|
Moodi
| |
| Sunday, January 01, 2006 - 4:24 pm: |
| 
|
सांजोरी साहित्य : १ वाटी बारीक रवा, १ वाटी गुळ, १ वाटी मैदा किंवा कणीक, तुप, १ चमचा खसखस, वेलदोडा अन जायफळ पुड. कृती : रवा तुपात भाजावा त्यावर २ ते ३ चमचे गरम पाणी शिंपडुन परत भाजावा. दुसरीकडे गुळ किसुन त्यात १ चमचा पाणी घालून मंद आंचेवर ठेवा. त्यात वेलदोडा पुड अन जायफळ पुड व खसखशीची भाजुन पुड घाला. नंतर भाजलेला रवा कोमट झाला की या गुळाच्या मिश्रणात घालुन घोटा. अन त्याचे छोटे छोटे उंडे म्हणजे गोळे करुन ते डब्यात भरुन रात्रभर फ्रीझमध्ये ठेवा. दुसर्या दिवशी सकाळी मैदा किंवा कणिक किंचीत मीठ व तेल घालुन घट्ट भिजवा. कणिक असेल तर ती २ दा चाळुन घ्या. सारणाच्या गोळ्या एवढिच मैदा वा कणकेची गोळी करुन त्यात सारण भरुन छोट्या पुर्या लाटा. gas वर तवा गरम करुन ही पुरी म्हणजे साटोरी दोन्ही बाजुने जरा गुलाबीसर शेकुन घ्या अन मग तुपात तळा. गार झाली की डब्यात भरा. आधी शेकुन काढली की जास्त दिवस टिकते.
|
Moodi
| |
| Tuesday, January 03, 2006 - 9:14 am: |
| 
|
खव्याची साटोरी. साहित्य : १ वाटी बारीक रवा, १ वाटी मैदा, २ टेस्पुन कडकडीत तुपाचे मोहन, चिमुट मीठ, दुध, तांदळाचे पीठ, तुप. सारण : पाव किलो खवा, अर्धी वाटी रवा, १ टेस्पुन भाजलेली खसखस, २ वाटी पिठीसाखर, वेलदोडा जायफळ पुड, तुप. कृती : साजुक तुपावर रवा मधुन मधुन दुधाचा शिपका मारुन खमंग भाजुन फुलवुन घ्यावा. तो बाजुला ठेवुन त्याच कढईत खवा तुप सुटेपर्यंत कोरडाच भाजावा. दोन्ही कोमट झाले की त्यात खसखस पुड, पिठीसाखर अन वेलची जायफळ पुड घालुन एकजीव करावे. रवा व मैदा एकत्र करुन त्यात तुपाचे मोहन व मीठ घालुन दुध किंवा पाण्याने घट्ट भिजवावे. तासाभराने कुटुन मळुन त्याचे लहान गोळे करावे त्यात सारणाचा दिडपट गोळा भरुन उंडा तयार करावा वा हातावर तो थापुन चपटा करावा. हा तयार उंडा तांदळाच्या पीठावर पुरी एवढा लाटुन प्रम्थम नॉनस्टीक तव्यावर मंद आंचेवर दोन्ही बाजुनी कोरडा शेकावा, डाग पडु देऊ नये. नंतर लगेच ही साटोरी तुपात तळावी. टिकण्यासाठी करायची असल्यास डीप फ्राय करावी. २ ते ३ दिवसात संपवायची असेल तर तुप सोडुन shalow fry केली तरी चालते. साटोरी भाजताना तवा फार तापु देऊ नये अन त्या उंड्याचे तोंड कळजीपुर्वक बंद करावे. साटोर्या लाटुन होतील तश्या लगेच भाजाव्यात म्हणजे वाफ धरणार नाही.
|
Moodi
| |
| Tuesday, January 03, 2006 - 9:21 am: |
| 
|
काजूची साटोरी. साहित्य : दिड वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, चिमुट मीठ, दुध, तांदळाचे पीठ, ३ टेस्पुन गरम तुपाचे मोहन, तुप. सारण : दिड वाटी काजूची पुड, अर्धी वाटी खवा, २ टेस्पुन घट्ट साय, दिड वाटी पिठीसाखर, पाव टीस्पुन दुधात भिजवलेले केशर, वेलची जायफळ पुड. कृती : कढईत खवा कोरडाच परतावा. त्यात काजुची पुड घालुन थोडे परतावे व लगेच आंचेवरुन उतरावे. मिश्रण गार झाले की त्यात वेलची जायफळ पुड, पिठीसाखर, केशर अन साय घालुन मळुन एकजीव करावे. पारीसाठीचे साहित्य एकत्र मळुन पोळीपेक्षा घट्ट भिजवावे. तासाभराने त्याचे उंडे करुन त्यात सारण भरुन नेहेमीप्रमाणे साटोर्या कराव्यात. मात्र या डीप फ्राय करु नयेत. तव्यावर आधी शेकुन मग कडेने साजुक तुप सोडुन तळाव्यात.
|
Moodi
| |
| Tuesday, January 03, 2006 - 9:28 am: |
| 
|
खजुराची साटोरी. साहित्य : दीड वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, अर्धी वाटी कणिक, ३ टेस्पुन पातळ तुप, चिमुट मीठ, पाणी वा दुध, तांदळाचे पीठ, तुप. सारण : ४०० gm बीनबियांचा खजुर, अर्धी वाटी पिठीसाखर, पाव वाटी मिल्क पावडर, अर्धी टीस्पुन वेलची पुड, पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट. कृती : खजूर धुवुन कापडावर पसरुन कोरडा करावा. नंतर बारीक चिरुन मिक्सरमध्ये वाटुन घ्यावा. त्यात इतर सर्व सारणाचे साहित्य मिसळुन एकजीव करुन ठेवावे. रवा, मैदा, कणिक, तुप व मीठ एकत्र करुन पाण्याने वा दुधाने घट्ट मळावे. तासभर झाकुन परत मळुन नेहेमीप्रमाणे साटोर्या कराव्यात. यात डेसिकेटेड कोकोनट ऐवजी अक्रोड पुड पण घातली तरी चालते.
|
Moodi
| |
| Tuesday, January 03, 2006 - 9:39 am: |
| 
|
रवा गुळाची साटोरी. साहित्य : दिड वाटी कणिक, १ वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, ४ टेस्पुन तुपाचे / रीफाईंड तेलाचे मोहन, तांदळाचे पीठ. सारण : १ वाटी बारीक रवा, १ वाटी किसलेले सुके खोबरे, १ वाटी जाडसर दळलेली कणीक किंवा बेसन, २ वाटी चिरलेला गुळ,, २ टेस्पुन भाजुन खसखस पुड, वेलची जायफळ पुड. कृती : प्रथम साजुक तुपावर रवा अगदी खमंग भाजवा, मधुन मधुन पाण्याचा शिपका द्यावा म्हणजे फुलेल. नंतर तो बाजुला ठेवुन त्याच कढईत तुपावर कणिक वा बेसन खमंग भाजुन घ्यावे. खोबरेही गुलाबीसर भाजावे. रवा, खोबरे, कणीक / बेसन एकत्र करुन त्यात खसखस वेलची जायफळ पुड मिसळावी. गुळात चमचाभर पाणी घालुन तो वितळवुन घ्यावा. जरा कोमट असताना त्यात इतर सर्व साहित्य घालावे अन एकजीव करुन ठेवावे पारीसाठी कणिक, रवा, मैदा एकत्र करुन त्यात मीठ व मोहन घालुन घट्ट मळावे. तासाभराने पुन्हा मळुन त्याचे पेढ्याएवढे गोळे करावे. अन सारण भरुन उंडा करुन नेहेमीप्रमाणे साटोर्या कराव्यात. या डीप फ्राय केल्या तरी चालतात, अन टिकतात.
|
Dineshvs
| |
| Monday, January 30, 2006 - 4:38 pm: |
| 
|
सांज्याच्या पोळ्यांसाठी काहि खास वेगळी कृति नाही. पुर्वी यात गुळ घालणे आवश्यक असायचा त्याची खास चव येते हे खरे पण साखरेच्या साटोर्या पण चांगल्या लागतात. यासाठी बारीक रवा खमंग भाजावा. त्यावर थोडेसे दुध शिंपडुन घ्यावे व हलवावे, त्याने रवा फ़ुलतो. मग त्यात पिठी साखर मिसळावी. वेलची पुड घालावी. रवा मैदा किंवा कणीक भिजवुन कुटुन मऊ करावी किंवा तिंबुन मऊ करावी. (मीठ घातलेच तर अगदी कणभर घालावे )मग त्याच्या गोळ्या करुन त्यात सारण भरुन लाटावे. व साटोर्या तुप सोडुन भाजाव्यात. जर रवा जाड असेल तर नेहमीप्रमाणे शिरा करुन मळुन घ्यावा.व सारणासाठी वापरावा. सारणात वेलची वा केशर घालावे.साटोर्या हलक्या हाताने लाटाव्यात. त्या फ़ुलल्या पाहिजेत.
|
Nalini
| |
| Monday, September 04, 2006 - 5:58 pm: |
| 
|
सांजोर्याच्या पुर्या: सांजोरा भरुन केलेल्या पुर्या म्हणून सांजोर्याच्या पुर्या. जसे की पुरणाची ती पोळी आणि साधी पोळी म्हणजे चपाती. तसे पुरी म्हटलं की सांजोर्याची पुरी आठवते. आणि आपण गव्हाच्या पिठाच्या करतो त्या पुड्या. गावी आजोबा तर त्याला तेलच्या म्हणतात. तेलच्या, गुळवणी आणि पिठलं काय मस्त बेत असतो नाही. दिवाळी आली म्हणजे घरोघरी गव्हाला पाणी लावायला सुरुवात होते. पाणी लावणे म्हणजे गहू ओले करुन सावलीत सुकवणे. त्यातच जाड मिठाचे खडे टाकुन बांधुन ठेवणे. मग हे गहू गिरणीत दळायला जातात. गेले की सांगायचे रवा बारिक धरा म्हणजे दळणार्याला कळते की रवा कश्यासाठी. त्याप्रमाणे जाते कमी जास्त करुन रवा दळला जातो. घरी आला की सुती किं बरंगळ साडी मोठ्या पातेल्याला बांधली जाते. आणि त्यातुन रवा चाळायला सुरुवात होते. त्या साडीतुन किंवा कापडातुन बारिक पिठी खाली पडते. आगदी मैद्यासारखी बारिक. वरती रहाते ते रवा आणि कोंडा. तर रवा चाळण्यासाठी २ प्रकारच्या चाळणी वापरल्या जातात. एकीतून अगदीच बारिक रवा चाळून निघतो तर पुढच्या चाळणीला जरा मोठा म्हणजे आपण दुकानातुन आणतो तसा. आणि वरती शिल्लक राहतो तो अगदिच जाडा रवा आणि कोंडा. मग हे हवेसमोर वर केले जाते ( पाखडले जाते म्हटले तरी चालेल.). शिल्लक राहिलेला रवा हा खास लापशीसाठी ( गुळाचा शिरा) ठेवला जातो. आणि कोंडा जनावरांच्या खाद्यात जातो. तर अश्याप्रकारे दिवाळीसाठी रवा तयार केला जातो. गावाकडे त्याला गरा असेही म्हणतात. सांजोर्याचे साहित्य: १ कि. रवा. ३ पावशेर( पाऊण कि.) गुळ. चवीला वेलची. एक कप पाणी(चहासाठी वापरतो तो कारण ईकडे कप म्हटला की तो अगदी मगच असतो.) रवा अगदी चांगला भाजुन घ्यायचा.( भाजायला तुप वैगेरे काहीच वापरायचे नाही). गुळ बारीक चिरुन घ्यायचा आणि एक कप थंड पाण्यात विरघळून घ्यायचा. ह्या पाण्यात रवा चांगला मिक्स करुन घ्यायचा. ह्यातच वेलची पुड टाकायची. पातेल्यात घालुन त्याला कापडाने बांधून ठेवायचे. हा सांजोरा एक किमान दिवस भिजला पाहिजे. दुसर्या दिवशी गव्हाचे पिठ वस्त्रगाळ करुन घ्यायचे. हवे तर ह्यात थोडा मैदा घेतला तरी चालेल, थोडेसे बेसन पिठ, आणि जर असेलच तर थोडी तांदळाची पिठी घ्यायची. हे सगळे एकत्र करुन त्यात गार तेल टाकुन पिठाला चांगले चोळुन घ्यायचे आणि घट्ट पिठ मळायचे. आपण पुड्यासाठी मळतो त्याहुन घट्ट. तास दोन तास झाकुन ठेवायचे. तोवर चांगले भिजते. मग जरासे कुटुन मऊ करुन घ्यायचे. जेवढा हवा तेवढाच सांजोरा एक भांड्यात काढुन घ्यायचा. त्यात असल्यास गोळ्या फोडुन घ्यायच्या. हाताने गोळा होतो का पहायचे. नसेल होत तर अगदी थोडासा दुधाचा शिपका मारायचा. पुर्या करायला जर एकटेच असाल तर आधी सांजोर्याचे लिंबापेक्षा बारीक गोळे करुन ठेवायचे. तेवढाच पिठाचा उंडा(गोळा) घेऊन वाटी कारायची आणि सांजोरा आत भरुन उंडा बंद करायचा. हलक्या हाताने कडा पातळ करत एकसारखी पुरी लाटायची. आणि कापडावर पसरवुन ठेवायची. संपुर्ण लाटुन होईस्तोवर तश्याच पसरवुन ठेवायच्या. लाटताना सांजोरा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. जर काही पुर्या लाटताना फुटल्या तर त्या तळायला शेवटी घ्यायच्या. कारण हा सांजोरा तळताना पुरीतुन बाहेर येतो. पुर्या लालसर रंगावर तळायच्या. देवाला नैवद्य दाखवायचा आणि त्यावर ताव मारायचा. सांजोरा फ्रिजबाहेर साधारण महिनाभर टिकतो. म्हणजे एकदा सांजोरा केला की हव्या तेव्हा पुर्या करुन खाता येतात. शिवाय ह्या पुर्याही फ्रिजबाहेर बर्याच दिवस टिकतात. नुसत्याच खायला खुप छान लागतात पण माझ्या आवडीचे प्रकार म्हणजे शेंगदाण्याच्या आमटी सोबत. बेसनपिठल्या सोबत आणि शेंदाण्याच्या चटणी सोबत(हिरवी मिरची घालुन केलेली चटणी) खुपच छान लागतात. गावी ह्या पुर्या करणे म्हणजे किमान १०-१५ किलो गव्हाचा रवा काढुन आणला जातो. पुर्या करायला सुरवात करताना एक गणपती केला जातो. तो आधी तळला जातो. गॅस वर तळत असाल तर गॅसवर नाहितर चुलीवर ठेऊन त्याची हळदी कुंकवाने पुजा केली जाते आणि मग बाकिच्या पुर्या तळायचे काम सुरु होते. पुर्या करायला बसले की तिन चार बायकांना ५- ६ तास लाटायला जातात आणि तळायला किमान ३ तास. एवढ्या मोठ्याप्रमाणावर तळाचे म्हटले मग मस्त चुल पेटवली जाते. तळण्याचे हे दिव्य मी बर्याचदा पार पाडलेय. पुर्या तळल्या की पाटीतच काढुन ठेवल्या जात आणि मग थंड झाल्या की डब्यात रवाना होत. सर्वात आवडीची गोष्ट म्हणजे पुर्या लाटतालाटता सांजोर्याचे गपाणे मारणे. मी जे साहित्य सांगितले ते दुकानातून तयार रवा आणुन करण्यासाठी. गावी मात्र घरी तयार केलेला रवा, जी पातळ पिठी सुरवातीला गाळुन घेतलेली असते तेच वापरले जाते.
|
Arunima
| |
| Monday, September 04, 2006 - 7:14 pm: |
| 
|
नलिनी नासिक भागातहि अशा पुरया (सांजोरया) करतात. ह्या दह्याबरोबरहि खातात आमच्या कडे आणि नव्या नवरीबरोबर सासर माहेराहुन ह्याची पहिली शिदोरी देतात. नासिककडे दोन पुरयांमध्ये सारण भरुन सांजोरया करतात. लग्नाच्या वेळी सांजोरया करणे हा हि एक मोठा कार्यक्रम असतो. सगळ्या ओळखीच्या, नात्यातल्या स्त्रिया एकत्र येउन ह्या सांजोरया बनवतात. उखाणे घेणे, लोकगीत वगैरे म्हणत पुरया कधी होतात कळतहि नाहि. मग गरम गरम पुरया आणि तळलेल्या कुरडया पुरयांचा खाऊ आलेल्या बायकांना दिला जातो. तु वरती दिलेली रेसिपी वाचली आणि हे सगळ आठवलं.
|
Psg
| |
| Tuesday, September 05, 2006 - 5:26 am: |
| 
|
नलिनी, मूडी, सांजोर्या आणि साटोर्या करून त्या तळायच्या हे प्रथमच वाचलं. बाकी कृति सेम, पण आम्ही नुस्त्याच गॅसवर पोळी सारख्या भाजून घेतो, पुन्हा त्या तळत नाही. गॅसवर भाजतानाच त्यावर थोडे तूप सोडतो..
|
Moodi
| |
| Tuesday, September 05, 2006 - 7:59 am: |
| 
|
psg तुझे बरोबर आहे, आम्ही पण तव्यावर तूप सोडुन भाजुन घेतो, मात्र जर जास्त दिवस टिकवायच्या असतील तर तळता येतात. बी हा चटोरी प्रकार तुच लिही, आम्ही तरी हे नाव कधी ऐकले नाही.
|
Surabhi
| |
| Tuesday, September 05, 2006 - 8:21 am: |
| 
|
मूडी, नलिनी, आमची सांजोरी खूप सोप्पी आहे त्या मनाने. पुरणपोळीप्रमाणेच फक्त मैदा वापरून सैल कणीक भिजवायची. तेल भिजवताना थोडे जास्त लागते. साखरेचा मिष्ट गोड शिरा वेलची केशर भरपूर घालून करायचा त्याचे सारण भरून अतिशय पातळ मोठ्या पोळ्या लाटायच्या. ह्या तव्यावर डाग पडु न देता तूप सोडून भाजतात. सुरेख दिसतात पांढर्या शुभ्र पोळ्या. साटोरी मात्र खव्याचे सारण भरून तव्यावर कोरडी शेकून नंतर कढईत पुन्हा तळून घेतात.
|
Nalini
| |
| Tuesday, September 05, 2006 - 8:35 am: |
| 
|
सर्वांचे आभार. मुडी, सुरभी, पूनम, एकच पदार्थ सगळीकडे वेगवेगळ्या नावांनी केला जातो. कृती थोड्या अधिक फरकाने वेगळी असते एवढेच. पूनम, तळून केल्या की खूप दिवस टिकतात. तुझ्या पद्धतीने करुन पाहीन एकदा. अरुनिमा, असच मन भुतकाळात गेलं की खूप आठवणी जाग्या होतात. तु म्हणतेस तश्या, दोन पार्यांमध्ये सारण भरुन पुर्या माझ्या आत्याकडे, कोपरगाव भागात केल्या जातात.
|
Chioo
| |
| Wednesday, September 06, 2006 - 11:24 am: |
| 
|
नलू, तू पाऊण किलो गूळ एक कप पाण्यात विरघळवायला संगितला आहेस. आणि त्यातच एक किलो रवा घालायचा. एक कप पाण्यात हे सगळे बसते?? सगळ्या रव्याला पाणी लागेल का?? माझं स्वयंपाकाचं ज्ञान खूप म्हणजे अतिशय कमी आहे. त्यामुळे हा प्रश्न पडला.
|
Nalini
| |
| Wednesday, September 06, 2006 - 11:56 am: |
| 
|
चिऊ, हो तेवढे पाणी पुरेसे आहे. तु सुरवातीला फक्त पाव किलो रवा घेऊन करुन बघ. हा सांजोरा दुसर्या दिवशी अगदी कोरडा लागायला हवा. शिवाय भिजवताना हातानेच मिक्स करायचा. पाणी मात्र थंडच घ्यायचे. पाणी जर गरम करुन घेतेले किंवा गुळवणी करुन घेतले तर सांजोरा २-३ वेळेस १५ मिनिटांच्या अंतराने सारखा खालीवर करावा लागतो आणि जर कामात विसरलो तर त्याचा कडक दगडच होतो मग फोडायला खुप वेळ जातो म्हणून घेतानाच गार पाणी घ्यायचे. लोपा, अगदी! दिवाळीच्या तर असंख्य आठवणी आहेत.
|
Limbutimbu
| |
| Wednesday, September 06, 2006 - 12:00 pm: |
| 
|
चिऊ, शन्का रास्त, पण एक कप पाण्यात आधी बारीक चिरलेला पाऊण किलो गुळ सहज विरघळेल, आता विरघळेल म्हन्जे लिम्बुसरबतातल्या साखरेसारखा पाणीदार नाही दिसणार पण बर्यापैकी वहाती पेस्ट होइल, त्यात रवा घालुन कालव, खर तर मळुन काढ! मात्र एक कप पाण्यात आधी रवा घातलास तर काहीच बनणार नाही, रवा आधिच सगळ पाणी शोषुन घेइल अन त्यात गुळ नीट मिक्स होणार नाही! गुळ बर्यापैकी विद्राव्य असल्याने पाण्यात आधि गुळ मिसळून मग त्या दाऽऽट पाण्यात रवा घातल्यास रवा गुळाची गोडीही शोषुन घेइल! बरोबर ना नलिनी मूडी? 
|
Nalini
| |
| Wednesday, September 06, 2006 - 12:06 pm: |
| 
|
लिंबु, अगदी बरोबर.
|
Chioo
| |
| Wednesday, September 06, 2006 - 12:32 pm: |
| 
|
हा. आत्ता कळले बरोब्बर. गूळपण पाघळेल हा मी विचारच नाही केला. धन्स, लिंबु, नलु.
|
Nalini
| |
| Tuesday, September 12, 2006 - 1:19 pm: |
| 
|
काल केलेल्या सांजोर्याच्या पुर्या, खास तुमच्यासाठी!
  
|
Surabhi
| |
| Tuesday, September 12, 2006 - 1:26 pm: |
| 
|
नलिनी, मस्तच फोटो टाकलेस! अगदी tempt होतय ग उचलून खायला! 
|
Prady
| |
| Tuesday, September 12, 2006 - 1:28 pm: |
| 
|
नलिनी छानच दिसताहेत गं. ती टमटमीत पुरी बघूनच पोट भरलं
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|