भारतीय तत्वचिंतनाचा वेध : वेद ते वेड? या लेखाचे तीन मुख्य भाग आहेत : (1) भारतीय तत्वज्ञानाचा वेदकालापासून एक संक्षिप्त आढावा, (2) तत्वचिंतनात ज्या काळी सूत्रबद्धता आली त्या काळातील दर्शनांची रूपरेषा, (3) सद्यस्थिती व त्यावरील माझे मत. भारतीय तत्वज्ञानाच्या साहित्याचे चार मुख्य भाग म्हणजे : श्रुती, स्मृती, सूत्र आणि भाष्य ( वेद साहित्याचा तक्ता पहा ) . वेदकालीन साहित्य हे श्रुती या प्रकारात मोडते. त्याचे चार मुख्य भाग पडतात. : मंत्र / संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. संहितांचा काळ हा २५०० ते १५०० BCE या दरम्यानचा. वेदकर्त्यांचे देव हे निसर्गदत्त : आप, पृथ्वी, अग्नी, वायू, पर्जन्य इ. वेदांच्या ऋचा या मुख्यतः स्तुतिपर आहेत. ढोबळमानाने बोलायचे झाले तर ऋग्वेदामध्ये, जो की सर्वात जुना वेद आहे, या व इतर अनेक नैसर्गिक शक्तींना केलेले आवाहन आणि त्यांची स्तुती आहे. यजुर्वेदात त्यांना प्रसन्न करण्याकरताचे मार्ग सांगितले आहेत. सामवेदात शक्तींना पाचारण करण्याचे, तसेच होम - हवनादी विधींचे मंत्र छंदबद्ध स्वरूपात दिले आहेत. तर शेवटच्या अथर्ववेदात काही चमत्कार, मंत्र ( त्यात वशीकरण देखील आले ) आहेत. वेदकर्त्यांचे तत्वज्ञान खचितच पुढारलेले होते. अनेक बाबींवर त्यांच्या काळानुरूप त्यांनी केलेला सखोल अभ्यास दिसून येतो. संहिता ते उपनिषद हे मार्गक्रमण होताना देव या संकल्पनेत आमूलाग्र बदल झाला. निसर्गदत्त नानाविध शक्तींनी आधी मानव रूप धारण केले आणि मग हळूहळू ते सर्व देव एकमेकांत विलीन होऊन एक निराकार असा परब्रह्म उरला. हा प्रवास साधासुधा मुळीच नव्हता. ब्राह्मण हे संहितांबरोबर कर्मकांड या प्रकारात मोडतात. आरण्यक हे विधी करणे शक्य नसे तेव्हाकरताचे होत. उपनिषदांमध्ये विधींची जागा कारणमिमांसा घेऊ लागली होती. उलट - सुलट अनेक विचारांचे उत्तम नमुने वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये आढळतात. नंतरचा काळ स्मृतींचा. महाकाव्ये, भगवद्गीता, धर्मशास्त्र, इतिहास या काळातील. मुख्य म्हणजे नास्तिक (= वेदांना न मानणारे ) पंथ देखील याच दरम्यान उदयास आले. बौद्ध, जैन आणि भौतिकवादी लोकायत देखील. एकाच मुख्य देवाशी संलग्न अशा शैव आणि वैष्णव पंथांचा जन्म देखील तेव्हाचाच. अनेक प्रकारच्या कल्पनांनी / विचारांनी हे सर्व साहित्य ओतप्रोत भरलेले होते. यातील काही मुख्य शाखा अनेक वादविवादातून तावून सुलाखून निघाल्या आणि सूत्रबद्ध झाल्या. या आस्तिक (= वेदांना प्रमाण मानणार्या ) परंपरा म्हणजेच भारतीय तत्वज्ञानाची दर्शने होत. भारतीय तत्वज्ञान जर एका वटवृक्षासारखे कल्पिले तर ही सहा दर्शने ( आणि इतर नास्तिक परंपरा देखील ) म्हणजे जणू त्याच्या पारंब्या. न्याय ( गौतम ): न्याय करणे म्हणजे मनाला कारणांद्वारे पटेल अशा निष्कर्षाप्रत पोचणे. प्रमात्राला प्रमितीद्वारे प्रमेयापर्यंत पोचवणारे एक प्रमाणशास्त्र. हे सर्व जरी विज्ञाननिष्ठ असले तरी प्रत्यक्षाला सर्वात जास्त महत्त्व असे. प्रत्यक्ष म्हणजे मुळात ज्ञानेंद्रियापासून मिळणारी जाण. पण पुढे त्याचा अर्थ कोणत्याही प्रकारे होणारी जाण असा झाला. जाण व अनुमान या व्यतिरिक्त उपमान (analogy) आणि शब्द (verbal authority) हे देखील प्रमाण मानले जाऊ लागले. वैशेषिक ( कणाद ): पदार्थाच्या विशेष गुणधर्मावरून या दर्शनाचे नाव 'वैशेषिक' असे पडले. सत्य पडताळणे म्हणजे पदार्थांच्या गुणविशेषांवरून निष्कर्शापर्यंत पोचणे. आत्मा असतो हा निष्कर्श यावरून काढला जातो की आपले मन हा आपल्या शरीराचा गुणधर्म असू शकत नाही. वेगवेगळ्या लोकांची मने वेगवेगळे विचार करतात म्हणजे त्यांचे आत्मे वेगवेगळे असले पाहिजेत. प्रत्येक आत्म्याची वैशिष्ठ्ये वेगळी. मुक्त आत्म्यांची देखील. अणुवादाची देण कणादाचीच. मात्र त्याचे अणू हे पृथ्वी, तेज व वायू हे होत. न्याय सूत्रांना देखील अणुवाद मान्य होता. देव या संकल्पनेचा उल्लेख मूळ वैशेषिक सूत्रात कुठेही नाही. सांख्य ( कपील ): या पद्धतीत उत्क्रांतीवर भर दिलेला आहे. न्याय व वैशेषिक यांची अनेकविध विभाजने दोन मुख्य गटांमध्ये एकत्र करण्यात येतात : प्रकृती व पुरुष. पुरुष म्हणजे ज्याला जाणीव होते तो आणि प्रकृती म्हणजे जड पदार्थ. सत्व, रज, तम हे त्रिगुण ही सांख्यांची देण आहे. या गुणांच्या वेगवेगळ्या प्रमाणामुळे वस्तूंना त्याचे स्वत्व मिळते ( व पुरुषाला विविधता जाणवते ) . पुरुषामुळेच प्रकृतीची उत्क्रांती होऊ शकते. सत्वापासून मन व ज्ञानेंद्रियांचा उदय होतो. व्यक्ती म्हणजे शरीर किंवा मन नव्हे तर अनंत आत्मा. सांख्य देखील सर्व आत्मे वेगवेगळे असतात असे मानते. सर्व आत्मे नेहमीच मुक्त असतात. योगसूत्रांद्वारे ही जाणीव कशी होऊ शकते ते दाखवले जाते. योग ( पतंजली ): पुरुषाला प्रकृतीच्या बंधनातून वेगळे करण्याचा मार्ग म्हणजेच योग. प्रकृतीमुळे चित्त विचलीत होते. आत्म्याची चित्तापासून मुक्तता म्हणजेच खरी मुक्तता. विचारांवर विजय मिळवून हे साध्य करण्याचा मार्ग म्हणजे योग. योगसामर्थ्याद्वारे अलौकिक शक्ती प्राप्त होऊ शकतात. त्या मिळवणे म्हणजे मुक्तीच्या मार्गात अडथळा आणणे. पूर्व मिमांसा ( जैमिनी ): वेदांमधील धर्मासंबंधी मिमांसा करु पाहणारे हे दर्शन. वेद हे अपौरुषेय. त्यातील शब्द, त्यांचे अर्थ आणि उच्चार यांची मिमांसा यात आढळते. कर्म आणि फल यात थेट संबंध आहे. फल मिळेपर्यंत ते अपूर्व नामक स्थितीत असते. मुक्ती म्हणजे स्वर्गवास. वैदिक देवदेवतांचे हवन मान्य होते, पण सर्वव्यापी ब्रह्मन बद्दल आग्रह नाही. किंबहुना, देव नाही असे न म्हणता, अनुल्लेखाने तो प्रश्न कमी महत्वाचा बनवला आहे. न्याय व वैशेषिक यांच्यात जाणीव, अनुमान, उपमान व शब्द व्यतिरिक्त अजून दोन प्रमाणे ग्राह्य मानली; अर्थपत्ति (postulation) आणि अभाव (negation) . सर्वात मुख्य म्हणजे सर्व प्रमाणांना सत्याची योग्यता दिली. त्यामुळे वेद आपोआपच पूर्ण सत्य झाले. उत्तर मिमांसा / वेदांत ( बादरायण ): यात वेदातील तत्वज्ञानाची म्हणजेच वेदांच्या अंतिम ध्येयाची मिमांसा आहे. उपनिषदांवर आधारीत या सूत्राला ब्रह्मसूत्र अथवा शारीरक सूत्र असेही संबोधतात. यातील सर्व ५५५ सूत्रे ही प्रत्येकी दोन - दोन, तीन - तीन शब्दांचीच अतिशय त्रोटक अशी आहेत. विस्तृत भाष्यांशिवाय ती समजणे अशक्य आहे. वेदांतावर पुढील अनेक शतके बरीच भाष्ये झाली. अनेकदा परस्पर विरोधी आणि झणझणीत टीकाही झाल्या. जशी सहा सूत्रे निर्माण झाली तशीच या एका सूत्रामधून तीन मुख्य शाखा काळाच्या ओघात बनल्या. त्या म्हणजे शंकराचे अद्वैत, रामानुजाचे विशिष्ठद्वैत (= विशिष्ठ + अद्वैत ) आणि माधवाचे द्वैत. अद्वैत (~ 800 CE): आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करण्याची गरज नाही व ते शक्यही नाही कारण सर्व सिद्धासिद्धतेचे मूळ आपला आत्माच आहे. आत्मा अनंत व वैश्विक असतो. जग हे मिथ्या नाही पण अंतिम सत्यही नाही. ब्रह्मन हे या जगापलीकडील आहे. आत्मा आणि ब्रह्मन एकच आहेत. मोक्ष म्हणजे विद्येनी अविद्येची जागा घेणे. विशिष्ठद्वैत (~ 1000 CE): सजीव तसेच निर्जीव हे ब्रह्मन वर अवलंबून असतात. या पद्धतीचा कल भक्तीमार्गाकडे आहे. आत्मा व ब्रह्मन एक होऊ शकत नाहीत. मुक्ती म्हणजे सतत ब्रह्मनाची जाणीव असणे. द्वैत (~ 1200 CE): विष्णू म्हणजे ब्रह्मन अथवा ईश्वर. त्याच्या आज्ञेने सर्व व्यवहार चालतात. पूर्वसंचिताची ( कर्माची ) पापे धुवून निघेपर्यंत आत्मा जीवनचक्रात अडकून राहतो. ईश्वराचे नित्य पूजन म्हणजे मुक्ती. साधारण सहाव्या शतकापर्यंत भारतीय तत्वज्ञान जिवंत होतं. उत्क्रांत होत होतं. तेव्हा ज्ञात असलेल्या सर्व बाजूंना फोफावत होतं. एक प्रकारची लवचिकता त्यात होती. कर्मकांड जरी प्रचलित असली तरी सर्व गोष्टींना एक वैचारिक बैठक होती. कधी कधी ते विचार चुकतही. नंतर साधारण सतराव्या शतकापर्यंत योग / गीता / वेदांत या दोन - तीन पारंब्यांवरच बराचसा गोतावळा जमू लागला. युरोपातून Industrial revolution ची नांदी झाली. पण तेव्हा पारतंत्र्यात असलेल्या भारतीयांची वैचारिक क्षमता दुर्बल झाली होती. आपण द्वैतवादी की अद्वैतवादी हे ही न कळणारे आपल्या इतिहास व परंपरांची शेखी मिरवायला मात्र चुकत नसत. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या साठ वर्षांत मात्र ज्ञानकांडाकडेही लोक वळताहेत. जुन्या तत्वज्ञानाच्या सर्व पारंब्या बळकटपणाकरता तपासून पहाताहेत. काळानुरूप बदलत, लवचिकता टिकवत, नव्या पारंब्यांची भर घालताहेत. जुन्या पारंब्या नाविन्यपूर्णरित्या जोडताहेत. कालबाह्य झालेली कर्मकांडं मोडीत काढताहेत! आणि असे होत नाहीये असे वाटत असेल तर तसे होऊ शकण्याकरता मदतीचा हात पुढे करणार ना? संदर्भ सूची : - A sourcebook in Indian Philosophy Eds. Sarvepalli Radhakrishnan and Charles A. Moore, Princeton paperbacks, 1973- -Myths and symbol in Indian art and civilization, Heinrich Zimmer, Ed. Joseph Campbell, Bollingen series, Princeton, 1974 - India - a short cultural history, H G Rawlinson, Praeger university Press, 1952 - Sources of Indian tradition, Vol. I, Eds/compilers WM Theodore de Bary, A L Basham, R N Dandekar, Peter Hardy, V Raghavan, R Weiler
http://www.astro.caltech.edu/~aam -आशिष महाबळ
|