« | »




फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार ...

मला कुंभारकाम करायला लागून जवळपास तीन वर्षे होत आली, पण अजूनही ते सगळे कालच सुरु केले आहे अशा तर्‍हेने झटापट चालू असते. घरात जिकडे तिकडे विचित्र आकारांची आणि रंगांची भांडी पडलेली असतात. चार लोक पोहे खायला आले तर चौघांना वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगाच्या, आकाराच्या, ताटल्या अन् भांडी मिळतात. माझे बिचारे देवही त्यातून सुटले नाहीत. उदबत्तीचे घर, दिव्याखालची ताटली हे सगळे - अपना हाथ जगन्नाथ ह्या प्रकारात मोडणारे!

त्याचे असे झाले, एका मैत्रिणीने मला भर दुपारी फोन केला आणि सांगितले की ती pottery च्या क्लासला जाणार आहे. त्यावेळी मी माझे किडे काढण्याचे काम तळपत्या उन्हात सगळ्या जगाला शिव्या घालत करत होते. तिने मला विचारले 'तुला यायचंय का?' डोक्यात सतत 'आपण ह्या IT च्या रुक्ष दुनियेत काय करतो आहोत' हे होतेच. मी माझ्याही नकळत तिला 'हो' म्हणून टाकले. तिने पण शहाण्या मुलीसारखे सगळे details मला कळवले. त्यात एक वाक्य होते 'Please dress appropriately' . आता माझ्या मनात शंका. कारण तो क्लास एका उच्चभ्रू वस्तीमध्ये होता. मी लगेच परत टपाली चौकशी केली की त्यांचे असे काही खास कपडे असतात ते घ्यावे लागतील का? तिचा लगेच फोन - 'तू बावली है क्या? नही रे, फटे जीन्स पहेनके आ | ' मग अस्मादिकांच्या डोक्यात प्रकाश पडला!

मग शनिवारी सकाळी आठ वाजता त्या क्लासला जायला निघाले. पस्तीस मैलांचा प्रवास करून तिथे पोहोचले तर सगळीकडे मस्त धुळीचे साम्राज्य. कुठून तरी मस्त जळका वास येत होता. मी लहानपणी कुंभार लोक मडकी कशी बनवतात, भाजतात वगैरे पाहिले होते त्यामुळे तसेच काहिसे इथे असेल असे वाटत होते. तिथे जाऊन बघते तर सगळे आधुनिक! Accelerator वर चालणारे चाक! स्टुलवर बसून दोन मुली मडक्यांना आकार देत होत्या. त्या स्टुडिओची मालकीण तिथे बसलेली होती. तिने बरीच काही काही माहिती भरून घेतली आणि चित्र विचित्र नावे असलेली अवजारे दिली. ती अवजारांची पिशवी आणि एक २५ पौंडाची मातीची पिशवी ताब्यात घेतली आणि माझ्या पहिल्या शिक्षकाने मला आणि मैत्रिणीला ताब्यात घेतले. सगळ्या स्टुडिओची सहल घडवली.

मग एका चाकासमोर आम्हाला बसविले आणि ते कसे चालू करायचे वगैरे सांगितले. एक छोटा गोळा घेऊन तो कसा मळायचा, चाकावर कसा ठेवायचा, चाक चालू करुन त्याचा वेग कमी जास्त कसा करायचा, मातीच्या गोळ्याला आकार देत तो कसा वाढवायचा ह्याचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. मला वाटले मला काहीही जमणार नाही, पण जमले! ह्या चाकावर करायच्या process ला Throwing म्हणतात. पहिला वहिला बाउल तयार झाला - one ugly looking thing! पण मी केलेला पहिला बाउल म्हणून मी अजून जपून ठेवला आहे.

एकदा एक भांडे तयार झाले की ते leather hard होईपर्यंत थांबावे लागते. जर बर्‍यापैकी ऊन असेल तर ते एका दिवसात त्या consistency ला येऊ शकते. पण मी फक्त शनिवारीच जात असल्याने आमचे शिक्षक ते प्लास्टिकमध्ये झाकून ठेवतात त्यामुळे आठ दिवसात ते पाहिजे तितके वाळलेले असते. पुढची पायरी असते ती म्हणजे भांड्याला नीट आकारात आणायचे. त्याला trimming म्हणतात. हे झाले की भांडे सुबक दिसायला लागते. ते भांडे मग पूर्ण वाळू देतात आणि पहिले फायरिंग (firing) करतात. या पहिल्या फायरिंगला bisque firing म्हणतात. पहिल्या फायरिंग नंतर ही भांडी भारतात जी मडकी मिळतात तशी होतात. आता ही भांडी रंगवण्यासाठी तयार होतात.

रंग तीन प्रकारे देता येतो. एक प्रकार म्हणजे भांडे leather hard असताना त्यावर रंगवणे. हा रंग म्हणजे मातीत रंग मिसळलेला असतो आणि ह्याचे दोन ते तीन थर दिल्याशिवाय रंग उठावदार दिसत नाही. यातलाच एक वेगळा आणि अतिशय देखणा प्रकार म्हणजे पूर्ण भांडे रंगात रंगवून त्यावर नक्षी कोरणे. ह्याला scraffito असे म्हणतात.

भारतात पूर्वी ज्या साध्या कपबश्या मिळत असत त्या ह्या प्रकारे रंगवलेल्या असत. ह्या प्रकारच्या रंगकामाला slipwork असेही म्हणतात. जे रंग earth tone या प्रकारात मोडतात आणि अगदी नैसर्गिक असतात.
दुसरा प्रकार म्हणजे एकदा भाजून आलेले भांडे सरळ हव्या त्या ग्लेझ मध्ये बुडवायचे आणि दुसर्‍यांदा भाजायचे. ह्याचे रंग म्हणजे राख, काचेची पूड आणि रंग यांचे मिश्रण असते. हे रंगकाम एकदम सोपे असले तरी जेव्हा भांडे किल्न मधून भाजून बाहेर येते तेव्हा तुम्हाला हवा तोच रंग येईल याची शाश्वती नसते. ह्यात दोन ते तीन वेगवेगळे ग्लेझ वापरुन विविधता आणता येते. रंग अतिशय उठावदार असतात.

तिसरा प्रकार म्हणजे एकदा भाजलेल्या भांड्यावर underglaze वापरुन वरुन एक clear glaze द्यायचा. ह्या प्रकारची भांडी पहिल्या प्रकारातल्या भांड्यांसारखीच दिसतात पण रंगात अधिक विविधता असते कारण रंग रासायनिक प्रक्रियेने तयार केलेले असतात.



सुरुवातीला मी अतिशय जाडीभरडी माती वापरत असे कारण ती चाकावर आकार द्यायला सोपी पडते. नवशिक्या माणसाला ते तसेच बरेही असते. ह्यात मातीबरोबर थोडीफार वाळू मिसळतात. मोठे मोठे शोपिसेस साधारणपणे ह्या मातीचे करतात कारण कितीही मोठे करता येतात. सगळ्यात अवघड माती म्हणहे पोर्सेलीन. ही माती अक्षरशः लोण्यासारखी मऊ असते. ही माती वापरुन मोठी भांडी करणे हे अतिशय कौशल्याचे काम!


माझ्या क्लास मधले किल्न high fire वाले आहेत. याचा अर्थ असा की मी केलेली भांडी microwave, dishwasher, oven मध्ये आपण वापरु शकतो. ह्या प्रकारासाठी लागणारी माती, ग्लेझ वगैरे वेगळे असतात. आमच्या किल्न मधले पहिले firing १५०० डिग्री farenheit वर भाजतात आणि ग्लेझ घालून केलेले दुसरे firing २५०० डिग्री farenheit वर होते. मला त्यातल्या तांत्रिक बाबींबद्दल अधिक माहिती नाही.

गेल्या वर्षी भारतात गेले तेव्हा मम्मी, पप्पा आणि भावासाठी चहाचे कप घेऊन गेले होते. प्रत्येक कप वेगवेगळ्या आकाराचा! कितीतरी प्रकारचे बाउल, flower pots , कप वगैरे केले पण सगळ्यात करायला कठीण प्रकार म्हणजे चहाची किटली, जी मी अजून केलेली नाही. मुख्य भांडे, तोटी, दांडा, झाकण ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या करुन एकत्र जोडायच्या. कुठे काय बिनसेल किंवा वाकडे होईल सांगता येत नाही!

गेल्या तीन वर्षात कुणालाही विकत घेऊन गिफ्ट दिलेले नाही. गेल्या तीन वर्षात क्लास करताना अनेक अडचणी आल्या. नोकरी गेली, परत मिळवताना त्रास झाला, बर्‍याच घडू नयेत अश्या वाटणार्‍या घटना घडल्या. क्लास सोडून द्यावा लागला. परत नोकरी लागली. सगळे स्थिरस्थावर झाले आणि क्लास पुन्हा सुरु झाला. मला कित्येक लोकांनी वेड्यात काढले की शनिवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत लोळायचे सोडून कुठे मातीत खेळायला जातेस? पण माझ्याकडे असलेले एकन् एक भांडे बनवतानाची एक एक पायरी मला ते भांडे वापरताना आठवते. प्रत्येक भांडे मी जिवापाड सांभाळते. मैत्रिणींना दिलेली भांडी नीट वापरा म्हणून सांगते. मध्यंतरी घर बदलताना तीन भांडी फुटली, काही मैत्रिणींना चटणीसाठी दिलेली भांडी त्यांनी अडगळ म्हणून टाकून दिलेली पाहिली. खूप वाईट वाटले. पण चांगले अनुभवही आले. काही मैत्रिणींच्या आयांनी माझ्याकडून हक्काने काहीतरी बनवून नेले.
माझी चहा साखरेची भांडी, आमटीचे झाकणाचे भांडे, कप, आईस्क्रीम खायचे बाउल, तुपाचा डबा आणि असंख्य लहान मोठ्या बाउलने माझे स्वयंपाकघर भरलेले आहे. आता दिवाळीच्या पणत्या बनवते आहे. त्यानंतर एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेणार आहे - सहा एकसारख्या प्लेट बनवायचा! बघू, नीट जमल्या तर तुम्हाला जेवायला बोलावेनच!

माझी क्लासमधली एक केनियामध्ये जन्मलेली आणि वाढलेली शिक्षिका नेहमी म्हणते 'We did not get enough mud to play with when we were kids. So, here we are playing with mud again and trying to be a kid again!'



- कराडकर