा पण! मुळात 'गप्पा मारल्यासारखं लिहायची' ही जी basic concept आहे ना ती मला आवडते कारण माझ्या स्वभावाला ती पूरक आहे. पूर्वी, एर्हवी पण मी तसंच लिहित होतो पु.लंचं लिखाण पाहून माझा या concept वरचा विश्वास वाढला की आपण जे करतोय ते योग्य मार्गावर करतोय, ते आपल्या पिंडाला साजेसं आहे. त्यामुळे मी तसं लिहित गेलो आणि कितीही मोठा लेख असला तरी आजही मी तसंच लिहितो. उदाहरणार्थ, मी एक नवीन 'वन मॅन शो' सादर करणार आहे - 'या कातरवेळी' नावाचा! त्याची संपूर्ण संहिता मी २००५ सालच्या लोकप्रभाच्या दिवाळी अंकासाठी लिहिली. ती वाचताना देखील लोकांनी मला हेच सांगितलं की अक्षरशः समोर बसून बोलताय आणि आम्ही ऐकतोय असं वाटतं. आता हे मी काही फार ठरवून करत नाही, माझ्या पिंडाला ते योग्य वाटतं म्हणून घडतं. माझं सगळं लिखाणच तशा प्रकारचं आहे त्यामुळे 'वन मॅन शो' ची संहिता लिहिताना 'स्टेज परफॉरमन्स' साठी मला ती वेगळी लिहावी लागत नाही किंवा लिहिलेली वेगळी करावी लागत नाही. पुन्हा पुलंच उदाहरण देतो. पुलंनी 'बटाट्याची चाळ' आधी आणि तीन-चार वर्षांनी त्याचे प्रयोग केले. प्रयोग करताना त्यांना एक शब्दही इकडे-तिकडे करावा लागला नाही ह्याचा अर्थ काय, की लिहितानाच ती बोली भाषेत लिहिली होती. त्यामुळे सादर करताना त्यांना फक्त ती वाचावी लागली. 'कणेकरी', 'फिल्लमबाजी' ह्या माझ्या सगळ्या कार्यक्रमांच्या बाबतीत अगदी असंच झालंय. मला परफॉर्म करताना काही वेगळं करावं लागत नाही कारण जसं बोलतो तसंच लिहितो. तुमच्या मते तुम्ही क्रिकेट किंवा सिनेमाचे आधी 'फॅन' आहात की 'समीक्षक'? (हसून) आधी fan आहे! त्यामुळे भारताने परवाच्या सामन्यात ५८८ धावा केल्या - सेहवाग, द्रविड आणि कैफ खेळले तेव्हा एका समीक्षकाला न शोभणारा आनंद मला झाला. म्हणजे असं काही झालं की दिवसभर मनाला थुईथुई आनंद होत असतो सारखा. जरा जरा वेळानी मला बरं वाटत असतं की 'अरे वा, आज India भारी खेळली'. हे समीक्षकाच्या बाबतीत होणार नाही. मी आधी fan असलो तरी 'लिहिताना' हा fan मी थोडा बाजूला ठेऊन लिहू शकतो असं मला वाटतं. मी नीरक्षीरविवेकबुद्धीने न्यायनिवाडा करायला बसू शकतो. म्हणजे मला आवडतो म्हणून एखादा खेळाडू टीम मध्ये असावा असं मी कधीही म्हणलेलं नाही. त्यावेळी मात्र मी टीमची गरज वगैरेचा काटेकोरपणे अभ्यास करून मत मांडू शकतो. आणि जे क्रिकेटच्या बाबतीत तेच सिनेमाच्या बाबतीतही आहे. जगदीप हा जो आचरट नट आहे तो मला अतिशय आवडतो. म्हणजे माझ्यातील जो निव्वळ fan आहे ना त्याला जगदीप हा नट खूप appeal होतो. त्याची style, त्याच ते रेकून बोलणं मला खूप हसवतं. पण उद्या जर मी लिहायला बसलो, आणि बसलोच आहे वेळोवेळी, तर 'जगदीप हा भारतातला सर्वश्रेष्ठ विनोदी नट आहे' हे विधान मी चुकूनही करणार नाही. मेहमूद त्याच्यापेक्षा किती चांगला आहे. आजकालचे हे परेश रावल वगैरे अप्रतिम नट आहेत. तुलनेत जगदीप त्यांच्या आसपासही येणार नाही. पण माझ्यातल्या माणसाला जगदीप आवडतो. सुदैवाने fan आणि समीक्षक ह्या दोन्ही गोष्टी मी वेगळ्या ठेवू शकतो आणि ठेवलेल्या आहेत. अगदी पहिल्यापासून तुम्ही हा fan आणि समीक्षक यशस्वीपणे वेगळे ठेवू शकला आहात का? की आता अनुभवातून.... अगदी सुरुवातीच्या काळात हा काटेकोरपणा करण्याचा प्रश्नच नव्हता. कारण तेव्हा मी फारसं लिहितच नव्हतो. तेव्हा फक्त एकच माणूस अस्तित्वात होता आणि तो म्हणजे क्रिकेट fan , सिनेमा fan! जसजसा लिहायला लागलो तेव्हा समीक्षक झालो आणि मी आत्ताच म्हणलं तसं सुदैवाने ह्या दोन गोष्टी वेगळ्या ठेवू शकलो. तुम्ही मघाशी म्हणालात की क्रिकेट वरची अनेक पुस्तकं तुम्ही वाचली आहेत, खेळाडूंची चरित्रं वाचली आहेत. ह्या सगळ्यांमध्ये तुमची आवडती autobiography कोणती? खुद्द Neville Cardus ची autobiography आवडली. कारण मुळात तो आधी लेखक आहे. एकूणच क्रिकेट वरची जी इतर अनेकं पुस्तकं आहेत ती 'as per to so and so' अशी आहेत. ह्यांनी असं लिहिलंय, त्यांनी असं वर्णन केलंय, ह्या ठिकाणी असा उल्लेख आहे अशा स्वरूपातली आहेत. क्रिकेट वरची स्वत: लिहिलेली अशी पुस्तकं इंग्रजीमध्ये जवळ जवळ नाहीतच. त्यामुळे एक लेखक म्हणून लिहिलेलं Neville Cardus यांचं चरित्र मला फार आवडतं. आणि क्रिकेटचं म्हणाल तर ज्या खेळाडूचं कर्तृत्व तुफान आहे, आपोआपच त्याचं चरित्र वाचायला तुम्हाला चांगलं वाटतं. कारण कुठल्या कुठल्या ठिकाणी त्यानी काय काय केलं? त्यावेळचे दौरे, किस्से आठवणी, ह्यामुळे आपोआपच ते चरित्र उत्कंठावर्धक होतं. ह्या सगळ्याच मोठ्या लोकांची चरित्र छान आहेत. उदाहरणार्थ, Truman चं किंवा Richie Benaud च फारच छान आहे. आपण वाचलेलं असतं की या दौर्यात अमुक झालं, त्या दौर्यात तमुक झालं. ही चरित्रं वाचली की ह्या खेळाडूंची त्या त्या वेळची मनोभूमिका आपल्याला कळते. त्यावेळी त्यांचा काय stand होता ते समजतं म्हणून मला ही चरित्रं आवडतात. अजून बरीच आहेत, सगळी नावं काही आत्ता आठवणार नाहीत. पण Gil Fergusson म्हणून जो होता... तो क्रिकेट खेळाडू नव्हताच मुळी. तो ४०-५० वर्षे scorer आणि baggage master होता. त्याचं पुस्तक फार छान आहे. कारण सगळे वेगळेच अनुभव आहेत ना त्याचे? आता Richie Benaud चा विषय निघालाच आहे तर मला खरंच जाणून घ्यायला आवडेल की तुमचे आवडता क्रिकेट commentators कोणते? Richie Benaud जसा सगळ्यांना आवडतो तसाच तो मलाही आवडतो. पण मला तो जरा जास्त 'non-committed' वाटतो. एका ठराविक काळानंतर या गुणाचं आकर्षण थोडं कमी होतं. Non-commited असणं फार मोठी गोष्ट आहे, हा एक फार मोठा virtue आहे. पण over a period of time ऐकल्यानंतर तुम्हाला वाटायला लागतं की ह्याने आत्ता इथे काहीतरी स्पष्ट मत दिलं असतं तर चांगलं वाटलं असतं. कारण एव्हढं मोठं standing आहे त्याचं, त्याला मत द्यायचा अधिकार आहे, त्याच्या मताला आज किंमत आहे. आणि अशावेळी जर तो काहीच मत देणार नसेल तर थोडसं हिरमुसल्यासारखं होतं. अलीकडे मला Michael Holding खूप आवडतो. त्याचे ते West Indian उच्चार असूदेत, त्याला विनोदाची जाण आहे आणि तो छान बोलतो. शिवाय Ian Chappell आवडतो. मला Boycott आवडतो. काही लोकांना तो खटकतो कारण तो फटकन काहीतरी मत देतो, पण माझ्यामते फार विचार करून आणि फार अभ्यासपूर्वक दिलेली असतात त्याची मतं. आता त्याची बोलण्याची style शब्दश: घेऊन कसं चालेल? कोणतातरी bowler त्याला फालतू वाटला तर तो म्हणतो "माझी आई देखील खेळली असती त्याची bowling ". आता ही त्याची बोलण्याची लकब झाली. आई देखील खेळली असती म्हणजे लगेच काय खरंच त्याची आई बॅट घेऊन मैदानात आली नसती. त्याचा म्हणायचा उद्देश इतकाच की अतिशय टाकाऊ, टुकार bowling टाकतोय तो. मला त्याची commentary आवडते. आपल्याकडे रवी शास्त्री चांगलं बोलतो. अलीकडे संजय मांजरेकर खूप छान बोलतो. खूपच आत्मविश्वास आलाय त्याच्यात. आज आपले लोक त्यांच्या तोडीस तोड बोलतात, बरं वाटतं. परवा संजय मांजरेकर श्रीलंकेतल्या मॅचेसच्या वेळी होता commentary करायला. दुसर्या दोन देशातील खेळांच्यावेळी commnetary करायला आपल्या देशातील लोकांना निमंत्रण द्यावं ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे. आता आपण थोडं तुमच्या लिखाणाकडे वळूयात. तुमच्या या क्रिकेट आणि सिनेमाविषयीच्या लेखनाबद्दल म्हणजे एकूणच तुम्ही लिहायला कधीपासून सुरुवात केली, या विषयांवर काहीतरी लिहावं असं का वाटलं याबद्दल जरा सांगू शकाल का? त्याकाळी क्रिकेट वरचे काही लेख मी वाचले आणि मला वाटलं की ही क्रिकेट वरची जी माहिती या लेखात दिलेली आहे ती सगळी माझ्याकडे आहे. आणि इतपत मी पण लिहू शकीन, मला त्यात काही अडचण वाटली नाही. आता लिहू शकीन तर लिहून बघायला काय हरकत आहे? असा विचार करून मी काही लेख लिहिले आणि मग कुठे अमृत, श्रीयुत, मोहिनी असे छापायला पाठवले आणि ते छापून आले. आता छापून आल्यावर हुरूप वाढला की संपादकाकडून आपल्या लेखांना acceptance आहे, recognition आहे. आणि मग लिहायला लागलो ते आज ४२ वर्षे लिहितोच आहे. ज्या कारणामुळे क्रिकेटवर लिहिलं त्याच कारणांनी मी सिनेमावर लिहायला सुरुवात केली. आपल्याला एवढी आवड आहे, एवढी माहिती आहे तर लिहून पाहावं म्हणून लिहायला सुरुवात केली. पहिला लेख मी दिलीप कुमार वर लिहिला 'मोहिनी' मध्ये. त्या काळात म्हणजे साधारण १९६६-६७ सालची गोष्ट असेल, दरवर्षी मोहिनीचा ऑगस्ट, सप्टेंवर च्या सुमारास 'चित्रपट विषेशांक' निघायचा त्यावेळी आजकालसारखे वर्तमानपत्राच्या पुरवणीत काही असे लेख छापून यायचे नाहीत. तुम्ही लिहिलं तरी छापणार कुठे? असा प्रश्न असायचा. मोहिनी, रसरंग अशी मोजकी मासिकं होती ज्याच्यात सिनेमाविषयीच्या लेखांना प्रसिद्धी मिळायची. त्यामुळे वर्षातून एकदा येणारा हा चित्रपट विषेशांक आम्हाला फार मोठा आधार वाटायचा. तेव्हा मी लिहिलेला हा दिलीप कुमारचा लेख छापून आला आणि खूप खूप गाजला कारण त्या काळी मासिकांना वगैरे वाचक पण भरपूर होते. लेख लोकांना आवडला म्हणल्यावर उत्साह आला आणि मग मी लिहायला लागलो. 'गाए चला जा' किंवा 'यादोंकी बारात' मध्ये समाविष्ट केलेल्या किंवा तुमच्या चित्रपटाविषयीच्या, चित्रपटसंगीताविषयीच्या सगळ्याच लेखमाला खूप गाजल्या, त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ह्या यशामागचं रहस्य सांगाल का? मी मघाशी सांगितलं की आजकालसारखे त्यावेळी वर्तमानपत्रातून, मासिकातून चित्रपटविषयक लेख फारसे छापून यायचे नाहीत. त्यामुळे काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे जसे काही तोटे होते तसे फायदे पण होते. काहीही नसल्यामुळे तुम्ही देत असलेल्या माहितीचं प्रचंड कौतुक होत होतं, चीज होत होतं. गाण्याचं म्हणाल तर मला गाण्याची फक्त म्हणजे फक्त आवड होती आणि 'रेडियो सिलोन' हा गाणी ऐकण्याचा एकमेव source होता. त्यावेळी हरमंदसिंग हमराज नव्हता की नेरूरकरांची पुस्तकं आली होती की ज्यामुळे गाणी, सिनेमे, म्युझिक डायरेक्टर, कलाकार, कवी, गाण्याचा रेकॉर्ड नंबर ही सगळी माहिती आज तुमच्या दाराशी उपलब्ध आहे. तेव्हा काही म्हणजे काहीही नव्हतं. मला हिंदी चित्रपटाचं अतिशय आकर्षण होतं, त्यावर लिहायला आवडत होतं म्हणून मी लिहायला लागलो. मला खूप वाचक मिळाले कारण हिंदी चित्रपट संगीत हा लोकांच्या आवडीचाच विषय आहे, फक्त त्यावर आधी कोणी अशा प्रकारचं साहित्य लिहिलं नव्हतं. कदाचित चित्रपट संगीतावर लिहिणं त्याकाळी कमीपणाचं वाटत असेल, शास्त्रीय संगीतावर लिहिणं श्रेष्ठत्वाचं वाटत असेल. पण मला आवडलं म्हणून मी सिनेसंगीतावर लिहिलं. लोकांनाही काहीतरी वेगळं आणि तरीही आवडीच्या विषयावरचं वाचायला मिळाल्यामुळे त्याला भरपूर यश मिळालं. पुण्याचे 'अलूरकर कॅसेट कंपनी'चे मालक अलूरकर मला एकदा सांगत होते की लोक "गाए चला जा' पुस्तक घेऊन यायचे आणि म्हणायचे की यातली ओळीने सगळी लताची गाणी आम्हाला टेप करून द्या. ह्या "गाए चला जा" पुस्तकाच्या चार का पाच आवृत्त्या निघाल्या. एक लतावर लेख मोठ्ठाच्या मोठा. एक नूतन वर लेख. काही म्युझिक डायरेक्टरवर लेख, तलत मेहमूदवर लेख... असं एकत्र संचलीत पुस्तक आल्यावर त्यानं हंगामा केला मराठीत. त्यापूर्वी कोणी सिनेमावर लिहिलेलंच नव्हतं. हेच या सगळ्या यशाचं रहस्य आहे! आजकाल काय आहे की माहितीपोटी जरी कोणी लिहिलं तरी त्याला त्याचं किती credit मिळेल, कौतुक होईल याची मला शंका आहे. कारण लोकांना माहीत आहे की यातलं बरचसं इंटरनेटवर उपलब्ध आहे. Google पाहिलं की सापडू शकतं. त्यामुळे माहिती दिल्यामुळे जे कोडकौतुक एकेकाळी माझ्या वाट्याला आलं ते कदाचित माहीतगार असूनही नवीन माणसाच्या वाट्याला येणार नाही. (अपूर्ण...) संवाद (भाग २) >>
|